घराच्या उजवीकडे, डावीकडे टिनाचे पत्रे. दक्षिणेकडे, उत्तरेकडे आणि छतावरही टिनाचे पत्रे. घरात पिण्याच्या पाण्याचा नळ नाही. अशा परिस्थितीत अमरावतीच्या साईनगर भागातील अकोली या गरीब वस्तीत राहणाऱ्या कु. प्राजक्ता बारसे ने या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अधिकारी पदापर्यंत जी मजल मारली आहे ती नक्कीच प्रेरणा देणारी आहे.
प्राजक्ता अधिकारी झाल्यानंतर तिचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. त्यानंतर तिचा मला एक एसएमएस आला. सर माझ्या आई-वडिलांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे. आपण आमच्या घरी येऊ शकाल का ? तिच्या आमंत्रणा प्रमाणे तिच्या घरी आम्ही गेलो. आमच्या परिवारातील प्रा. डॉ. शोभा गायकवाड ह्या सोबत होत्या. आम्ही पाहिलं प्राजक्ता ही झोपडपट्टीत राहत होती. आमची गाडी अकोलीच्या बुद्ध विहाराजवळ थांबली. आम्ही प्राजक्ताला फोन केला .प्राजक्ता म्हणाली ,सर तुम्ही तिथेच थांबा .मी घ्यायला येते. तिच्याबरोबर जेव्हा आम्ही तिच्या घरी पोहचलो तेव्हा मला वस्तुस्थितीची जाणीव झाली. याही परिस्थितीवर मात करून प्राजक्ताने जे यश मिळविले ते अमरावतीच्या इतिहासात लिहून ठेवण्यासारखे आहे. प्राजक्ताच्या घरात अभ्यासाला टेबल नाही. लाईन गेली तर पर्यायी व्यवस्था नाही. घर अगदी रोडच्या काठावर .रोडवरून सतत येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ . आई-वडील मजुरी करणारे .घरात दुचाकी वाहन नाही .तरीही याही परिस्थितीवर मात करून अमरावतीच्या साईनगर जवळील अकोली या गरीब वस्तीत राहणारी कु. प्राजक्ता बारसे ही मुलगी अधिकारी झाली आहे. याप्रसंगी मला पद्मश्री बाबा आमटे यांची कविता आठवली, “शृंखला पायीच असू दे मी गतीचे गीत गाईन दुःख झेलण्यास आता आसवांना वेळ नाही”.
प्राजक्ताने विपरीत परिस्थितीची झुंज देऊन जे यश प्राप्त केलेले आहे ते निश्चितच आपल्या सर्वांना भूषणावह आहे. घरात कोणत्याही सुविधा नसताना आजूबाजूला येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ असताना,उन्हात पत्रे गरम होतात आणि पावसाळ्यात पावसाच्या माराने जो आवाज होतो तो आवाज प्राजक्ताच्या अभ्यासाच्या आड कधी आलाच नाही .तिचे फक्त एकच ध्येय होते .मला अधिकारी व्हायचं आहे. माझ्या आई वडिलांची गरिबी दूर करायची आहे. त्यासाठी तिने जीवाचे रान केले. आणि यश प्राप्त करून अधिकारी होऊन आपल्या समाजाचाच नाही तर अमरावती जिल्ह्याचा बहुमान तिने वाढवला आहे .
आम्ही प्राजक्ताच्या घरी पोहोचलो .तिची आई आमच्या स्वागताला समोर आली. साधी सुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी या कवी श्री सुरेश भटांच्या ओळी आठवल्या. त्याची प्रचिती तिच्या आईला पाहिल्यानंतर दिसून येत होती .अतिशय साधी राहणी. आम्हाला तिथे आलेले पाहून तिच्या आईला खूप खूप आनंद झाला. मी प्राजक्ताचे घर न्याहाळत होतो. तिच्या आई वडिलांनी एका खोलीत संसार थाटला होता. कुठेही स्टडी रूम नाही .अभ्यासासाठी टेबल नाही .बसायला चांगली खुर्ची नाही. परंतु प्राजक्ताने आपली पुस्तके ठेवण्यासाठी मात्र एक अलमारी आवर्जून विकत घेतली आहे. मला तिचा अभिमान वाटला .तिच्या त्या खोलीमध्ये ती पुस्तकांची आलमारी उठून दिसत होती . प्राजक्ता बोलत होती .मी ऐकत होतो. तिच्या आईला आदरतिथ्य काय करू असा प्रश्न पडला . मी म्हटले,आईसाहेब फक्त चहा करा. प्राजक्ताला मी म्हटले तू आता अधिकारी झाली. आता तुझी ही गरिबी दूर होईल. त्यावर प्राजक्ता म्हणाली, सर मला इथेच थांबायचं नाही . यापुढच्याही परीक्षा मी देणार आहे .आणि मला पुढे पुढेच जायचे आहे. प्राजक्ताच्या चेहऱ्यावर मला तेज दिसत होते. तिचा चेहरा मला तेजस्वी, तपस्वी व तत्पर वाटत होता. आपल्या गरिबीचा तिला स्वाभिमान होता. आणि त्या स्वाभिमानाने तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकारी पदाची यशस्वी भरारी घेतली. तिच्या घरी नळ नाही .ती शेजारच्या रस्त्यापलीकडे असलेल्या नातेवाइकांकडून पाणी भरते. मी लगेच अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त व माझे मित्र
श्री प्रशांत रोडे साहेबांना फोन लावला .त्यांना वस्तुस्थिती सांगितली. प्राजक्ताशी बोलणे करून दिले. त्यांनी तिचे मनापासून अभिनंदन केले .आणि लवकरच मी तुझ्या घरी भेट देईल असे आश्वासनही दिले. प्राजक्ताला खूपच आनंद झाला .तो आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
आज अमरावतीमध्ये हजारो मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत .त्यांनी प्राजक्ताची भेट घेतली पाहिजे. प्राजक्ताला भेटून तिने जी प्रगती केली आहे, अधिकारपदाची प्राप्ती केली आहे त्याची गुरुकिल्ली जाणून घेतली पाहिजे .
आज गाडगेनगर, राजापेठ भागामध्ये स्पर्धा परीक्षेचे भरपूर प्रमाणात वर्ग आहेत. अनेक मुले मोठ्या मोठ्या महागड्या गाड्या घेऊन फिरताना दिसतात .चांगल्या खोल्या घेऊन राहतात. अनावश्यक खर्च पण करतात. आणि चौकाचौकांमध्ये पानठेल्यावर,गाड्यांवर मुलांचे जत्थेच्या जत्थे उभे राहिलेले दिसतात. परंतु शिव खेरा ज्याप्रमाणे म्हणतात, “जितने वाले कोई अलग काम नही करते वह हर काम अलग ढंग से करते है .”
प्राजक्ताला घरून अमरावतीमध्ये जरी यायचं असेल तर तिच्याजवळ कोणतेही वाहन नाही. एक वर्ष झाले अमरावती महानगरपालिकेची बससेवा स्थगित आहे. ऑटो रिक्षा वाले रिक्षा भरल्याशिवाय ती काढत नाही. अशा परिस्थितीत प्राजक्ताने जे यश संपादन केले आहे ते खरोखरच नोंदणीय आहे .मी त्याला असं म्हणेल, या विपरीत परिस्थितीमुळे ती कदाचित अधिकारी झाली असेल . आईवडिलांची परिस्थिती जवळून पाहिली. प्राजक्ताने आपल्या आईवडिलांची गरीबी पाहून तिच्या परिवारामध्ये वाती पेटविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे . कारण वाहन नसल्यामुळे ती वारंवार शहरात जाऊ शकली नाही .आजूबाजूला फिरायला जागाच नाही .आणि अशा परिस्थितीमध्ये तिने पूर्ण लक्ष आपल्या अभ्यासावर केंद्रित केले .
खरं म्हणजे प्राजक्ता इंजिनियर झाल्यानंतर तिला नोकरी करण्याची संधी होती .परिस्थिती पाहता नोकरी करणे गरजेचे होते. परंतु तिने मनाशी एकच खूणगाठ बांधली होती, ती म्हणजे मी अधिकारी होणारच. आणि तिने जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने आपला पूर्ण वेळ अभ्यासपणाला लावला. आणि आपली जिद्द आपल्या परिश्रमाने सातत्यपूर्ण अभ्यासाने तिने पूर्ण करून दाखवली . जो आत्मविश्वास तिने मनाशी बाळगला आणि त्याप्रमाणे तो पूर्ण करण्यासाठी तिने जो अभ्यास केला त्या अभ्यासाचे फळ म्हणजे तिला मिळालेले अधिकारी पद आहे .
आम्ही घरी आलो .काल निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या कार्यालयातून फोन आला. त्यांनी प्राजक्ताचा नंबर मागितला . फेसबुकवर प्राजक्ताच्या यशाची गाथा पाहिल्यानंतर उपजिल्हाधिकारी साहेबांना राहावले नाही. उपजिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आल्यानंतर प्राजक्ता गहिवरून गेली.मला तिने फोन केला. मी तिला म्हटले ही सुरुवात आहे .तू जे प्रयत्न केले आहेस,अधिकारीपद प्राप्त केलेले आहे . आणि विपरीत परिस्थितीमध्ये प्राप्त केले आहे .ते तुला पुढे पुढे घेऊन जाईल . प्राजक्ताला आपण भेटले पाहिजे .पालकमंत्री, खासदार ,आमदार, लोकप्रतिनिधी, महापौर नगरसेवक तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्राजक्ताला भेटून तिच्या यशाचे रहस्य समजून घेतले पाहिजे .मी खात्री देतो की आपण प्राजक्ताचे घर पाहिले, प्राजक्ताच्या घराच्या आजूबाजूचा गरीब परिसर पाहिला आणि रस्त्यावरचे तिचे घर येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि वर टीनाचे पत्रे . हे सर्व जर तुम्ही पाहिले तर प्राजक्ताला काही फरक पडणार नाही .परंतु तुमच्या जीवनात मात्र नक्की फरक पडणार आहे . फिनिक्स पक्षासारखे तुम्ही राखेतून उठून उभे राहणार आहात .स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जर प्राजक्ताच्या घरी गेले तरी त्यांच्या जीवनामध्ये कलाटणी मिळाल्या शिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे .प्राजक्ता तुला पुढे पुढेच जायचे आहे .
भारतीय घटनेने दिलेला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा संदेश तुला प्रत्यक्ष जीवनामध्ये अमलात आणायचा आहे. सर्व नागरिकांतर्फे माझ्या तुला हार्दिक शुभेच्छा .तुझ्या अधिकारी होण्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या तुझ्या आई बाबांना मनापासून मानाचा मुजरा .
— लेखन : प्रा .डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक, मिशन आयएएस. अमरावती
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
कु. प्राजक्ता बारसे हिचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