Friday, November 22, 2024
Homeसेवाश्रीवर्धनचे सार्वजनिक वाचनालय

श्रीवर्धनचे सार्वजनिक वाचनालय

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील सार्वजनिक वाचनालयाने नुकतीच १३२ वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने जाणून घेऊ या वाचनालयाची गौरवशाली वाटचाल…
– संपादक

‘मराठी’ ही विश्वातली एकमात्र भाषा आहे, जी व्यक्तीला ‘अ ‘ ज्ञानापासून शेवटी ‘ज्ञ’ म्हणजे ज्ञानी करून टाकते, माझा त्रिवार सलाम त्या मराठी भाषेला.
असं ज्ञानी होण्यासाठी वाचनालये हा सर्वोत्तम पर्याय असतो, विविधांगी पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे असतो. आपापल्या आवडी निवडीच्या विषयावरील पुस्तके वाचून आपण ज्ञानसंपदा प्राप्त करू शकतो म्हणून साहित्यप्रेमींना, वाचनाचा व्यासंग असणाऱ्यांना, वाचनाचा नाद असणाऱ्यांना चांगली समृद्ध वाचनालये ही ज्ञानमंदिरासारखी पर्वणीच असते.

दिमाखात उभ्या असलेल्या श्रीवर्धनच्या सार्वजनिक वाचनालयाकडे पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं. अशा पुरातन वास्तूच्या भिंतीला कान लावला की ‘शब्दाविणे संवादु’ असे अनेक संवाद आपल्या कानांत गुंजन करू लागतात. ते संवाद मनांत घर करून रहातात अन अगदी हृदयापर्यंत पोचतात. अशा वास्तूमध्ये असं बरंच काही दडलेलं असतं, आपल्या अंतर्मनापासून आपण हे जाणण्याचा प्रयत्न केला की तो संवाद थेट आपल्या हृदयापर्यंत पोचतो.

अशी पुरातन वास्तू म्हणजे, श्रीवर्धन येथील सार्वजनिक वाचनालयाची इमारत. नुकतीच या वाचनालयाला १३२ वर्ष पुर्ण झाली आहेत. सन १८९३ मधे जंजिरा संस्थानचे नबाब अन साहित्यप्रेमी श्रीवर्धनकर यांच्या एकत्रित प्रयत्नाने सुरू झालेले सदरील वाचनालय हे अगदी सुरवातीला टिळक रोडवर, आता असणाऱ्या जिल्हा रुग्णालयासमोर मा. अण्णा शेटे यांच्या घरी भाड्याने जागा घेऊन या वाचनालयाची स्थापना झाली. त्यानंतर दूरदृष्टीच्या नबाबाने वाचनालयाची स्वतःची अशी स्वतंत्र वास्तू असावी म्हणून १९४२ साली श्री सोमजादेवी मंदिरासमोर आत्ताचे जे वाचनालय उभे आहे ती वास्तू बांधून दिली व या नवीन जागेत स्थलांतर केले. त्यालाही आता ८२ वर्ष पूर्ण झाली. १८९३ साली त्या काळातल्या साहित्य वाचक प्रेमींनी सुरू केलेल्या या वाचनालयातून सोनचाफ्यासारखा साहित्य सुगंध अविरत दरवळत आहे, अन तो असाच दरवळत रहावा.

नबाबाचा तो काळ म्हणजे अगदी दुर्गम असाच, रस्त्यांची नीट व्यवस्था नाही, मुख्य रस्त्यापासून दुरावलेला, आदान प्रदान यथायोग्य नसलेला खडतर काळ. परंतु त्याही परिस्थितीत साहित्याची बूज राखून असलेल्या श्रीवर्धनकरांनी मोलाचे साहित्यिक योगदान दिले व आज या वाचनालयाला दैदिप्यमान रूप लाभले. प्रचंड ग्रंथसंपदा, असंख्य पुस्तके असून श्रीवर्धन पंचक्रोशितील अनेक साहित्यरसिक वाचक या वाचनालयाचे सभासद आहेत शतायुषी होऊन गेलेल्या वाचनालयामधे रायगड जिल्ह्यात या वाचनालयाचा दुसरा क्रमांक लागतो. पहिला मान मुरुड सार्वजनिक वाचनालयाचा आहे, त्या वाचनालयाला १४१ वर्षे झाली आहेत. जंजिरा संस्थानचे प्रजाहितदक्ष नबाबाने समाजकल्याणाच्या दृष्टिकोनातून त्या काळी श्रीवर्धन वाचनालयाला लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला. त्याही पुढे जाऊन सांगायचे तर आज जी वाचनालयाचीची वास्तू उभी दिसते ती १९३२ साली बांधून दिली. धन्य ते श्रीवर्धनकर अन धन्य तो नबाबही.

