Wednesday, February 5, 2025
Homeसंस्कृतीश्रावण मासी...

श्रावण मासी…

आज पासून श्रावण महिना सुरू झाला आहे.
त्यानिमित्ताने हा विशेष लेख….

हसरा लाजरा, गोजीरा अशा श्रावणाची सर्वानाच विशेषतः भगिनींना आतुरतेने प्रतिक्षा असते. असा हा आवडता श्रावण मास हिंदु पंचांगानुसार आणि सौर दिन दर्शिकेनुसार वर्षातला पांचवा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र श्रावण नक्षत्रात असतो त्यावरून त्याचे श्रावण असे नामकरण झाले आहे.
श्रावण म्हणजे अनेक सणांची उधळणच. हे सर्वच सण मराठी माणूस आनंदाने साजरे करून आपली संस्कृती जपत असतो.

नागपंचमीला आलेल्या माहेरवाशीणी उंच उंच झोका घेऊन आपल्या सख्यांबरोबर नागपंचमीची गीते गातात.

रक्षाबंधन याच श्रावणात येतो. बहीण बंधूरायाच्या हातावर नि भावाचे कुशल मंगल चिंतण्यास आतुर होते.

गोकुळ अष्टमी तर कृष्ण भक्ताना पर्वणीच! आबालवृद्ध त्यात समरसून भाग घेतात.

शेवटी बळीराजा आपल्या शेतात कष्ट करणार्‍यां सर्जा नि राजाची कृतज्ञतापूर्वक पूजा करून त्याला गोडधोड खिलवतात. बैलपोळा सण उत्साहाने साजरे करतात.

मंगळागौर साजरी करताना भगिणींच्या आनंदाला उधाण येते.

या महिन्यात अनेक सणांचे एकत्रित संगम झालेले पहायला मिळते. व्रत, उपास, पोथ्या पुराणे यांचीही पारायणे चालू असतात.

या श्रावण मासाचे बालकवीने किती सुंदर वर्णन केले आहे पहा
“श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवा दाटे चोही कडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरूनी उन पडे

असा हा हसर्‍या मनाला सुखावणारा श्रावण आला कि मन पुलकित होते. श्रावणाचा सूर आणि नूर मनाला वेडेपिसे करतो. सर्वत्र आसमंतात केवडा फुलून आल्याचा भास होतो. खास करुन तो भगिनींना भावतो. आवडतो. श्रावणातल्या प्रत्येक सणांशी त्यांचे नाते जोडले गेले असल्याने आनंद द्विगुणित होतो.

सृष्टीने हिरवागार शालू परिधान केलेला असतो. उन पावसाचा खेळ सुरू असतो. कधी इंद्रधनुष्य सप्त रंगाची उधळण करीत आकाशी कमान बांधतो. दुसरीकडे हर्षभरीत होऊन मोरही मयुरपंखी पिसारा फुलवून बेभान पणे नृत्य करतात.

झाडे तजेलदार असतात. फुलांना भर येऊन सडा पडलेला असतो. गायी, वासरे, गुरे, ढोरे धष्टपुष्ट होऊन डरकाळ्या मारतात, बैल शिंगाने माती उकरतात. भातशेती तरारून आली असते. पिकेही शिवारात डोळत असतात. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे अशी भावअवस्था झालेली असते.

भारतीय संस्कृतीत पशु पक्षी, निर्सगाचीही पूजा होते. नागपंचमीला नागदेवतेची, बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा, भाऊ बहिणीकडून राखी बांधून घेतो आणि तिच्या पाठीशी उभा आहे असे आश्वस्त करतो. कोळी बांधव सागराची आराधना करून सांभाळून घे अशी प्रार्थना करतात. कोळी भगिनी कुंकवाचा धनी सुखी ठेव असे साकडे घालतात.

श्रावणातले सण निर्सगाच्या जवळ नेत असतात. सारे व्रत वैकल्प, श्रावणी उपवास, बारा ज्योतिर्लिंग दर्शन, नाच गाणी यामुळे सर्वानाच आनंदीत करतो. हिंदोळ्याच्या झोके उंच जातात. असा हसरा लाजरा श्रावणमास सर्वानाच हवा हवासा वाटतो.

भास्कर धाटावकर

– लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक- महाराष्ट्र शासन. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी