Sunday, July 6, 2025
Homeयशकथासंगीतगुरू डॉ महावीर बागवडे

संगीतगुरू डॉ महावीर बागवडे

संगीतामुळे मनुष्याच्या जीवनातील ताण तणाव कमी होतो अशी अदृश्य शक्ती संगीतामध्ये असते. आनंदी व उत्साही वातावरणाची निर्मिती होते जी रोजची कामे अथवा जबाबदारी पेलायला जणू एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करते.

संगीत क्षेत्रातील कौटुंबिक वारसा जपणारे, आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे तसेच पुणे विद्यापीठातून संगीत विषयात एम.ए. केलेले, आकाशवाणीचे ते मान्यताप्राप्त कलाकार, शास्त्रीय संगीतात गेली ३० वर्षांपासून वाटचाल करीत असलेले, नवीन पिढीला संगीत क्षेत्रात घडवण्याचे लाख मोलाचे काम करत असलेले, अशी दैवी देणगी लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे पुण्याचे डॉ महावीर माणिकचंद बागवडे होत.

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळज येथे २६, नोव्हेंबर १९६४ रोजी डॉ महावीर यांचा
जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण रयत शिक्षण संस्थेत झाले. शाळेत त्यांनी कधीही पहिला क्रमांक सोडला नाही. दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के मिळवून ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. बारावीत देखील घवघवीत यश मिळवून ते तासगाव केंद्रात प्रथम आले. पुढे सांगली येथील कस्तुरबाई वालचंद कॉलेज मधून त्यांनी
बीएससी. ही पदवी तर वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मधून आयुर्वेदाचार्य ही पदवी प्राप्त केली. पुढे दवाखाना चालू करून गावात प्रॅक्टिस सुरू केली केली.

श्री बागवडे यांचे वडील श्री माणिकचंद बाळकृष्ण बागवडे हे उत्तम शास्त्रीय भजन करीत. चुलते श्री चुनीलाल रामचंद्र बागवडे हे संगीत देत. त्यामुळे बालपणापासूनच त्यांना गायनाची गोडी लागली. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी चुलते श्री चुनीलाल बागवडे उर्फ सावळजकर गुरुजी यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास सुरवात केली.

सुरवातीला श्री बागवडे यांनी हार्मोनियम शिकायला सुरवात केली. मुळातच हुशार असल्याने अनेक रागांची माहिती मिळवून ते शिकून त्यात प्राविण्य मिळवले व वडिलांना हार्मोनियम वर साथ देऊ लागले.

सावळज गावात वडिलांची श्री सिद्धेश्वर नाट्यक्लब नावाची नाट्य संस्था होती. वडील भक्त पुंडलिक, संत तुकाराम अशा अनेक नाटकातून प्रबोधन करत. वडील उत्तम कलाकार, उत्तम गायक भजनकार होते. आजही गावात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या आवाजाची धार, ती गोडी आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

घरची शेती होती. त्यामुळे त्यांचे बालपण सुखात गेले. आई विमल माणिकचंद बागवडे या एक उत्तम गृहिणी होत्या. संगीत व शिक्षण याचा उत्तम मेळ बागवडे यांनी साधला.

श्री बागवडे यांची हुशारी लक्षात घेऊन सावळजकर गुरुजी यांनी महावीर यांना प्रथम राग ‘यमन’ गायनासाठी दिला. स्वतः गुरुजींनी तासन्तास बसून तयारी करून घेतली. रागातील बारकावे, तालाची तयारी, शास्त्रीय गायनासाठी लागणारी सुरावट यांचा त्यांनी कसून अभ्यास घेतला. राग यमन बरोबरच गुरुजींनी त्यांना जवळजवळ शंभर रागांची लिखित स्वरूपाची माहिती दिली. यमनप्रमाणे राग, मधुवंती, भीमपलास, मालकंस शुद्धसारंग, पटदीप या रागांतील चीजा त्यांना गायनाच्या तयारीसाठी दिल्या.
संगीत स्पर्धांमध्ये त्यांनी सातत्याने भाग घेतला. ते रोज पहाटे पाच वाजता उठून रियाज करायचे.

