१. श्रावणाच्या सरी
आल्या श्रावणाच्या सरी
उन्हं कोवळे पसरी
गाई गोधनाच्या संगे .
कान्हा वाजवी बासरी !!१!!
गुरे चरती रानात
पावा वाजतो सुरात
स्वर गुंजनाने होई
चलबिचल मनात !!२!!
उन्हं पावसाचा खेळ
कसा बसला हा मेळ
ओढ्या ओढ्यातून वाहे
जल प्रवाह निर्मळ !!३!!
इंद्रधनुष्याने कसे
रूप चितारले जसे
जलधाराच्या रूपाने
नभी स्वर्गमय भासे !!४!!
सप्तरंगाचा पदर
कसा दिसे तो सुंदर
जवाहि-यांनी मढला
नवरत्नाचा तो हार !!५!!
–– रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई.
२. “येई श्रावणा! येई श्रावणा !”
येई श्रावणा, रे ! येई श्रावणा!
अधीर झाले रे ! तन मन माझे
अधीर झालो रे ! तव आगमना
येई श्रावणा, रे ! येई श्रावणा!
रिमझिम छान बरसती आहेत
नभातूनी झिरमिर श्रावणधारा
पानापानांवर लखलखती
चांदीची सुंदर ती रुपेरी फुले!
आल्हादक अशा वातावरणी
सोबत हवी सखी साजणी
प्रेमाची आली छान पर्वणी !
लुटत राहा आपल्या जीवनी
निर्मळ नसते जीवनी पैशांचे प्रेम
निसर्ग देतो सदैव निर्मळ प्रेम
तव प्रेम देण्या रसिक जनांना
येई श्रावणा, रे ! येई श्रावणा !
–– रचना : मधुकर ए. निलेगावकर. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर रचना 👌👌👍💐