इंग्रजीत असं म्हणतात की, “Music is the medicine of a mind !” कित्ती खरं आहे ना हे ?
खरंच वेगवेगळी गाणी मराठी, हिंदी किंवा अगदी कुठल्याही पाश्चिमात्य भाषेतील देखील आपल्याला श्रवणाचा किती भरभरून आनंद देत असतात ! आणि आपण सहज दिवसभराचा शीण विसरून जातो.
संगीतामध्ये तेवढी ताकद असतेच मुळात !
दिवसातल्या सर्व वेळी, वेगवेगळ्या प्रहरी, वेगवेगळे राग गायले जातात.
आपल्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, गझल, ठुमरी, मराठी सुंदर अप्रतिम कौटुंबिक जिव्हाळ्याची भावगीतं, अभंग, भावपूर्ण भक्तिगीते, भजनं, हिंदी चित्रपट संगीत, मराठी नाट्यसंगीत, लावणी, पोवाडा, भारूड इत्यादि असंख्य वैविध्यपूर्ण प्रकार आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतात.
वेगवेगळी संगीत संमेलने, संगीत महोत्सव पुण्यातील प्रसिध्द सवाई गंधर्व महोत्सव आणि वेगवेगळ्या शहरात आणि गावातून असे अनेक कार्यक्रम होतच असतात.
अलीकडे विवाहप्रसंगी देखील “संगीत” हा एक महत्वाचा अविभाज्य भाग बनून गेलाय. आदरणीय लतादीदी मंगेशकर, हृदयनाथजी मंगेशकर, आशा भोसले, महंमद रफी, मुकेश, किशोरकुमार, मन्ना डे, तलत मेहमूद, गीता दत्त आणि इतर अशा अनेक गायक, गायिकांनी आपल्याला त्यांच्या सुरेल आवाजातून कायम एक अवीट गोडीचा आनंद वेळोवेळी दिलेला आहे.
आताच्या काळात तर म्युझिक थेरपीला देखील खूप नावाजलं जातंय. खरोखर कितीतरी आजार, मानसिक दुखणी ही केवळ संगीतोपचाराने बरी होतात असं आपण ऐकतो.
जिंदगी, प्यार, मोहब्बत, दर्द या सर्व विषयांवर हिंदीत अनेक सुरेख गाणी आणि गझला आहेत. अलीकडे सोशल मीडियावरील (व्हॉट्स ॲप, फेसबुक इ.) कुठल्याही एखाद्या कार्यक्रमातील व्हिडीओमध्ये देखील संगीताला अनन्यसाधारण महत्व आहेच.
कोणतीही एखादी जाहिरात असो, भाषण, प्रवचन किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रम असो, तिथे पार्श्वसंगीत हे असतंच. खरं तर एक मिनीट सुध्दा आपण एखादा मूक व्हिडीओ पाहू शकत नाही. असलाच तर तो कितीही सुंदर असला तरी कुठेतरी, काहीतरी आवाजाची उणीव आपल्याला जाणवतेच. याचाच अर्थ आपल्याला तिथे संगीताची न्यूनता जाणवण्याइतकी त्याची कमी भासते.
आनंद, दु:ख, हास्य, वेगवेगळे समारंभ, पूजा, धार्मिक कार्यक्रम सगळ्यात संगीत हे असतंच. कुठे प्रवासाला जाताना, सहलीला जाताना, गाडीत, बसमध्ये, अगदी विमानात देखील संगीत हे आपल्या साथीला असतंच. कुठलीही सहल संगीताविना अपूर्णच असते आणि जिथे मैफल तिथे संगीत आणि जिथे संगीत तिथे मैफलीचा आनंद. मला तर असं वाटतं की या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
अगदी लहान बाळाला झोपवण्यासाठी आईने गायलेले अंगाईगीत ते मुलांना शाळेत शिकवलेले बडबडगीत, कविता या सगळ्या माध्यमांतून संगीत आपल्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. श्लोक, मंत्र यांत देखील मागे बारीकशी मधुर संगीताची साथ ही असतेच.
जर संगीतच आपल्या जीवनात नसेल तर आयुष्य खरंच किती नीरस आणि कंटाळवाणे होईल बघा ! नुसता विचार पण करवत नाही मला तर.
तेव्हा संगीत है तो जान है l
और जान है तो तान चाहिए l
तान के लिये गाना चाहिए l
गाना गाना हो तो मनाना चाहिए l
बस्स ! अजून काय हवं ?
प्रत्येकाने आयुष्यात गाणं हे गायलाच हवं.
रडगाणी गाण्यापेक्षा ते कितीतरी सुंदर !
सूर जुळले की सुरांचं सुंदर संगीत होतंच !
झाले गेले विसरून सारे
पुढे पुढे चालावे……. जीवनगाणे गातच राहावे…..
जीवनगाणे गातच राहावे………….
असे म्हणावेसे वाटते.
– लेखन : सौ.स्वाती गोखले
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
संगीतातील सर्व बारकावे सांगून संगीत आयुष्यात किती आवश्यक आहे हे या लेखातून अधोरेखित केलं आहे.