महाराष्ट्र आणि पंजाब दरम्यान स्नेहाचे, भक्तीचे बंध निर्माण करणाऱ्या संत नामदेव यांची आज जयंती आहे. त्या निमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न……
संत नामदेवांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावात एका शिंपी परिवारात झाला. वडील दामाशेटी. आई गोणाई. आऊबाई बहीण. अकराव्या वर्षी लग्न झालं ते राजाईंशी. नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल ही चार मुलं. लिंबाई मुलगी. लाडाई, गोडाई, येसाई, साखराई या सुना असा छान संसार त्यांनी केला.
नामदेवांनी देवपिसे होऊन केलेल्या भक्तीला सुरुवातीला विरोध झाला. पण नंतर त्यांनी सगळ्यांना आपलं बनवलं. या सगळ्या परिवारानेच नामदेवांच्या प्रभावात अभंगरचना केली आहे.
अगदी लहानपणापासूनच नामदेव विठ्ठलमय झाले होते. पांडुरंगच त्यांचं सर्वकाही होता. आई बाप सोयरा सखा गुरू देव स्वामी तोच होता. विठ्ठलाशी ते संवाद साधत. या बालभक्ताच्या हट्टापायी विठ्ठलाने दुधाचा नैवेद्य सेवन केला, अशी प्रसिद्ध कथा आहे.
पुढे दगडाचा देव बोल नाही, अशी आपल्या अभंगातून ग्वाही देणा-या नामदेवांनी लहानपणीच अध्यात्मिक क्षेत्रात मोठाच अधिकार प्राप्त केला होता, एवढं मात्र यातून नक्कीच म्हणता येईल. पण नामदेवांची दुसरी कथा यापेक्षाही महत्त्वाची आहे. सुकी भाकरी पळवून नेणा-या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन जाणारे नामदेव, देवाला दूध पाजणा-या नामदेवांपेक्षा महत्त्वाचे आहे. ते लहान वयातच सर्वांभूती भगवंत पाहू शकत होते, हे महत्त्वाचं.
संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.
पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.
नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रगट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला. कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले.
संत नामदेव यांचे सुमारे २५०० अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांनी हिंदी भाषेत जवळपास १२५ पदे रचली. त्यातील ६२ अभंग, नामदेवजीकी मुखबानी शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत.
संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.
संत ज्ञानेश्ववरांच्या भेटीनंतर, इ.स.१२९१ मध्ये संत नामदेवांचे आयुष्य पालटले. अनेक संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्म साक्षात्कार घडवून आणला, असे म्हणतात. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’ अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.
नामदेवांच्या जीवनात एक घटना घडली. एक दिवशी नामदेव बाजारात काही कापडं विकायला निघाले. ते एका दगडावर भजन करत बसले, व आपण कापड विकायला आलो होतो या गोष्टीचा त्यांना अगदीच विसर पडला. काही घटकांनंतर सूर्यास्त झाला व त्यांना आठवण झाली की आपण कापड विकण्या करिता आलो होतो व आता ते विकले गेले नाही म्हणून घरी वडिलांचा ओरडा खावा लागेल. त्यांनी काय केले की ते सर्व कापडं ते ज्या दगडावर बसले होते त्यालाच विकून दिले, म्हणजे की त्या दगडा वरच सोडून दिले, व दूसर्या एक दगडाला हमी द्यायला म्हणून नेमलं की पहिला दगड दूसर्या दिवशी त्यांना पैसे देईल, आणि ते मंदिरात जाऊन बसले.
नामदेवांचे वडिल त्यांच्या मुलाचे हे अद्भुत कार्य ऐकून संतापले व त्यांनी त्या धोंड्याला, अर्थात् त्या दगडाला, महाराष्ट्राच्या काही लोकांमधे धोंड्या हे नाव पण असतं आणायला सांगितले. ज्याने पैसा देण्याची बहादारी दिली होती. दूसर्या दिवशी नामदेव परत बाजारात गेले आणि बघितलं की रात्रभरात सर्वे कापडं तेथून नाहीसे झाले होते, दूसर्या धोंड्याला त्यांनी घरी आणलं, जसे काही त्याने पैसे द्यायला नकार दिला होता असे समजून त्याला एका खोलीत बंद करून ठेवले.
त्या नंतर ते मंदिरात गेले व विठोबाला सर्व हकीकत सांगितली व आपली अडचण पण सांगितली. नामदेवांच्या वडिलांनी त्यांना तो पैसे देण्याची हामी देणारा धोंड्या दाखविण्यास सांगितले, नामदेवांनी उत्तर दिले की त्याला घरात एका खोलीत बंद केलं आहे व स्वतः पुन्हा मंदिराकडे निघून गेले. वडिलांनी जसेच पैसे मागण्या करिता खोलीचं दार उघडलं, समोर सोन्याची एक लगडी बघून ते आश्चर्यचकित झाले. वडिलांना अतिआनंद झाला; पण नामदेवांना याचा लेशमात्र लोभ वाटला नाही. त्यांनी देवाचे फक्त या गोष्टी साठी आभार मानला की त्यांना मार खाण्यापासून वाचवलं.
भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवत धर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे.
ते पंजाब मधे वीस वर्ष राहिले व त्यांनी तेथे अभंगांची रचना केली जी सिख आदि ग्रंथांमधे देखील आहे.
पंजाब मधील घुमान येथे शीख बांधवानी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्ढा, विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत.
राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. त्यांची समाधि ‘नामदेव पायरी’ म्हणून ओळखली जाते.
कांसवीची पिलीं राहती निराळीं । दृष्टि पान्हावली सुधामय॥ जैसा जवळूनि असेन मी दुरी । दृष्टि मजवरी असो द्यावी ॥ तान्हें वत्स घरीं वनीं धेनू चरे । परि ती हुंबरे क्षणोक्षणा ॥ नामा म्हणे सलगीनें करितों मी निकट । झणें मज वैकुंठ पद देसी ॥
अशा या थोर संतकवीने ३ जुलै १३५० रोजी पंढरपूर येथे आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता केली. त्यांना मनःपूर्वक वंदन.
– लेखन : विजय पवार
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.
संक्षिप्त नामदेव चरित्र फार सुंंदर!
छान चरित्र. कुत्र्याच्या पाठीमागे संत एकनाथ तुपाची वाटी घेऊन पळाले होते .असं माझ्या वाचनात आलं आहे.
आदरणीय संत नामदेव यांच्या पुण्यतिथी निमित्त निमित्ताने विजय पवार यांनी लिहिलेला लेख वाचला आहे.. लेखनातून संत नामदेवांचे जीवन कार्याची ओळख जवळून झाली. त्यांच्या कार्यापासून आपण प्रत्येकाने प्रेरणा घेणे आवश्यक आहे. न्यूज स्टोरी टुडे चे मनपूर्वक अभिनंदन…
संत नांदेवसनच्या भक्ती चे रसाळ वर्णन छान वाटले.