“रूपनारायण सोनकर”
जागतिक कीर्तीचे हिंदीचे श्रेष्ठ साहित्यकार रूपनारायण सोनकर यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फतेहपुर जिल्ह्यातील ‘नसेनिया’ या गावी 1962 मध्ये एका अत्यंत साध्या कुटुंबात झाला. त्यांचे एल.एल.बी.चे शिक्षण इलाहाबाद विद्यापीठात झाले. तदनंतर त्यांनी भारतीय राज्य सेवेत अधिकारी म्हणून कार्य केले आहे.
रूपनारायण सोनकर यांची आत्तापर्यंत 27 नाटके, 2 हास्य व्यंग्य काव्य संग्रह, 3 कादंबऱ्या, 2 कथा संग्रह व ‘नागफणी’ हे आत्मकथन प्रकाशित झाले आहे. त्यांच्या लोकप्रिय व प्रसिद्ध नाटकांमध्ये ‘एक दलित डीप्टि कलेक्टर’, ‘समाज द्रोही’, ‘छल-छल नीती’, ‘महानायक’ आणि ‘छायावती’ यांचा समावेश आहे.
अनेक वर्तमानपत्रांमध्ये रूपनारायण सोनकर यांच्या दलित साहित्यातील गतिविधिंना पर्याप्त स्थान दिल्या गेले आहे. त्यांचे
‘नागफणी’ आत्मकथन मराठी, तेलगू आणि कन्नड इत्यादी भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. विशेष म्हणजे सोनकर यांची ‘सूअरदान’ (डुक्कर दान) कादंबरी गुजराती, इंग्रजी, मराठी, कन्नड, तेलगू इत्यादी भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. आत्मकथन ‘नागफणी’ व कथासंग्रह ‘जहरीली जडें’ अनुक्रमे इलाहाबाद विद्यापीठ व लखनऊ विद्यापीठ येथे स्नातक स्तरावर पाठ्यक्रमांमध्ये शिकवली जात आहे. कोचीन युनिव्हर्सिटी सायन्स अँड टेक्नॉलॉजी केरळच्या एम.ए.हिंदी पाठ्यक्रमामध्ये ‘डंक’ ही कादंबरी समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच प्राचार्य स्पॉक अली, LBS P.G.College बैंगलोर यांनी ‘डंक’ या कादंबरीची निवड डीलीट या पदवीसाठी केली आहे. महाराष्ट्रातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या एम.ए. हिंदीच्या पाठ्यक्रमात ‘नागफणी’ समाविष्ट करण्यात आली आहे.
रूपनारायण सोनकर यांच्या संपूर्ण साहित्यावर देशभरात 20 एक विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे. त्यांचे सामाजिक कार्य ही वाखाणण्याजोगे आहे. ते साहित्य संमेलनांचे व विविध उपक्रमांचे आयोजन करीत असतात. विशेष सांगायचे म्हणजे यूजीसी केअर लिस्ट मान्य मासिक ‘नागफणी’ हे मासिक त्यांच्या सुविद्य पत्नी ‘सपना’ सोनकर यांच्या संपादकत्वात चालवत आहेत.
रूपनारायण सोनकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
उत्तरांचल चे तत्कालीन आयुक्त श्री सुभाष कुमार यांच्या हस्ते १५, मार्च १९९७ रोजी ‘गौरव भारती’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘खूबसूरत परियों का गलबहिया डांस’ या काव्य ग्रंथाचे प्रकाशन दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित व श्री साहिब सिंह वर्मा यांच्या हस्ते १९९७ ला झाले. हास्य व्यंग्य काव्य संग्रह ‘यदि गीदड नेता होता’चे प्रकाशन प्रख्यात हास्य कवी अशोक चक्रधर यांच्या हस्ते १९९८ ला झाले. ‘विषधर’ या नाट्यसंग्रहाला दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या हस्ते ‘डॉ.आंबेडकर विशिष्ट सन्मान’-1999 प्रदान करण्यात आला. ‘हिंदी गौरव सन्मान’ महामहीम राज्यपाल सत्यनारायण रेड्डी, उत्तर प्रदेश यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘रहस्य’ या नाट्य संग्रहाचे प्रकाशन माजी प्रधानमंत्री श्री.व्ही.पी.सिंह यांच्या हस्ते २००१ मध्ये झाले. २००२ मध्ये उत्तरांचलचे तत्कालीन राज्यपाल श्री सुरजीतसिंह बर्णाला यांच्या हस्ते रुपनारायण यांना “साहित्य महोपाध्याय” (डीलिट) ही पदवी बहाल करून सम्मानित करण्यात आले. ‘एक दलित डीप्टी कलेक्टर’, ‘छायावती’ व ‘महानायक’ या नाटकांचे विमोचन इंग्रजीचे प्रसिद्ध लेखक रस्किन बॉंड यांच्या हस्ते २००३ मध्ये झाले. ‘जहरीली जडे’ (कथा संग्रह) समाज द्रोही (नाटक) व ‘नागफणी'(आत्मकथा) चे प्रकाशन हिंदीचे प्रसिद्ध आलोचक प्रो.नामवर सिंह यांच्या हस्ते झाले आहे. ‘डंक’ कादंबरी चे प्रकाशन २०१० मध्ये पद्मभूषण डॉ.बिंदेश्वर यांच्या हस्ते झाले.
रूपनारायण यांचा घुटन, सपने व मंजिल या तीन टीव्ही मालिकांतील अभिनय अत्यंत स्मरणीय आहे. तसेच ‘जय महाकाली’ व ‘ईंट का जवाब पत्थर’ या चित्रपटात त्यांनी सशक्त व सुंदर अभिनय केला आहे. त्यांनी ‘एक दलित डिप्टी कलेक्टर’ या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, मंचन व नायकाची भूमिका साकारलेली आहे. हे नाटक फार विवादास्पद ठरले होते.
रूपनारायण सोनकर यांच्या व्यक्तित्व आणि कर्तृत्वाच्या परिचयानंतर त्यांच्या कथात्मक रचनांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, त्यांनी हिंदी कथा साहित्यामध्ये प्रयुक्त केलेल्या नवीन दंतकथा व प्रतिके यांच्यामुळे एक प्रयोगधर्मी कथाकार म्हणून ते अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांनी मनुवादी व्यवस्थेची ‘छल-छल नीती’च्या (डंक)’दंशा’ने दलित समाज घायाळ होऊन ‘नागफनी’च्या काटेरी गुंफनात गुंतवली गेलेली समाज रचनेतील ‘जहरीली जडें’ची विषाक्त पाळेमुळे खोदून टाकण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. ‘जहरीली जडें’ ही कथा भारतीय समाजातील दलितांवर होत असलेल्या सामाजिक जातीभेदाच्या दंशाचे भयावह चित्र प्रस्तुत करते. शाळेतील दलित विद्यार्थीसुध्दा या पासून वाचू शकला नाही.शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या कडून दलित विद्यार्थींना दिली गेलेली सापत्न वागणूक व शोषण अत्यंत निंदनीय आहे. अन्यायाचा प्रतिकार प्रस्तुत कथेतील ‘हीरालाल’चे वडील करतांना दिसून येते. ही कथा जातीभेदाचे दर्शन घडवते. तद्वतच त्यांनी ‘सुअरदान’ कादंबरीच्या माध्यमातून भारतीय परंपरेने चालत आलेली दंतकथा खंडित केली आहे. तसेच या कादंबरीच्या माध्यमातून जनसामान्य मागास प्रवर्गातील वंचित, शोषित, दलित सर्वहारा वर्गाला आर्थिक दृष्टिकोनातून सबलता प्राप्त करून देण्याचे दिशा निर्देशन सौदाहरण सहित स्पष्ट केले आहे. स्वत्वाची जाण नसणाऱ्या समाजाला स्वाभिमान, अस्मिता, अस्तित्वबोध याचे जीवनदर्शन आपल्या कथात्मक रचनांच्या माध्यमातून लेखकाने घडविले आहे. इतकेच नव्हे तर दलित स्त्रीयांना आपली अब्रू वाचवण्यासाठी ‘इंट का जवाब पत्थर से’ या उक्ती प्रमाणे दिला आहे. जिथे अन्याय होतो तिथे त्याचा त्याचा प्रतिकार करणे ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण आमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे. भारतीयांचा लोकप्रिय सांस्कृतीक उत्सव होळीच्या प्रसंगी दलित स्त्रियांची इज्जत-अब्रू उच्चवर्णीय लोक घाणेरड्या शिव्या देऊन सरेआम निलाम करतात तेव्हा गप्प न बसता त्यांचा प्रतिकार व प्रतिउत्तर देताना दिसून येते. लेखक म्हणतो की, “हमारा उद्देश ब्राह्मणों की औरतों को गाली देना नहीं हैं. हमारा उद्देश अपनी औरतों को अपमानित होने से बचाना हैं. हम तो यह भी चाहते हैं की, औरत औरत होती है, चाहे वह दलित हो या गैर दलित. सभी औरतों की गरिमा, मानसन्मान की रक्षा करना हम सभी का कर्तव्य हैं. समाज में अपमानित होनेवाली परंपराओं को बंद करना मात्र दलितों का उद्देश हैं.” भारत देशामध्ये आजही काही धार्मिक स्थळांमध्ये, पाणवठ्यावर मागासवर्गीय दलित, आदिवासी, जाती जनजातीच्या लोकांना प्रवेश निषिद्ध आहे. म्हणून आपली अस्मिता जपण्यासाठी धर्मांतराच्या वाटेवर चालताना हा समुदाय मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

सोनकर यांच्या कथा साहित्यातील चरित्रांची खास वैशिष्ट्ये आहेत की ते आपल्या समस्यांपुढे गुडघे न टेकता त्यांच्यासोबत दोन-दोन हात करण्यास व संघर्ष करण्यासाठी सदैव तत्पर असतात. छायावादी कवींवर असा आरोप केला जातो की ते जीवनातील समस्यांपासून परावर्त होऊन त्याचे समाधान निसर्गामध्ये शोधतात. निसर्गातच रममाण होतात. निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपल्या सुखदुःखाचे समाधान शोधतात आणि वास्तविक जीवनापासून पलायन करतात. परंतु सोनकरजीच्या कथा साहित्यातील सारे पात्र- नायक, नायिक आपल्या जीवनातील सर्व संकटांना सामोरे जातात, हार मानत नाहीत, त्याचा मुकाबला अत्यंत धैर्याने, शौर्याने, संपूर्ण शक्तीनिशी करताना दिसतात. कठीण परिस्थिती समोर ते कधीही झुकत नाहीत. समझौता करीत नाहीर तर ते संघर्षाच्या बळावर शत्रूला आपल्या पायाशी लोळण घेण्यास बाध्य करतात.
सोनकरजी यांचे दूसरे महत्वपूर्ण वैशिष्ट्ये असे आहे की, ते निसर्गातील पशुपक्षी यांच्यासोबत मानवीय सहजीवन स्थापित करतात आणि हेच सहजीवन मानवी जीवनाच्या आर्थिक उन्नतीस सहाय्यभूत ठरते. त्यांनी आपली कादंबरी ‘सुअरदान’ची मुळ परिकल्पना ‘पशु’ आणि ‘मानव’ यांच्या क्लोन पासून ‘मानवर’ ही वैज्ञानिक परिकल्पना प्रस्तुत केली आहे. या कादंबरीतील मुख्य चरित्र सज्जन खटिक, सत्यनारायण त्रिपाठी आणि पुजारी यांची मुख्य भूमिका आहे. हे सुशिक्षित तरुण शेती पूरक ‘पिंपरी फार्म’ची उद्योग निर्मिती करुन तरुणांना रोजगार उपलब्ध करून देतात. इतकेच नव्हे तर आपल्या उत्पादनाचे वितरण बाहेर देशात देखील करून आपल्या देशाच्या आर्थिक विकासात भर टाकल्याचे आढळून येते.
‘सुअरदान’ कादंबरी संबंधी डॉ.पानसिंह म्हणतात की, “सूअरदान’ बडा गजब का उपन्यास है. उपन्यास में विभिन्न कड़ियों को जोड़कर समाज में फैली भयंकर समस्याओं तथा उसके समाधानों को उजागर करने का प्रयास किया है। उपन्यास में वर्ण भेद, वर्ग भेद, कन्या भ्रूण हत्या, धर्माडंबर, आतंक, उच्च वर्ग द्वारा निम्न वर्ग का शोषण, महामारी, भुखमरी, तस्करी, लूट तथा सेक्स के प्रति अभिज्ञता आदि मुख्य समस्याएं चर्चित हुई हैं।…सोनकर बहुरंगी, बहु व्यंग्य विचारों और बातों का चित्र लेखक है।” अर्थात प्रस्तुत कादंबरी भारतीय समाजात शेकडो वर्षापासून चालत आलेली अंध धार्मिक परंपरा मुळासकट उखडून टाकते.

प्रेमचंद यांच्या ‘गोदान’ कादंबरीची व रूपनारायण सोनकर यांच्या ‘सुअरदान’ कादंबरीची तुलना केली असता असे लक्षात येते की, प्रेमचंद यांनी गोदान मध्ये शेतकऱ्यांची दयनीय, शोचनीय, फटेहाल जिंदगी चित्रित केली आहे. त्यांना त्यांच्या आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर काढू शकले नाहीत. परंतु रूपनारायण सोनकर यांची कादंबरी ‘सुअरदान’ ही शिक्षित तरुणांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘पिगरी फार्म’ उद्योग सुरू करुन शेतकरी, कामगार यांना त्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवते. म्हणून ही कादंबरी गोदान पेक्षा श्रेष्ठ ठरते.
‘सुअरदान’ विषयी प्रो.तेज सिंह यांनी केलेले विधान महत्त्वाचे ठरते, “या कादंबरीमध्ये सोनकर यांनी धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सिध्दांताची नवीन व्याख्या केली व पुरातन पारंपरिक मान्यता खंडित केली आहे.” तसेच कंवल भारती यांनी केलेले विधान ही तीतकेच महत्त्वाचे आहे, “आत्तापर्यंत कोणताही दलित लेखक अंध धार्मिक मिथकांना खंडित करु शकला नाही ते काम रुपनारायण सोनकर यांनी ‘डंक’ आणि ‘सुअरदान’ कादंबरीच्या माध्यमातून केले आहे.”
‘डंक’ ही रूपनारायण सोनकर यांची बहुचर्चित, बहुप्रशंसित, बहुआलोचित व लोकप्रिय कादंबरी आहे. “कथा शिल्प आणि हेतू’ या दृष्टिकोनातून ‘डंक’ ही अभूतपूर्व कादंबरी आहे.” प्रस्तुत कादंबरीमध्ये लेखक विविध पैलू व जीवन क्षेत्रांच्या पृष्ठभूमीचे आणि अनेक ज्वलंत- सामाजिक (आरक्षण), राजनीतिक, आर्थिक, साहित्यिक, पारिवारिक (वृद्धांच्या) समस्यांसोबतच स्त्री भ्रूणहत्या, सती प्रथा, आदिवासी, श्रीमंतांचे विलासी कामजीवन, गरीब, कामगार (शोषण) व तसेच पर्यावरण इत्यादी समस्यांकडे केवळ डोळसपणे पाहातच नाहीत तर त्यावर भाष्य ही करताना दिसून येतात.
हिंदी साहित्य जगतात ‘डंक’ सारख्या फार कमी रचना दिसून येतात की ज्या वाचकांच्या ह्रदयाचा ठाव घेतात. या कादंबरीच्या संदर्भात डॉ. हेना लिहितात की, “इस उपन्यास की विशेषता यह है की, इसमें कथा सूत्र या कथा प्रवाह या कथात्मकता का पूर्ण अभाव है. हर कथा या कही घटना अलग छिटकी हुई है. इसमें परस्पर किसी प्रकार का सूत्र स्थापित करने की कोशिश नहीं की गई है. ऐसा लगता है कि कोई समाचार पत्र पढ़ रहे हो या न्यूज़ देख रहे हो. ढेरों घटनाएं, समस्याएं, चित्र सभी एक के बाद एक प्रस्तुत हुएं हैंं. सिर्फ यात्रा का ही क्रम इसमें देखा जाता है, जो भारत-दर्शन की अनुभूति जगाता है, दर्शनीय स्थलों, इतिहास प्रसिद्ध इमारतें, खंडहरों, प्रकृति रमणीय हिल स्टेशनों की यात्रा नहीं बल्कि आज के भारत के जीवन के सच्चे दिल को दहलानेवाले दृश्यों की यात्रा पूरे उपन्यास के उपक्रम में जो सूत्र, प्रवाह या आकर्षण हैं जो पाठक को बांधे रखता है. वह है अनुभूति की सच्चाई और उसकी यथार्थपरक प्रस्तुति.” ‘डंक’ हे जातिभेदाचे प्रतीक आहे. सवर्णांना ‘जळु’ आणि ‘अमरवेल’ शोषकांची उपमा दिली आहे. तसेच या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने वेगवेगळ्या स्तरांवर पारंपारिक रुढिंना खंडित करून धर्माच्या संकल्पनांवर कठोर प्रहार केल्याचे दिसून येते. ‘डंक’ या कादंबरी विषयी प्रो.इस्पाक अली असे लिहितात की, “ही कादंबरी दलित मागासवर्गीय आणि गरीब सुवर्णांना भयंकर गरिबीतून बाहेर काढून त्यांना आर्थिक सुबत्तेचा मार्ग दाखवते.” वरील सर्व विधाने आणि विवेचनावरून लक्षात येते की हिंदी साहित्यात ‘डंक’ कादंबरीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
‘गटर का आदमी’ ही रूपनारायण सोनकर यांची तीसरी कादंबरी आहे. ‘डंक’ आणि ‘सुअरदान’ या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने दलित मागासवर्गीय आणि गरीब सवर्णांना उन्नतीच्या क्रांतीकारी मार्गावर चालण्याचा उपाय सूचित केला आहे. म्हणून या दोन्ही कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या आहेत. दलितांच्या सामाजिक, राजनीतिक आणि आर्थिक समस्या शेकडो वर्षांपासून होत्या. हा समुदाय उपासमार, कुपोषणाचे शिकार होत होता. त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने केले आहे.
