Sunday, September 8, 2024
Homeसाहित्यसंध्यारंग

संध्यारंग

गेली अनेक वर्षें कॅनडात स्थायिक झालेल्या लेखिका आणि समुपदेशक स्मिता भागवत यांनी किंडल वर लिहिलेल्या “संध्यारंग” पुस्तकातील अनुकरणीय प्रस्तावना येथे देत आहे.
लेखिकेचा परिचय smitabhagwat.com वेब पेजवर उपलब्ध आहे……संपादक.

साहित्यप्रेमी रसिकहो,
मी स्मिता भागवत.
माधवबाग इन्स्टिट्युट ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिऑलॉजी ही विख्यात संस्था आहे. पुढे संस्थेनं ह्रदयापुरतं हे कार्य सीमित ठेवलं नाही. समस्त आरोग्यास महत्व देण्यास दैहिक आणि मानसिक समस्यांच्या निराकरणाचा विचार केला.

त्यांचं मुखपत्र ‘आरोग्य संस्कार‘ या मासिकात २०१९ साली मी ‘संध्यारंग‘ हे सदर लिहिलं. सदराचा हेतू ज्येष्ठ नागरिकांच्या मनातील नकारात्मक विचार दूर करून आशावाद निर्माण करण्यास मार्गदर्शन करण्याचा आहे, असं मला सांगण्यात आलं होतं ! म्हणजे ते सदर होतं ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्याच्या संवर्धनासाठी ! समाजात खूप सशक्त पुरुष निवृत्त होताच म्हातारे दिसू लागतात. कार्यरतता संपली की आलेलं रिकामपण त्यांना झेपत नाही.

नोकरी करणाऱ्या स्त्रियाही नोकरीतून निवृत्त होतात. तरी त्यांना घरकामातून सहसा निवृत्त होता येत नाही ! नोकरी संपल्यानं त्यांच्या कामात घट होतेच. पण वाढत्या वयात शक्ती घटलेली असते. कामाचा उरक मंदावतो. थकवा दुपारच्या विश्रांतीची गरज निर्माण करतो. म्हणजे समस्या निर्माण करण्याइतकं रिकामपण त्यांना सोसावं लागत नाही.

रिकामपण झेलू न शकणारा पुरुष बरेच ठिकाणी त्रासदायक झालेला दिसतो. स्वतःस कुटुंबप्रमुख समजून तो हुकूमशहा बनतो. मुळात प्रेमळ असला तरी ! या वर्तनाचा कामात असणाऱ्या त्याच्या स्वकीयांना त्रास होतो. म्हणून समाजासमोर सेकंड इनिंगचा आनंद घेणारी उदाहरणं ठेवणं मला योग्य वाटलं.

१९८३ पासून मी कुटुंब समुपदेशन क्षेत्रात आहे. म्हणून रिकामपणाच्या त्रस्ततेवर समुपदेशनाचा उतारा शोधून आनंदानं जगू लागलेल्या ज्येष्ठांच्या कहाण्यांचा माझ्याकडे साठा आहे ! समुपदेशकाचा विचार डावलणाऱ्या नि हट्टाग्रहामुळे जीवनाचा उत्तरार्ध नासवलेल्या ज्येष्ठांच्या कहाण्याही आहेत.

हे करा नि ते करू नका, – Dos and dont’s ची रुक्ष यादी देणं मला नाही आवडत ! कारण माझं संगोपन वेगळ्या रीतीनं झालं आहे. माझे वडील उपदेश करत नसत ! ते स्वतःस आमचे वडीलधारे मित्र म्हणवत ! गप्पा हेतुपूर्ण करून संवाद साधण्याची त्यांची शैली ! ती बघत आम्ही भावंडे मोठी झालो ! साध्या गप्पातून कष्ट आणि कसरतीतील फरक त्यांनी आम्हाला बालपणीच समजावला.

तसे ते स्वत:चं आरोग्य जपून होते. त्यांनी वैचारिक बाळगुटीत वाचन-लेखनाची आवड भरली. संस्कारक्षम वयात माझ्या कोवळ्या हातात लेखणी देऊन त्यांनी लेकीचा हात लिहिता केला. त्यांच्या अनेक लाडक्या अवतरणांनी माझ्या काळजात घर केलं आहे ! कदाचित म्हणून…. माझ्या मित्र परिवारात ५-६ वर्षांच्या बालकांपासून नव्वदी पार केलेले ज्येष्ठही आहेत. मीही आदेशात्मक बोलत वा लिहित नाही !

माझा पिंड कथाकाराचा !
मला कथेच्या माध्यमातून वास्तव उलगडणं हिताचं वाटतं. म्हणून या सदरात सुखी ज्येष्ठांप्रमाणे त्रस्त ज्येष्ठांच्या कथा सादर करण्याचा विचार मला योग्य वाटली ! वाचकांना त्रस्ततेचं कारण आणि सुखी जीवनाची गुरुकिल्ली या कथानकात आपसूक गवसणं अधिक परिणामकारक ठरेल, असं मला वाटलं ! ‘सूज्ञास सांगणे न लगे’, या उक्तीवर आहे माझा खूप विश्वास ! म्हणून या सदरात मी समुपदेशनाचे किस्से छोटेखानी कथानकात सादर केले. अर्थात समुपदेशनातील खासगीपण – प्रायव्हसीचं पावित्र्य जपण्यास मुळातील नावं नि स्थळं बदलून !

