साहित्य आणि संशोधन प्रेमी भगिनी मंडळाच्या संशोधन विभागाचा रौप्य महोत्सव आणि स्त्री साहित्य संमेलन, पुरस्कार वितरण असे अविस्मरणीय अभिनव साहित्य संमेलन नुकतेच पुणे संपन्न झाले.
“साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या संशोधन विभागाला आज 25 वर्षे होत आहेत आणि त्यानिमित्त आम्ही हाती घेतलेल्या एका विशेष प्रकल्पाला पुस्तक रूपाने प्रकाशित करत आहोत” असे जाहीर करून साहित्यप्रेमी मंडळाच्या संशोधन विभाग प्रमुख डॉ.मंदा खांडगे यांनी संस्थेने आजवर केलेल्या संशोधनाचा आढावा घेतला. “आज प्रकाशित होणाऱ्या ग्रंथास अनेकांचा हातभार लागला आहे. १४ राज्यातील विविध संशोधकांनी तेथील समाजसुधारकांबद्दल आणि स्त्री साहित्याबद्दल माहिती पुरवली म्हणून आज आम्ही हा प्रकल्प सिद्धीस देऊ शकलो” असे ऋणही त्यांनी व्यक्त केले.
या प्रकल्पासाठी संशोधन करताना या महिला संशोधकांनी भारताच्या निरनिराळ्या प्रांतातील आसाम, उत्तर प्रदेश, ओरिसा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, गुजराथ, तामिळनाडू, पंजाब अशा निरनिराळ्या प्रांतातील साहित्याचा मागोवा घेऊन त्या त्या प्रांतातील समाज सुधारकांचे आणि विचारवंतांचे कामही अभ्यासले. स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वांचा व साहित्याचा १८०० ते २००० मध्ये झालेला विकास, विविध साहित्य प्रवाह, स्त्रियांच्या प्रगतीसाठी झालेले कायदे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन हा प्रकल्प पुस्तक रूपाने साकारला आहे. संपादक म्हणून डॉ. स्वाती कर्वे, डॉ. विद्या देवधर आणि डॉ. कल्याण दिवेकर यांनी संशोधन विभागाच्या प्रमुख डॉ. मंदा खांडगे यांच्यासह काम केले. शलाका माटे यांनी संपादन सहाय्य केले आहे.
या प्रकल्पाचे पुस्तकरूपाने प्रकाशन नुकतेच पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे भरलेल्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या ३८ व्या साहित्य संमेलनात करण्यात आले. या स्त्री साहित्य संमेलनाचे व रौप्यमहोत्सवाचे उदघाटन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ऑनलाईन पद्धतीने केले.
पहिल्या सत्राचे प्रमुख आकर्षण होते ‘भारतीय समाज सुधारक आणि विचारवंत यांचे स्त्रियांच्या विकासातील योगदान’ (१८०० ते २०००), अशा शीर्षकाने प्रकाशित झालेल्या ग्रंथाचे प्रकाशन ! या समारंभाच्या अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखिका डॉ. मीना वैशंपायन, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे डॉ.राजा दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्ष डॉ. उज्ज्वला गोखले, कार्यकारी विश्वस्त डॉ. मंदा खांडगे व विश्वस्त डॉ. नीलिमा गुंडी उपस्थित होत्या.
‘स्त्रियांच्या साहित्याचा वेगळा विचार करायलाच हवा का ?’ असा प्रश्न बऱ्याचदा उपस्थित केला जातो. यावर प्रमुख पाहुणे डॉ. राजा दीक्षित यांनी सांगितले की, “जीवशास्त्राच्या दृष्टीतून पाहिल्यामुळे नव्हे तर लिंगभावामुळे स्त्री साहित्यिकांना आपली वेगळीच चूल मांडावी लागते. भारतातच नव्हे तर पाकिस्तानात देखील स्त्रीवादी लेखिका आहेत. पाकिस्तानी स्त्रियांनी लिहिलेल्या स्त्रीवादी कवितांचे पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे.”