‘गटर का आदमी’ या कादंबरी विषयी प्रो.ओम राज लिहितात की, “या कादंबरीने साहित्य जगतात एक असा मार्ग प्रशस्त केला आहे की ज्यावरून दलित, वंचित, पीडित, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक व सवर्ण गरीब आपल्या मुक्तीचा मार्ग शोधेल.”
प्रस्तुत कादंबरीच्या माध्यमातून रूप शनारायण सोनकर यांनी गाव शहरातील नाल्यांची सफाई करणारे व अत्यंत गलिच्छ वस्ती-झुग्गी झोपड्यांमध्ये राहणारे मेहतर, भंगी, चांभार, वाल्मिकी, कामगार, दलित, गरीब, असहाय, मजबूर, कोणत्याही सोई सुविधा पासून वंचित असलेल्या समाजाचे दयनीय जीवन चित्र रेखाटले आहे. तसेच त्यांच्या शोषणांचे विविध प्रकार दृष्टिपथास आणले आहे. भारतीय संविधानात असे कुठेही लिहिले नाही की बुट चप्पलांचा व्यवसाय अथवा पालिश निम्न दर्जाचे काम फक्त चर्मकार किंवा निम्न समाजातील लोकांनीच करावे. भारतातील कोणताही व्यक्ती कोणताही व्यवसाय करु शकतो.
सोनकर यांनी ऑनर किलिंग, बाजारवाद, सेक्स ही बायलॉजीकल गरज, फिल्मी दुनिया, समाज सेवा, विकलांग सर्जरी या अंग प्रत्यारोपण, पारिवारिक स्त्री हिंसा, स्त्री अत्याचार, निम्न, मध्य व उच्च वर्गातील नशा खोरी आणि हिंसा, जातिभेद, अधुनातन स्त्री कामगार सप्लाय करणाऱ्या संस्थांचे कार्य, साफसफाई करणाऱ्या यंत्रणांमध्ये बदल, सीमा सुरक्षा, देवदासी प्रथा इत्यादी विषयांवर व प्रश्नांवर नवीन दृष्टीकोनातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. देवदासी प्रथा ही गटर समाजाचे एक अभिन्न अंग आहे असे लेखक मानतात.
पुजारी देवदासींचे शारीरिक, नैतिक शोषण करून समाजात अधर्म पसरवितात.

सोनकर यांच्या कथा, साहित्यातील चरित्रांविषयी संक्षिप्त रूपाने असे सांगता येईल की, दलित, आदिवासी, मागास शोषित वर्ग यांच्या पेक्षाही अधिक दयनीय स्त्री वर्गाची स्थिती आहे. शूद्रांपेक्षा ही अतिशूद्र भारतीय परंपरावादी पुरुष प्रधान संस्कृतीने स्त्रियांना फक्त भोगाची वस्तू आणि वंश चालवण्याचे साधन मात्र मानले गेले. परंतु स्वातंत्र्योत्तर कालखंडात संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना दिलेले अधिकार, शिक्षणाविषयी जागृती इत्यादीने स्त्री आपली अस्मिता, अस्तित्व आणि स्वाभिमान या साठी स्वतःची लढाई स्वतः लढत आहे. स्त्रियांमध्ये दलित, आदिवासी स्त्रियांची परिस्थिती तर अत्यंत गंभीर, भयावह, सोचनीय आणि दयनीय आहे. याला वाचा फोडण्याचे काम अनेक लेखिकांनी सुध्दा केले आहे. रुपनारायण सोनकर यांचा यात मोलाचा वाटा आहे. वरील विवेचनावरून असे म्हणता येईल की, रुपनारायण सोनकर हे एक श्रेष्ठ हिंदी कवी, नाटककार, समीक्षक, अभिनेता, दिग्दर्शक व बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी मानवतावादी विचारांचे लेखक म्हणून ख्याती प्राप्त झाले आहेत.

— लेखन : प्रा.डॉ.एम.डी.इंगोले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