वाढत्या वयात बऱ्याच ज्येष्ठांचे डोळे दुबळे होतात. ते लवकर थकतात. मग इच्छा असूनही वाचन होतं त्रासदायक ! म्हणून या कथांच्या संकलनाच्या छापील प्रकाशनासोबत ध्वनी पुस्तिकाही (ऑडियो बुक) करावी, असा विचार माझ्या ९० वर्षीय वाचकमित्रानं मांडला. “असं संकलन फक्त ज्येष्ठांसाठी उपयुक्त ठरेल, असं नाही !” ते उत्तेजित स्वरात म्हणाले, “हल्ली तरुणांच्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल झाला आहे. पती-पत्नी दोघं बाहेर काम करतात. म्हणून समंजस दांपत्य हल्ली घरकामही मिळून करतात. त्यामुळं वेगवान जीवनात वाचण्यास वेळ मिळत नाही. अशा तरुणाईला हल्ली नॉन प्रॉडक्टिव्ह काम करताना ऑडियो बुक ऐकणं आवडू लागलं आहे.

आजचे तरुण असतात उद्याचे ज्येष्ठ नागरिक ! त्यांनी अशा कथा ऐकणं, हा योग्य वयात निवृत्तीकाळासाठी केलेला विशेष अभ्यास ठरेल ! निवृत्त जीवनात येणाऱ्या रिकामपणाचा ते वेळीच विचार आणि तयारी करतील. पुढच्या आयुष्याचा विचार न करता निवृत्त झालेल्या आजच्या काही ज्येष्ठांना, रिकामपण जाचक ठरलं. असे त्रासलेले ज्येष्ठ, इतराना त्रस्त करणारच ! आजच्या तरुण पण भावि ज्येष्ठांनी अशा कथा ऐकल्या असतील, तर ते येणाऱ्या रिकामपणाचं आयोजन करून त्रस्ततेस दूर ठेवतील !”

मला हा विचार आवडला. कारण मला नवे नवे प्रयोग करणं आवडतं. पण ऑयो बुक करण्याचा प्रयोग यशस्वी होईतो हे पुस्तक किंडलवर प्रकाशित करावं असं मला वाटलं. कारण किंडलवरील पुस्तकं तरुण साहित्यप्रेमी वाचक प्रवासात वाचू शकतात. या पुस्तकातील अक्षर मोठं करून वाचण्याची सोय असल्यानं ज्येष्ठांचीही सोय होईल. पुस्तक हातात घेऊन वाचता न आलं तरी पुस्तक वाचण्याचा आनंद त्यांना लाभेल.

आताची पिढी कसोशीनं आरोग्य जपते. आपल्या आधीची पिढी चाळीशीत वृद्ध दिसू लागे. क्वचित कुणाचा एकसष्टीचा सोहळा संपन्न होत असे. आपल्या पिढीतील समंजस ज्येष्ठ ‘साठ सालके बुढे ? नही, साठ सालके जवान !’ ठरले. काही ज्येष्ठ ऐशीचा थांबा ओलांडल्यावरही ताजे टवटवीत दिसतात. जबाबदारी संपल्यावर मिळणारी वर्षं बोनस समजून पहिल्या इनिंगमध्ये जबाबदाऱ्या पेलताना न जमलेले छंद जोपासणं त्यांना जमू लागलं आहे.

आपल्या संतांनी जगास ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार दिला. ‘हे विश्वची माझे घर;’ असं मानणाऱ्या द्रष्ट्या संतांनी विशद केलेलं भविष्य, आज ‘ग्लोबल व्हिलेज’च्या रुपात आपला वर्तमान बनलं आहे. पूर्वी अशक्यप्राय वाटणारी अंतरं आपण सहज नि वारंवार ओलांडत विश्वसंचार करत आहोत. जगास वैश्विक खेडे नि वसुधेस कुटुंब मानून संतांची भविष्यवाणी वास्तवात जगत आहोत. म्हणून या संकलनात केवळ भारतातील कथानकं मी दिलेली नाहीत.

जरा मोठ्या असलेल्या दोन परदेशी उदाहरणांचाही या संकलनात मी सामावेश केला. या आगळ्या वेगळ्या पुस्तकात लेखिकेचा परिचयही पारंपारिक पद्धतीनं न देता मी शेवटी मला काही सांगायचं आहे, या लेखात वेगळ्या रीतीनं दिला आहे.

या पुस्तकामुळे हट्टाग्रहानं दुःखी झालेल्या काही ज्येष्ठांना उपरती झाली आणि तरुणाईनं भावि रिकामपणाचं आयोजन करून जीवनाचा पोत तलम केला, तर मला खूप आवडणार आहे. याच भावनेचं हे फलीत !

स्मिता भागवत

– लेखिका : स्मिता भागवत, टोरांटो, कॅनडा
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments