“विद्यार्थ्यांना घडवण्याची किमया शिक्षक करत असतो. आपला पाल्य व्यवहाराच्या बाजारात यशस्वी व्हावा म्हणून पालक त्याला रेसच्या घोड्यासारखे हाकत असतो. अशा वेळी त्यांची संवेदनशीलता कशी टिकून राहील, यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याचे मत जोशी – बेडेकर महाविद्यालयातील मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा. डॉ. संतोष राणे यांनी व्यक्त केले.
ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या वर्तक नगर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर ते नगर वाचन मंदिरात ते बोलत होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘कवितेतील आनंदानुभव’ या विषयावर ते बोलत होते. वाचक प्रेरणा दिनानिमित्त ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या वर्तकनगर माध्यमिक विद्यालय आणि नगरवाचन मंदिराच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमशील शिक्षिका मानसी सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने शाळेतील साठ विद्यार्थ्यांना पुस्तके वाचनासाठी सभासदत्व देण्याचा अभिनव उपक्रम पार पडला.

यावेळी व्यासपीठावर नगरवाचन मंदिराचे उपाध्यक्ष प्रकाश कासार, कार्यवाह हेमंतकुमार दिवेकर, मुख्याध्यापिका वर्षा हरदास, मानसी सूर्यवंशी, मोहिनी वैद्य, वीणा चव्हाण, अदिती वाघ, सायली चव्हाण उपस्थित होते.
अनेक नामवंत कवींच्या कवितांची उदाहरणे देऊन डॉ. राणे पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या आयक्यूसोबत इक्यू वाढवणे गरजेचे आहे. सभोवतालच्या प्राणीमात्रांविषयी, निसर्गाविषयी, माणसांविषयी, समाजाविषयी जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होणार नाही, तोपर्यंत त्याने घेतलेले ज्ञान पुस्तकीच राहिल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात संवेदनशीलतेचे झरे निर्माण करण्याची नितांत गरज आहे. हे झरे साहित्यामुळे निर्माण होऊ शकतात.”

या वेळी विद्यार्थ्यांनी वाचनावर आधारित ‘वाच ग घुमा’, शारदेची प्रार्थना, स्वागतगीत अभिनवरित्या सादर केले.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800