Homeसाहित्यसंवादभूषण : दाद 4

संवादभूषण : दाद 4

श्री.देवेंद्र भुजबळ लिखित, ग्रंथाली निर्मित आणि न्यूज स्टोरी टुडे प्रकाशित, ‘संवादभूषण‘ हे पुस्तक वाचले. लेखक भुजबळ सरांची इतरही अनेक प्रेरणादायक जीवनप्रवास असलेली पुस्तके माझ्या वाचण्यात आली आहेत. ह्या पुस्तकाविषयी लिहिताना, लेखकाच्या जीवनाची छाप त्यावर पडलेली स्पष्ट दिसते.

सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या लेखकाने, बहुराष्ट्रीय कंपनीची आर्थिक दृष्ट्या आकर्षक असलेली नोकरी जाणीवपूर्वक सोडून, पत्रकारितेच्या क्षेत्रात जीवनभर कार्य केले.
महाराष्ट्र राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील, संचालक या महत्त्वाच्या पदावरून निवृत्त झाल्यावरही, पत्रकारितेचा एक महत्त्वाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून समाजप्रबोधनाच्या भूमिकेतून आपल्या कुटुंबियांसमवेत ‘न्यूज स्टोरी टुडे’ हे स्वतंत्र वेबपोर्टल सुरू केले. ह्या वेबपोर्टलच्या वाटचालीचा मी एक साक्षीदार आहे.

भुजबळ सर महाराष्ट्र राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या सेवेत असतानाच्या काळातही माझा त्यांचा परिचय होता. लेखणीच्या माध्यमातून, समाजप्रबोधन करताना, ‘शब्दांचीच शस्त्रे यत्न करू’ ह्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या विचारांपासून ते कधीच दूर झाले नाहीत.
विशेषत: वेबपोर्टलचा प्रवास पाहिला तर, त्यातील प्रत्येक साहित्यविचार हेच दर्शवतो. विविध साहित्यिक रचनांना प्रसिद्धी देताना, समाजासाठी उपयुक्त व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनाही ते आपल्या पोर्टलवरून सतत प्रकाशित करतात. पोर्टलच्या इतर उपक्रमांतूनही सामाजिक बांधिलकी स्पष्ट दिसून येते.

भुजबळ सरांनी विपूल लेखन केले आहे. ‘मी का लिहीतो ?’ या प्रश्नावर ते म्हणतात, “माझे लेखन हे समाजासाठी उपयुक्त होईल का ?” हा त्यांचा लेखनाचा निकष सर्वात उच्च मूल्यांची साक्ष देते. त्यांचे जवळपास १६८ पृष्ठे असलेले ‘संवादभूषण’ पुस्तक हे याच स्वरूपाचे आहे. समाजात पत्रकारिता, प्रसारमाध्यमे,वसमाजाभिमुख आणि समाजोपयोगी उपक्रम राबवणारे, साहित्यिक इ.क्षेत्रातील ३३ विविध व्यक्तींच्या जीवनकार्याचा आढावा या पुस्तकात घेतला आहे.

संवाद (communication) हे सजीवांचे वैशिष्ट्य असते. संवादांमुळे मानवाने अमूलाग्र क्रांति केली आहे. पृथ्वीवरील मानवाची निर्मिती झाली तेव्हा तो भटक्या अवस्थेत रहात होता. पृथ्वीवरील इतर सजीवांपेक्षा मानवाने आपल्या बुध्दीच्या सामर्थ्याने नेत्रदीपक प्रगति केली.
त्याचबरोबर अनेक विनाशक बाबीही केल्या. कोरोनासारख्या जीवघेण्या संकटातून अवघ्या पृथ्वीला माणसानेच वाचवले. तसेच आजवर झालेली दोन महायुद्धे आणि सध्या जगभर चाललेली युध्दे याला माणूसच जबाबदार आहे.

आपल्या बुध्दीमत्तेचा वापर मानवजातीच्या विकासासाठी करायचा की, विनाशासाठी हे ठरवण्यात संवादाची भूमिका मोलाची असते. या दृष्टिकोनातून या पुस्तकाचे शीर्षक (संवादभूषण) हे समर्पक वाटते. पुस्तकातील भाषा ओघवती असल्याने, त्यातील कोणताही लेख रटाळ वाटत नाही. या पुस्तकात माझ्यावरही लिहिले आहे. मात्र, इतरांचा जीवनप्रवास वाचताना, आपल्यातील न्यूनपणाची जाणीव होते आणि आपणही त्यांच्याप्रमाणेच समाजासाठी काहीतरी करावे अशी प्रेरणा मिळते.

सतीश शिरसाट

— लेखन : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. लंडन
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments