एकविसाव्या शतकातील पंचविशी संपून सव्विशीत पदार्पण करतांना प्रत्येकाला पडणारा प्रश्नः ‘कोणता संकल्प करू ?’ चांगले संकल्प सुचत नाहीत, सुचले तरी टिकत नाहीत, सिद्धीपर्यंत पोचत नाहीत. तरीपण ते करावे वाटतात. करायचे असतात. काही क्षण, काही दिवस, काही महिने, काही वर्षे, अन् साधले तर कदाचित संपूर्ण आयुष्यही आनंदात जायला ते मदत करतात.
एकाने संकल्प केला सातच्या आत जेवण करण्याचा ! बायको म्हणाली, संकल्प चांगला आहे पण आधी स्वयंपाक शिकून घे. तात्पर्य स्वतःच्या बलबुतीवर सिद्धीस जातील असे संकल्प करावेत. कोणताही संकल्प न करण्याचा मी संकल्प केला आहे. असा वात्रटपणाही टाळावा. ठरवावं काहीतरी मस्त झेपेल, रुचेल, पचेल असं ! स्वतःतल्या चांगुलपणाला बळकट करण्याची ती संधी असते.
तसेही पृथ्वीच्या पाठीवरचे आपले आयुष्य एक वर्षाने कमी होणारच असते. तारुण्य संपले की जीवनातील वसंत संपतो. अन् शिशिरातील पानगळ सुरू होऊन एक एक वर्षांची पानं अशी गळून जातात. ‘वाढ’ नैसर्गिक असते, ती आपोआप होते. ‘विकास’ करावा लागतो. एकविसाव्या शतकाची गद्धेपंचविशी संपली, आपलीही केव्हाच संपली असेल किंवा संपेल! शेवटी महत्त्व ‘गधडेपणा’ संपण्याला असतं. जो गत गोष्टींपासून धडा घेत नाही तो ‘गधडा’ अशीही एक व्याख्या केली जाते.
मानवी व्यक्तिमत्त्वाचे तीन स्तंभ म्हणजे शरीर, मन, आत्मा अशा तीन पातळ्यांवर संकल्पांचा विचार करायला हवा. वीस लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या जंगलात आपले पूर्वज ‘होमो इरेक्टस’ ताठ कण्याने सरळ चालू लागले. ताठ कण्याचा हा प्रवास कणाहीन समाज निर्मितीकडे होणे याला काय म्हणावे ?
यश की अपयश ? क्रांती की अपक्रांती ? कणा नसेल तर मग कण्यांवरच (फार तर सोबत ताक मिळेल.) समाधान मानावे लागते.
संकल्प साधे, सोपे, सरळ पण शक्तिशाली असावेत. लोकमान्य टिळकांनी स्वतःची तोळामासा प्रकृती स्वातंत्र्याच्या लढ्याच्या कामाची नाही हे जाणून ‘एफ वाय’ च्या वर्गात असतांना कॉलेज सोडून वर्षभर व्यायाम करून बलोपासना केली. १६४५ ला मूठभर मावळ्यांसोबत लाखोंना सुखी करण्याचा संकल्प शिवरायांनी सोडला. महाराष्ट्रातील गरीब शेतकऱ्याच्या डोक्यात ज्ञान आणि यूट्यूब पायात त्राण आल्याशिवाय मी शिरस्त्राण आणि पादत्राण घालणार नाही कर्मवीर अण्णांच्या या संकल्पाने महाराष्ट्रात मोठी शिक्षण क्रांती घडवली. नंदकुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही हा चाणक्यांचा संकल्पही सर्वश्रुत आहेच.
‘होमो सेपियन्स’ म्हणजे ‘शहाणा माणूस’ असे आत्ताच्या उत्क्रांत माणसाचे नाव त्यामुळे अधिक काय सांगावे ? सध्या आपण ‘होमो डिजिटॅलिस’ झालो आहोत. त्यामुळं अगदी रांगेत उभं असताना, घरी निवांत बसताना, ऑफिस – दुकान – शेतात- कारखान्यात काम करतांना, कॉलेजात लेक्चर ऐकताना अनेकदा आपलं लक्ष मोबाइलवरच असतं. इन्फर्मेशन ओव्हरलोड आणि ओव्हर शेअरिंगमुळे डिजिटल जिंदगी परेशान झाली आहे ! संकल्प करायला, तो सिद्धीस न्यायला काही एक शांतता हवी असते. सतत कनेक्ट राहण्याच्या प्रेशरमध्ये ती मिळवायची कशी ? तंत्रज्ञान नवं असलं तरी शेवटी आपल्या मेंदूची रचना जुनीच आहे. त्यामुळं जुन्या मेंदूवर नव्या तंत्रज्ञानाचा अनपेक्षित ताण निर्माण होतो आहे. आता ह्या तंत्रज्ञानाच्या बेंबीत हात घालून बसल्याने आपण ‘गार गार वाटतंय’ असं खोटंच समाधान मानतो ! दुनियेशी कनेक्ट होण्याच्या नादात आपण स्वतःशीच डिसकनेक्ट झालोय. आता बसा बोंबलत ! आता संकल्प कसे सुचणार ? बाजार आपल्याला पळवतो आहे ! अर्थव्यवस्था खुली झाली अन् जगणं बंदिस्त ! जाम गोची झाली आहे ! भीती आणि स्वप्नं हे बाजाराचे नवे प्रॉडक्टस् आहेत. भीती दाखवा नाहीतर स्वप्नं दाखवा या दोनच गृहीतकांवर बाजार उभा आहे. भीतीने किंवा स्वप्नांच्या आशेने आपली धावाधाव सुरू आहे. अशा वातावरणात सुखाची झोप मिळवायचा संकल्प केला तरी पुरे होईल. किती धावायचं, किती पळायचं, किती चिडायचं, कशाकशाला भिडायचं ? टॉलस्टॉयच्या गोष्टीत साडेतीन हात जमीन पुरे असते माणसाला असं सांगितलं होतं. प्रगतीला विरोध नाही परंतु प्रगत माणसाची नेमकी व्याख्या न सापडणं ही खरी व्यथा ! आता शांतपणे रोज एक संकल्प करू जीवनविद्येचा…
“हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.”
सर्वांना सुख लाभावे, असो आरोग्य संपदा ! व्हावे कल्याण सर्वांचे कोणी दुःखी असो नये.
“सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः।”
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
— लेखन : डॉ संजय गोर्डे. संगमनेर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
