माणसानं कां जगावं, कसं जगावं, जगण्याची दिशा त्यासाठीचा जीवन प्रवास आणि पर्यावरणीय विचार मांडणारं ‘सं.ऋणानुबंध’ हे नाटक अतिशय अर्थवाही संदेश देणारं आहे. ‘छांदोग्योपनिषदातील’ मध्ययुगीन गायिका ‘जाबाल’ आणि तिचा एकुलता एक पुत्र ‘सत्यकाम’ यांची ही कथा आहे. तो एका गायिकेचाच मुलगा असल्याने संगीताचे बाळकडू तर त्याला बालपणापासूनच मिळाले आहे.
सत्यकामची जिज्ञासू वृत्ती, मूलभूत ज्ञान संपादन करण्याची, प्रत्येक गोष्टी मागचा कार्यकारणभाव समजून घेण्याची त्यांची तीव्र इच्छा पाहूनच जाबाल त्याला ‘आचार्य हरिद्रुम’ यांच्याकडे ज्ञानार्जनासाठी पाठवते. सत्यकामने भारत भ्रमण करावे, ते करीत असताना निसर्ग, प्राणी, पशू, पक्षी यांच्याकडून त्याने ज्ञान मिळवावे या हेतूने आचार्य त्याला चारशे गायी देतात आणि त्यांच्या हजार गायी झाल्यानंतर परत येण्याची अट घालतात. भारत भ्रमणाने ज्ञान संपादन करून परत आल्यावर जेंव्हा ‘त्याचा पिता कोण?’ याचा शोध जेंव्हा पूर्ण होतो तेंव्हा एक वेगळाच सत्यकाम रसिकांना पहायला मिळतो.
अशा शोध-यात्रेची ही कथा जरी जुन्या काळातील असली तरी आजच्या काळातील समाजातला अनाचार, भ्रष्टाचार, दुष्ट प्रवृत्ती, विकृती या सर्वांचे सामान्य माणसांवर होणारे परिणाम, देशहिताचा विचार, या सर्वच गोष्टींचा विचार या नाटकात केलेला आहे. पौराणिक संदर्भ, यातील तत्वज्ञान, भाषा सौंदर्य, उत्कृष्ठ शब्दमाधुर्य, उत्तम संवाद ही सर्व डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या ‘सं. ऋणानुबंध’ नाटकाची वैशिष्ट्ये आहेत. नाटकाच्या कथानकाला पुढे नेणारी चोवीस नाट्यपदे जोशी सरांनी ताल-मात्रात बसणारच लिहिली आहेत.
नव्या दमाचे संगीतकार श्री.राम तांबे यांनी नाट्यपदाच्या चाली अहिरभैरव, भूप, कलावती, बागेश्री, जोगकंस, भैरवी, यमन, दरबारी, केदार, भीमपलास, इत्यादि रागात आणि त्रिताल, रूपक, एकताल, जपणारे या तालात बांधल्या आहेत. या चाली, पदांची प्रकृती, नाट्यप्रसंगाची वेळ, यांचा आवश्यक विचार करून लावल्याने परिणामकारक व नाट्यप्रसंग खुलविणाऱ्या झाल्या आहेत. यामुळे संगीतकार राम तांबे यांनी नाट्यपदात “रसोत्कर्ष” आहे हे मात्र नक्कीच म्हणता येईल. प्रथमेश शहाणे यांची तबलासाथ आणि चैतन्य पटवर्धन यांची ऑर्गन साथ, नाट्यपदांना पूरक तर आहेच शिवाय संगीत रसिकांना मनापासून भावणारी आहे.

‘खल्वायन, रत्नागिरी’ नाट्यसंस्थेतील उपलब्ध कलावंतांमधून अचूक पात्रयोजना करून शब्दफेक शब्दोच्च्यार, याकडे विशेष लक्ष देऊन, नाट्यकथेला सहजपणे पुढे नेण्यासाठी नव्या उमेदीच्या प्रदीप तेंडुलकर या दिग्दर्शकाचे प्रयत्न अप्रतीम आहेत. आशुतोष मोडक, राम तांबे, कु.मधुरा सोमण यांनी गाण्याप्रमाणेच आपल्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत. गणेश जोशी, अनिकेत आपटे आणि प्रदीप तेंडुलकर यांच्या भूमिकाही छानच झाल्या आहेत. कु.मधुरा सोमणचे गाणे व भूमिका विशेष लक्षवेधी झाली आहे.
यश सुर्वेंची प्रकाश योजना, रामदास मोरे यांचे नेपथ्य व रंगभूषा मोजकीच असली तरी चांगली झाली आहे. रत्नागिरी येथील गोगटे कॉलेजच्या प्राचार्य पदावरून निवृत्त झालेल्या डॉ.श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेल्या “संगीत ऋणानुबंध” या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात सर्वदूर व्हावेत, याच आम्हा रसिकांच्या ‘खल्वायन, रत्नागिरी’ संस्थेला हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : प्रा.विसुभाऊ बापट. मुंबई .
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800