१८ डिसेंबर १९९२ रोजी त्यांचे लग्न पुण्यातील सुनीता विजय रासने यांच्याशी झाले. पत्नी सुनीता या होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर आहेत.
गावात फारश्या सोयी सुविधा नसल्याने ते पुण्यात आले. खरे तर गाणे शिकण्यासाठी ते पुण्यात आले. घरातील व्यक्तींचा विरोध होता कारण गावात त्यांचा दवाखाना चांगला चालत होता. गाण्यात करियर देखील करता येऊ शकते हे गावातील लोकांना पटत नव्हते.

मात्र आपल्या स्वप्नपूर्तीसाठी व पत्नीने पूर्ण पाठिंबा दर्शविल्या मुळेच त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. पुण्यात नाईक हॉस्पिटल येथे ते राहत होते व पत्नी पूर्ण वेळ सेवा देत होती.
दवाखाना सांभाळून ते शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेत होते. पुण्यातील प्रसिद्ध शिक्षक पंडित गंगाधरशास्त्री पिंपळखरे बुवा हे त्यांचे गुरू ज्यांनी मोजक्याच शिष्यांना मार्गदर्शन केले.

ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठातुन त्यांनी एम. ए. पूर्ण केले. दवाखाना व संगीत अशी दुहेरी कसरत चालू होती. ती वेळ अतिशय खडतर होती. संघर्षमय परिस्थितीशी पती पत्नीने हिंमतीने सामना केला.

काही कारणांमुळे त्यांना पुन्हा गावी जावे लागले. दवाखाना व घरीच गाण्याचे क्लासेस त्यांनी सुरू केले. २००२ ते २००५ गावात कोरडा दुष्काळ पडला. शेतीचे नुकसान झाले. अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली.

२००५ साली बाहुबली कोल्हापूर जिल्ह्यातील बाहुबली येथे दवाखान्यात २४ तास ते आरोग्य सेवा देऊ लागले. मोठा मुलगा गावात शिकायला होता. तर पत्नी व लहान मुलगा पुण्यात. संपूर्ण कुटुंब विखुरले होते. म्हणून पुन्हा पुण्यात जाण्याचा निर्णय घेतला. आपण सर्व एकत्र राहिले पाहिजे असे त्यांना मनापासून वाटत होते.

संगीत व दवाखाना अशी दुहेरी कसरत चालू होती. त्यांनी कधीही आशा सोडली नाही म्हणून परमेश्वराने देखील त्यांना निराश केले नाही. मेहनतीच्या जोरावर दिवसेंदिवस प्रगती होत गेली. खूप मेहनतीने, चिकाटीने व प्रामाणिकपणे काम ते करत होते.

शाहीर मावळे यांच्या पूर्वीपासून संपर्कात राहिल्याने त्यांच्या गृप सोबत हार्मोनियम वाजवण्याची संधी त्यांना मिळत होती. पुढे दिल्ली, भोपाळ, लातूर असे अनेक ठिकाणी ते गेले. नारदीय किर्तनात तसेच पोवाड्यातही ते साथ देत होते.

२०१२ साली स्वर निनाद नावाची पदवी श्री विद्याभारती सेवा प्रतिष्ठान तर्फे ज्योतिषाचार्य श्री प्रकाशजी काळे यांच्या हस्ते डॉ महावीर यांना देण्यात आली तो एक अविस्मरणीय क्षण होता.
२०१३ साली इंडस हेल्थ सर्विस येथे त्यांनी नोकरी सुरू केली. येथे अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीच्या कामगारांचे आरोग्य तपासले जाई. नोकरी व गायन याचा त्यांनी उत्तम समतोल साधला.

आतापर्यंत पुण्यात त्यांनी अनेक मैफिली केल्या आहेत. कालिका देवी मंदिर, रोटरी क्लब ऑफ पुणे, सुप्रसिद्ध नाईकवाडा ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ आदी ठिकाणी त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम झाले आहेत.

शास्त्रीय संगीतामध्ये त्यांची ख्याल गायकी, नाट्यसंगीत व भजनामध्ये चांगली गती आहे. सदाशिव पेठेतील स्वर ताल साधना या संस्थेत शास्त्रीय व सुगम संगीताचे धडे डॉ. महावीर देत आहेत. कोरोनाच्या काळात ऑनलाईन क्लासेस चालू केले. ज्यामध्ये देश विदेशातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश होता. तो उपक्रम आजही अविरत चालू आहे.

पुणे महानगपालिकेच्या शाळेत देशगीत, भक्तीगीत, समूहगीत ते बसवून देतात. तसेच आज अनेक कार्यक्रमात निवड समितीवर देखील ते काम करत आहे.

आज ते पूर्ण वेळ शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेतात. संगीत क्षेत्रात डॉ महावीर यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. घराण्याचा वारसा ते पुढे चालवू शकले व आपल्या कलेला न्याय देऊ शकले याचा त्यांना मनस्वी समाधान व आनंद होतो.
२०२१ साली जेव्हा डॉ.महावीर यांची अँजिओप्लास्टी झाली तेव्हा पासून त्यांना नोकरी सोडावी लागली व पूर्णवेळ ते संगीत क्षेत्रात काम करू लागले.

आज अमेरिका, कुवेत, जर्मनी, रुमेनिया अशा अनेक देशातील लोकांना ते शास्त्रीय संगीताचे ऑनलाईन प्रशिक्षण देत आहेत. स्वर निनाद कला अकॅडमी ही संस्था सद्या घरीच चालू केलेली असून अनेक परदेशी, स्थानिक शिष्य घडवण्याचे मोलाचे काम ते करत आहेत.

डॉ. महावीर यांचा मोठा मुलगा निषाद बीई इंजिनिअर असून त्याने १) hobbies stuff com – personalised gifting solution. 2) Eglence Mobility जी इलेक्ट्रिक व्हील चेअर बनवण्याचे काम करत आहे, अशा दोन कंपन्या सुरू केल्या आहेत.

लहान मुलगा रिषभ महावीर पुण्यातील IISER या संस्थेतुन एम.एस.सी. झाला असून जर्मनी येथील Bielefeld या युनिव्हर्सिटीत पीएचडी. करत आहे.

डॉ महावीर यांना पत्नीचे पूर्ण सहकार्य असल्यानेच त्यांचे स्वप्न सत्यात उतरू शकले असे ते आवर्जून सांगतात.

डॉ. महावीर यांनी सुप्रसिद्ध दगडूशेठ दत्त मंदिर, गीता मंदिर अश्या अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम सादर करून अनेकांची मन जिंकली आहेत. ते पुणे आकाशवाणीचे कलाकार देखील आहे.

संगीत क्षेत्रात स्वतःचे क्लासेस सुरू करता येतात. तसेच देश विदेशात कार्यक्रमात भाग घेता येतो. संगीत क्षेत्रात बी.ए., एम.ए. व पीएचडी देखील प्राप्त करता येते. आपल्याला कलेत करियर करता येते. एक उत्तम संधी म्हणून तरुणांनी संगीत क्षेत्राकडे पाहिले पाहिजे. या क्षेत्रात मान सन्मान देखील मिळतो व भविष्य उज्जवल करता येते. संगीत क्षेत्राला आज चांगले दिवस आले आहेत. एक प्रतिष्ठित व्यवसाय म्हणून या क्षेत्राकडे पाहिले जाते. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील या गोष्टी अजून सोप्या झाल्या आहेत. फक्त त्याचा योग्य उपयोग केला तर निश्चितच स्वतः प्रगती साधता येते.
संगीत क्षेत्रात वाटचाल करू इच्छिनाऱ्या मुलांना ते मार्गदर्शन करतात.

संगीताने झपाटलेले एक व्यक्तिमत्व असा उल्लेख करावा असे डॉ बागवडे निश्चितच एक आदर्श व उत्तम उदाहरण आहे. अतिशय जिद्दी व महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व लाभलेल्या डॉ बागवडे यांना भावी वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.

रश्मी हेडे

– लेखन : रश्मी हेडे. सातारा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अभिनंदन डॅा.महावीर बागवडे व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉💐🎉,रश्मीताई उत्कृष्ठ लिखाण 👏👏👍👍,डॅा.सुनिताताई अभिनंदन 🎉💐🎉

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments