राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांची आज, १ एप्रिल रोजी जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा हा परिचय.
डॉ हेडगेवार यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
हेडगेवार कुटुंब मूळ तेलंगणातील कंदकुर्ती या गावचे. या गावाजवळच गोदावरी, वांजरा आणि हरिद्रा या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. या भागात मराठी, तेलगू आणि कन्नड या भाषांचाही त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. एकेकाळी हे ठिकाण विद्येचे माहेरघर समजले जात होते.
भिक्षुकिचा व्यवसाय करणारे बळीरामपंत आणि त्यांच्या पत्नी रेवतीबाई यांना सहा अपत्ये होती. तीन मुले – महादेव, सीताराम व केशव आणि तीन मुली – सरू, राजू, रंगू. केशव हे त्यांचे पाचवे अपत्य होते. त्यांचा जन्म १ एप्रिल १८८९ रोजी झाला होता.
वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी केशवच्या मातापित्यांचे प्लेगच्या साथीत निधन झाले ; पण त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले अध्ययन चालू ठेवले. त्यांनी नागपूर, यवतमाळ आणि पुण्याच्या विविध संस्थांमध्ये शिक्षण घेतले आणि राष्ट्रीय चळवळीत सहभाग घेतला.
हेडगेवार यांच्यावर लोकमान्य टिळकांच्या जहाल राष्ट्रवादाचा बराच प्रभाव होता. हेडगेवार यांनी १९१० – १९१६ या काळात कोलकाता येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते नागपूर येथे राहू लागले. त्यांनी सर्व आखाडे व व्यायामशाळा यांचे एक चांगले जाळे निर्माण केले होते. यासोबतच राष्ट्रीय चळवळीमध्ये त्यांचा निरंतर सहभाग होताच. १९२१ साली अशाच एका आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना अटक करण्यात येऊन एक वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
एक वर्ष कारावास भोगून जुलै १९२२ मध्ये सुटका झाल्यानंतर हेडगेवार यांचा नागपुरात जाहीर सत्कार करण्यात आला. त्या सभेत हेडगेवार यांच्या तीव्र देशभक्ती आणि निःस्वार्थ सेवेचे कौतुक करण्यात आले.
त्यानंतर डॉ हेडगेवार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्याची आणि त्यासाठी उर्वरित जीवन खर्च करण्याची प्रेरणा मिळाली. २७ सप्टेंबर १९२५ रोजी विजयादशमीच्या दिवशी पू.भाऊजी कावरे, अण्णा सोहनी, विश्वनाथराव केळकर, बालाजी हुद्दार आणि बापूराव भेदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली, तेव्हा हेडगेवार यांचे वय अवघे ३६ होते. त्यावेळेस तरुणांना शारीरिक, मानसिक आणि बौध्दिक दृष्ट्या तयार करून राष्ट्रकार्यासाठी सिध्द करणे हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर होते.
संघाची पहिली दैनंदिन शाखा २८ मे १९२६ रोजी नागपूर येथील मोहिते वाड्यात सुरू झाली. त्याच ठिकाणी आज संघाचे मुख्य कार्यालय आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी १७ एप्रिल १९२६ रोजी डॉ हेडगेवार यांच्या निवासस्थानी एका बैठकीत २६ स्वयंसेवकांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जरीपटका मंडळ आणि भद्रतोध्द्वारक मंडळ या तीन नावांपैकी “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” हे नांव सर्वानुमते मान्य करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ :
सुरवातीच्या दोन दशकांमध्ये रा.स्व.संघ एकमेव संघटना म्हणून कार्यरत होता. त्या काळात देशाच्या सर्व भागांमध्ये दैनंदिन शाखांच्या माध्यमातून स्वयंसेवकांचे एकत्रीकरण करून संघाचे काम वाढवणे यावर भर देण्यात आला होता. दैनंदिन शाखा हीच संघाची जीवनगंगोत्री आहे.
त्यानंतर संघ परिवारात रा.स्व.संघ आणि शिक्षण, शहरी झोपडपट्टी, वनवासी, मजूर, शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी, कला आणि संस्कृती इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या संघटनांचा समावेश होतो. यामध्ये राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, सेवा भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, विद्या भारती, विश्व हिंदू परिषद, प्रज्ञाभारती आदी समाविष्ट आहेत. उपभोक्ता हक्क संरक्षण ते आंतराष्ट्रीय संबंध अशा सर्वच क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यरत आहे.
रा.स्व.संघाचा पाया संघाची शाखा आहे. साधारणपणे ३ ते १० शाखांचे मिळून एक मंडल असते. ५ ते १० मंडलांचे मिळून एक नगर आणि अनेक नगरांचा मिळून एक जिल्हा तयार होतो. तीन ते चार जिल्ह्यांचा मिळून एक विभाग आणि काही विभागांचा मिळून एक प्रांत. तीन ते चार प्रांत मिळून एक क्षेत्र असते अशी संघाची सर्वसाधारण रचना आहे.
आताच्या रचने प्रमाणे रा.स्व.संघाने संपूर्ण देशाचे अकरा क्षेत्रांमध्ये विभाजन केलेले आहे. प्रत्येक क्षेत्राला एक क्षेत्र संघचालक आणि एक क्षेत्र कार्यवाह असतो. क्षेत्रकार्यवाह हा कार्यकारी प्रमुख आणि क्षेत्र संघचालक हा वैधानिक प्रमुख असतो.
रा.स्व.संघाची दोन अधिकार मंडळे आहेत. एक म्हणजे अखिल भारतीय कार्यकारिणी आणि दुसरी अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. अ.भा.प्रतिनिधी सभा संघाचे सर्वोच्च अधिकार मंडळ आहे. यामध्ये संघ परिवारातील सर्व संघटनांचे प्रतिनिधी असतात.
डॉ हेडगेवार यांचे २१ जून १९४० रोजी वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले. डॉ हेडगेवार यांच्याबद्दल तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याची माहिती व महती याबद्दल उत्सुकता असलेल्यांनी दिल्ली येथील श्री अरुण आनंद यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रा.डॉ सतीश देशपांडे यांनी अनुवाद केलेले “समजून घेऊया राष्ट्रीय स्वयंसेवक संघ” हे पुस्तक जरूर वाचावे.
या पुस्तकात रा.स्व. संघाची शाखा, भगवा ध्वज, उत्सव, प्रचारक, प्रशिक्षण शिबिरे, संघ शिक्षा वर्ग, प्रार्थना, रा.स्व. संघाची घटना, रा.स्व. संघाचा स्थापने पासूनचा घटनाक्रम, सरसंघचालक यांच्या संदर्भातील माहिती थोडक्यात दिली आहे.
लेखक श्री अरुण आनंद यांनी रा.स्व.संघाबद्दलचा सखोल अभ्यास करून महत्वाची माहिती दिली आहे. अनुवादक प्रा.डॉ.सतीश देशपांडे ह्यांनी पुस्तकाचा अनुवाद करताना मूळ संहितेशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ काही काळानुरूप वस्तुस्थितिदर्शक बदल केले आहेत.
संघ परिवारातील सर्वांना हे पुस्तक नक्की आवडेलच त्यांनी तर हे पुस्तक खरेदी करून संग्रही ठेवले पाहिजे. जे संघ परिवारातील नसतील त्यांनी हे पुस्तक वाचले तर त्यांचे संघाबद्दल काही गैरसमज असतील तर ते दूर होतील व ते संघाकडे आकर्षित होतील.
इतकेच काय विरोधकांनी हे पुस्तक मनापासून वाचून समजून घेतले तर त्यांच्या विरोधाची धार कमी होईल यात शंकाच नाही. ह्या पुस्तकाचा इतर जास्तीत जास्त भाषेत अनुवाद झाला तर संघाची माहिती व संघाची महती जगभर पसरेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ केशव बळीराम हेडगेवार यांना विनम्र अभिवादन आणि त्यांच्या पश्चात त्यांचे कार्य पुढे नेणारे सर्व सरसंघचालक यांच्यासह सामान्य स्वयंसेवक यांना वंदन. २०२५ साली ही संस्था शंभर वर्षांची होईल. त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा.

– लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
👌🙏छान 🌷👍