आज हे सगळं सांगायचं औचित्य म्हणजे या वाचनालयाला १३२ वर्ष पुर्ण होऊन १३३ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. हा सोहळा साजरा करणेसाठी मागील वर्षात वाचनालयाने अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते, लहान बाळ गोपाळांच्या कला सादरीकरण, तरुणाईला भावतील असे कार्यक्रम, जेष्ठ नागरिकांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम असे नानाविध कार्यक्रम संपन्न झाले.

इथे मला सांगायला आनंद होतो की मी व माझी नात सांज चिटणीस, आम्हा दोघांच्या चित्रकलाकृतीचे प्रदर्शन ऑक्टोबर २०२० मधे वाचनालयाच्या सभागृहामधे आयोजित केले होते. आजोबा आणि नात यांच्या अशा चित्र प्रदर्शनाचा दुर्मिळ योग मला तसेच श्रीवर्धनकरांना लाभला आहे. सध्या श्री मनोज गंगाधर गोगटे हे वाचनालयाचे अध्यक्ष आहेत. ते स्वतः व इतर पदाधिकारी ही संस्था उत्तमरित्या चालवित आहेत, त्यांचे कौतुकच.

‘वाचाल तर वाचाल’ हे घोषवाक्य बऱ्याच वेळा आपल्या कानावर पडते. Reading makes man perfect and practice makes man accurate त्यामुळे वाचनाचा दांडगा व्यासंग जपलाच पाहिजे. श्रीवर्धनच्या वाचनालयामधे अनेक घोषवाक्यांचे फलक लावले आहेत, त्यातील प्रामुख्याने मला जास्त आवडलेले दोन……..
१) वाचनाशिवाय बोलणे हे फळे न देता पसरणाऱ्या वेलीसारखे आहे,
२) वाचनालयाच्या उंचीवर आचरणाची भव्यता अवलंबून असते……

हे वाचनालय समृद्ध आहे, या वाचनालयात आजमितीस ३५००० पेक्षा जास्त इतकी पुस्तके आहेत. कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह, आत्मचरित्र, अध्यात्मिक पुस्तके संदर्भ ग्रंथ, इत्यादि. ही ज्ञानसंपदा अशीच वाढती राहो. मीही या वाचनालयाचा एक सभासद आहे याचा मला अभिमान आहे.

गो . नी . दांडेकर, मधु मंगेश कर्णिक, प्रवीण दवणे, वैजयंती काळे, विश्वास मेहेंदळे अशांसारख्या जेष्ठ नामांकित साहित्य महारथींनी या वाचनालयाला भेट दिली आहे.

१९४२ साली बांधलेली ही वास्तू व्यवस्थित जतन केली आहे, फिकट अबोली रंगाची ही इमारत नजरेत भरेल अशीच आहे. आजपर्यंत अनेक मान्यवर या वाचनालयाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत….. श्री म्हापुसकर, श्री बापुसाहेब करडे, श्री अण्णा गद्रे, श्री दादा गोगटे असे काही अध्यक्ष आठवतात. सध्या समाजभान असणारे श्री मनोज गोगटे हे अध्यक्ष आहेत व त्यांची अध्यक्षिय कारकिर्द व्यवस्थित संभाळत आहेत. वाचनालयाच्या अध्यक्षांना व मोलाचे पवित्र कार्य पार पाडणाऱ्या इतर सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक अनेक शुभेच्छा !! शुभं भवतु.

सुनील चिटणीस

— लेखन : सुनील चिटणीस. पनवेल
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सुनीलजी, तुमचे सर्वच लेखन छान दर्जेदार व माहितीपूर्ण असते. श्रीवर्धन ह्या स्थानाविषयी तुमच्या मनात असलेले प्रेम आणि तेथील वाचनालयाविषयी वाटणारी आत्मीयता तुमच्या लेखात छान व्यक्त झालेली आहे. तिथे होणारे कार्यक्रम, त्यांमधील तुमचा व नातीचा सहभाग वगैरे गोष्टी खूप आनंददायक व कौतुकास्पद आहेत. तुमच्या वाचनालयाचे कार्य अविरत चालत राहावे आणि लवकरच त्याने द्विशतक महोत्सव साजरा करावा, ह्यासाठी तुम्हाला व सर्वच सदस्यांना, तसेच संचालकांना हार्दिक शुभेच्छा देते. 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments