विविध प्रकारची संग्रहालये ही आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा ठेवा असतो. सांस्कृतिक देवाणघेवाण, इतिहासाचे जतन आणि समाजातील संग्रहालयांचे महत्त्व याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा केला जातो.नांदेड येथील छायाचित्रकार व छायाचित्र संग्राहक विजय होकर्णे या बाबतीत सदैव सक्रिय रहात आले आहेत. त्यांनी “छायाचित्रांच्या माध्यमातून जपलेला समाजाचा जिवंत इतिहास”
आज “न्युज स्टोरी टुडे” च्या माध्यमातुन आपण समजून घेऊ या.
संग्रहालय दिवस हा केवळ प्राचीन वस्तूंच्या जतनाचा दिवस नसून, तो मानवी संस्कृती, इतिहास, परंपरा आणि सामाजिक स्मृती जपण्याचा जागतिक संकल्प दिवस आहे. संग्रहालय म्हणजे केवळ जुन्या वस्तूंचा साठा नसतो, तर तो एका समाजाचा, एका काळाचा आणि एका संस्कृतीचा जिवंत इतिहास असतो. प्रत्येक छायाचित्र, दस्तऐवज, वस्तू किंवा कलाकृती ही पुढील पिढीसाठी इतिहासाची साक्ष बनत असते. त्यामुळे “संग्रह” ही केवळ आवड नसून ती समाजाप्रती असलेली ऐतिहासिक जबाबदारी आहे.

याच दृष्टीने पाहिले तर गेली ४३ वर्षे वास्तवदर्शी छायाचित्रकार म्हणून कार्यरत असलेले विजय होकर्णे यांचे कार्य हे एका चालत्या- बोलत्या दृश्य संग्रहालयासारखेच आहे. आज वर त्यांनी समाजातील विविध घटना, घडामोडी, सांस्कृतिक वारसा आणि बदलत्या काळाची दृश्य नोंद आपल्या कॅमेऱ्यातून अत्यंत संवेदनशीलतेने जतन केली आहे. शासकीय सेवेनिमित्त केलेल्या छायाचित्रणा बरोबरच त्यांनी धार्मिक उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, शास्त्रीय गायनाच्या मैफिली, विविध सभा-संमेलने, सामाजिक चळवळी, मान्यवरांची व्याख्याने, विविध क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण, तसेच भूकंप, महापूर, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आणि मदतकार्याचे वास्तवदर्शी दस्तऐवजीकरण सातत्याने केले आहे. ही छायाचित्रे केवळ बातमीपुरती मर्यादित राहिली नाहीत, तर त्या त्या काळातील समाजजीवनाचा आरसा बनली आहेत.निसर्ग, पशु-पक्षी, वन्यजीव, किल्ले, ऐतिहासिक वास्तू, प्रेक्षणीय स्थळे आणि त्यांचा होत असलेला जीर्णोद्धार यांचे त्यांनी केलेले छायाचित्रण हे पुढील पिढीसाठी अमूल्य दृश्य ठेवा आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू आणि परंपरा काळाच्या ओघात बदलत असताना त्यांचे मूळ स्वरूप छायाचित्रांच्या माध्यमातून जतन करून ठेवणे, ही देखील एक मोठीच सांस्कृतिक सेवा आहे.
छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी योग्य वेळी योग्य प्रसंगांचे महत्त्व ओळखून केलेले दस्तऐवजीकरण हे इतिहास जतन करण्याचे मोठे कार्य ठरले आहे. छायाचित्र प्रदर्शनांच्या माध्यमातून विशिष्ट विषयांचे प्रभावी सादरीकरण करून त्यांनी समाजाला विचार करायला भाग पाडले. प्रसारमाध्यमे, प्रकाशक आणि विविध संस्थांना त्यांनी उपलब्ध करून दिलेला छायाचित्र संग्रह हा अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भांसाठी आजही महत्त्वाचा ठरत आहे.
आज डिजिटल युगात कोणताही क्षण टिपणे सोपे झाले असले, तरी त्या क्षणामागील सामाजिक आणि ऐतिहासिक मूल्य ओळखून त्याचे संवर्धन करणे हे अत्यंत मोलाचे कार्य आहे. विजय होकर्णे यांनी केवळ छायाचित्रे काढली नाहीत, तर त्यांनी एका काळाचा चेहरामोहरा जतन केला आहे. त्यांच्या संग्रहातील प्रत्येक छायाचित्र हे भविष्यातील अभ्यासक, इतिहास संशोधक आणि समाजासाठी एक महत्त्वाचा संदर्भ ठरू शकते.
संग्रहालय दिनानिमित्त त्यांच्या या अविरत छायाचित्र संग्रह आणि संवर्धन कार्याचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. कारण समाजातील वास्तव, संस्कृती, संघर्ष, निसर्ग आणि मानवी भावभावना यांचे जतन करणारा प्रत्येक छायाचित्रकार हा खऱ्या अर्थाने इतिहासाचा संरक्षक असतो.
आजच्या या संग्रहालय दिनी, “छायाचित्र संग्रह” हे देखील समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणारे प्रभावी माध्यम आहे, याची जाणीव अधिक ठळकपणे होते.
चार दशकांहून अधिक काळ सातत्याने वास्तवाचे दस्तऐवजीकरण करणारे छायाचित्रकार व छायाचित्र संग्राहक विजय होकर्णे यांचे कार्य हे निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आणि ऐतिहासिक ठेवा जपणारे आहे. असे हे ऐतिहासिक कार्य सातत्याने करत असल्याबद्दल श्री विजय होकर्णे आणि त्यांचा परिवार निश्चित अभिनंदनास पात्र आहेत.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800