आज, दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी माघी गणेश जयंती आहे. आपणांस श्री गणेश जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा. या निमित्याने जाणून घेऊ श्री गणेशाचे महत्व.
– संपादक
आपल्या हिंदू धर्मात अगदी वैदिक काळापासून कोणतेही कार्य सुरू करण्याआधी, श्री गणेशाचे पूजन करून मगच ते सुरू करण्याची परंपरा चालत आली आहे.
अशा तऱ्हेने जेव्हा कार्य सुरु केले जाते त्याला कार्याचा “श्री गणेशा” केला असे म्हटले जाते. प्रत्येक कार्यारंभ करण्यापूर्वी श्री गणेशाला आवाहन करून कार्याची सुरुवात म्हणजेच श्रीगणेशा करण्यामागे, श्री महादेवानी गणेशाला दिलेला वर हे एक कारण, जे पुराणांत सांगितले गेले आहे.
दुसरे म्हणजे श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे आणि प्रत्येक काम करण्यासाठी बुद्धी ही लागतेच. म्हणूनच मातापिता आपल्या चिमुकल्या बाळाला अगदी बोलायला शिकवताना सुद्धा “बाप्पा” म्हण असे शिकवितात; तर प्रथम अक्षर ओळख करून देताना पाटीवर श्री गणेशाय नमः असे लिहून गिरवून घेऊन अक्षरांचा म्हणजेच शिक्षणाचा श्री गणेशा करणे ओघाने येतेच !
पुढे जसे आपण मोठे होत जातो, तसे कोणतेही नवीन काम करताना त्याचा श्रीगणेशा हा करतोच. एवढेच नाहीतर श्री गणेश हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असल्यामुळे, कोणतीही विद्या वा कला आत्मसात करण्यापूर्वी श्री गणेशा करावाच लागतो.गणेश ही ज्ञानाची देवता आहे तशी विज्ञानाचीही देवता आहे. तसा उल्लेखही आहे ‘त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोसि’ केला गेला आहेच.
गणांचा ईश तो गणेश म्हणजेच गणांचा (सामान्य जनांचा) ईश म्हणजे मुख्य. तुम्हाला कोणत्याही कार्यात सर्वोच्च स्थानावर जायचे असेल तर ते कार्य सिद्धीस जाण्यासाठी, कार्यासाठी तयार असणा-या सर्वसामान्य लोकांना आपल्याबरोबर घेऊन, कार्याची पूर्ण माहिती करून घेऊन मगच त्याचा श्री गणेशा करायचा.
श्री गणेशामध्ये बुद्धी, ज्ञान, शक्ती, युक्ती, मनसामर्थ्य, सर्वांना जोडून घेणे इ. गुण अनुस्यूत आहेतच! त्यामुळेच कामात झोकून देता येते. त्यात सातत्य राखता येते आणि ओघानेच तुम्ही त्या कामातले इतर सामान्य जनांचे (गणांचे) श्री गणाधीश बनता.
श्रीगणेशा करणे याला दुसरीही पार्श्वभूमी आहे. विज्ञानानुसार असे म्हटले जाते की,या विश्वातील कोणतीही वस्तू ही बिंदूनी बनलेली असते. जसे की अणू जो सुक्ष्मातिसुक्ष्म आहे तो सुद्धा प्रोटान, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन यानी बनलेला आहे. (विश्वाच्या उत्पत्ती बाबत शोध चालू असून जे काही शास्त्रज्ञांच्या हाती लागले त्याला ‘बिग बँग’ असे नाव ठेवले गेले आहे) अशा असंख्य अणूंनी वस्तू बनतात. हवा, पाणी सुद्धा असंख्य कणांनी (कणात अणु आणि अणूत रेणू) युक्त आहे. आपले शरीरसुद्धा पंचतत्त्वानी बनलेले आहे. पंचतत्त्वात पुन्हा हे अणू आणि अणूत पुन्हा प्रोटाॅन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स आहेतच. या साऱ्याला संस्कृत मध्ये गण म्हणतात. या गणांचा ईश तो गणेश तसेच गणांचा अधिपती तो गणपती. म्हणजेच सारे ब्रम्हांड गणांचे आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणारा तो गणेश अथवा गणपती.याचाच अर्थ पर्यायाने प्रत्येक वस्तू/गोष्ट, पंचतत्त्वयुक्त/गणांनी युक्त असल्यामुळे त्यात गणेश तत्त्व आलेच. या चराचरात/विश्वात श्री गणेश तत्त्व व्यापून राहिले आहे. त्यामुळेच कोणत्याही गोष्टीचा/विद्येचा/कामाचा प्रारंभ करायचा म्हणजे त्यातील गणेश तत्त्व जागृत करायचे. यालाच आपण श्री गणेशा केला असे म्हणतो.
चला तर मग, नवीन काही छान करायचे असेल तर आज पासून “श्री गणेशा” करू या !
— लेखन : श्रद्धा जोशी. डोंबिवली
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
श्री.गणेशाचे महत्त्व श्रद्धा जोशी यांनी सोप्या शब्दात, माहितीपूर्ण आहे. खूप छान