“आरोग्य धन संपदा”, “शीर सलामत तो पगडी पचास”, “Health is Wealth” अशा आरोग्याचं महत्व अधोरेखित करणाऱ्या म्हणी आपल्याला माहिती आहेच. अन्य भाषांत देखील अशा म्हणी असतीलच. तरी सुद्धा आपणच आपल्या आरोग्याकडे द्यावे तेव्हढे लक्ष देत नाही आणि एकदमच आजार बळावला तर मात्र आपण गलितगात्र होतो. कोरोनामुळे तर आरोग्य संपन्न जीवनाचं महत्व आपल्याला चांगलंच पटवून दिलं आहे.या सर्व पार्श्वभूमीवर उन्नती बागुल जगदाळे यांनी संपादन केलेल्या “श्री आरोग्यनीती” या दिवाळी अंकाचं महत्त्व लक्षात येतं. उन्नती बागुल जगदाळे यांना आपण दूरदर्शन निवेदिका, मुलाखतकार, सूत्र संचालक या भूमिकेतून नेहमी पहातच असतो. मात्र या दिवाळी अंकातून त्यांच्यातील ध्येयवादी संपादिका दिसून येते.

‘श्री आरोग्यनीती’ च्या यंदाचा दिवाळी अंक आरोग्याच्या नव्या संकल्पना मध्यवर्ती ठेवत परिपूर्ण केला आहे, तो ‘आरोग्यनीती’ च्या परिवारातील तज्ञ डॉक्टरांनी. या नामवंत डॉक्टरांनी अगदी सोप्या भाषेत तुमच्या आजच्या आरोग्याच्या समस्यांवर नेमके भाष्य केले आहे.
हा सगळा अंक आरोग्यविषयक माहिती, मनोरंजन, मुलाखत, विविध उपचार पद्धतीनी समृद्ध झाला आहे. हेच या अंकाचे वेगळेपण आहे.
हृदयापासून तर स्त्री आरोग्यासंबंधी अत्यंत नाजूक गोष्टी असोत, की अलका भुजबळ यांनी कँसरवर केलेली मात असो, सांधेदुखी, प्रत्यारोपण, शस्त्रक्रिया, मधुमेह यासह आहारविहार, वजन आणि व्यायाम असोत, ‘श्री आरोग्यनीती’ त प्रत्येक गोष्टीवर उत्कृष्ट मार्गदर्शन आहे.
‘श्री आरोग्यनीती’ मध्ये नुसत्या शारीरिक आरोग्यावरच भर देण्यात आला नसून त्यात मनाच्या आरोग्याचेही भान ठेवले आहे.. म्हणून उद्योग, व्यवसायासाठी प्रेरणा, आगळे-वेगळे छंद, अनुभव, पर्यावरण या सह संत साहित्य आणि सुंदर सिनेमा यांचे महत्त्व जाणून खास असं काही, हा अंक तुम्हाला वाचायला देतो.
एकूण सगळा अंकच देखणा, उत्कंठावर्धक असाच आहे. मुखपृष्ठ लक्षवेधी आहे. म्हणून यंदाची दिवाळी ‘श्री आरोग्यनीती’ सह साजरी करावी हाच आपला संकल्प असावा. सर्वांना आनंददायी व आरोग्यदायी प्रकाशपर्वाच्या शुभेच्छा !! 💐
– देवेंद्र भुजबळ 9869484800
उत्कृष्ठ लेख अनुभव उपयोगी