प्रकाशनप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. मीना वैशंपायन यांनी पुस्तकांचे महत्व विषद केले आणि सांगितले “गेल्या हजारो वर्षांमध्ये मानवी संस्कृतीच्या ज्ञानाच्या संवर्धकाची भूमिका पुस्तकांनी घेतली आहे. ग्रंथालये आणि वस्तुसंग्रहालये ही संस्कृतीचे जतन करणारी कोल्ड स्टोरेजेस आहेत. त्यातील कोणताही घटक पुन्हा सचेतन होऊ शकतो. पण एकूणच पुस्तकांमधून मिळणारा आनंद हा तुमचा एकट्याचा, कोणावरही अवलंबून नसणारा आणि निर्मळ असा असतो.” संशोधन विभागातील महिलांनी तयार केलेल्या पुस्तकरूपी प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. प्रकाशनप्रसंगी त्यांनी या प्रकल्पाची प्रशंसा करून भारतात असे काम करणारे हे पहिलेच भगिनी मंडळ असावे कौतुक करून “भारतातील अनेक प्रांतातील स्त्री साहित्याचा मागोवा आपल्या भगिनी मंडळाने घेतला. तसेच सर्व भारतीय भाषांबद्दल आपण भगिनीभावही ठेवला पाहिजे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने पुढील प्रकल्प करताना जागतिक पातळीवर काम करून निरनिराळ्या देशातील स्त्री साहित्याचा अभ्यास हाती घ्यावा. त्यांची क्षमता पाहून ही झेप ते घेतील असा विश्वास वाटतो.” अशा मौलिक सूचना केल्या.
प्रा. मिलिंद जोशी यांनी पुस्तकावर बोलताना, हा स्त्रियांच्या संशोधन प्रगतीचा एक टप्पा असल्याचे म्हटले आहे. “भारतात विविधतेत एकता आहे असे आपण नेहेमी म्हणतो. पण विविध प्रांतातील स्त्रियांच्या प्रश्नांबाबतही एकता असावी असा उलगडा या प्रकल्पामुळे झाला. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने कोणत्याही अनुदानाशिवाय हा प्रकल्प सिद्धीस नेला आणि अतिशय एकाग्रतेने काम केले असे दिसून येते. इतकं पायाभूत काम करणारी दुसरी संस्था भारतात सापडणार नाही.”
उदघाटन सोहोळ्यात विविध साहित्य पुरस्कारांचेही वितरण झाले. सुप्रसिद्ध लेखिका डॉ. प्रतिभा इंगोले यांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल ‘काव्ययोगिनी’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तर आत्मचरित्रासाठी असलेला पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजया वाड यांच्या ‘माझी गोष्ट’ या पुस्तकाला जाहीर झाला. डॉ विजया वाड यांच्या वतीने त्यांच्या भाचीने हा पुरस्कार स्वीकारला.
गिरीजा कीर पुरस्कृत ललित लेख संग्रह पुरस्कार ‘मन सजल घन’ या पुस्तकाबद्दल मृणालिनी चितळे यांना देण्यात आला.
कै. इंदिरा गोविंद पुरस्कृत बालसाहित्याचा पुरस्कार कवयित्री व लेखिका प्रतिभा सराफ यांच्या ‘मिठू मिठू’ या पुस्तकासाठी जाहीर झाला.
साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने वर्षभर निरनिराळ्या स्पर्धाही घेतल्या होत्या. त्यापैकी लघुकथा स्पर्धेत ‘नातं’ ही आरती जावडेकर यांची कथा प्रथम पारितोषिक विजेती ठरली. तर ‘फरक शंभर रुपयाचा होता पण’ ही रेणुका सूर्यवंशी यांची कथा द्वितीय पुरस्काराची मानकरी ठरली.
ललितलेखासाठी असलेला पुरस्कार डॉ. रेखा दुभाषी यांना मिळाला.
विद्यार्थ्यांमधून साहित्यप्रेमी निर्माण व्हावे व त्यांच्यातील कवींना प्रोत्साहन मिळावे यासाठी या भगिनी मंडळाने संस्थेच्या संस्थापक कै. संजीवनी मराठे यांच्या स्मरणार्थ काव्यसादरीकरण स्पर्धा घेतली होती. त्याचेही पुरस्कार वितरित करण्यात आले. तसेच उत्तम काम करणाऱ्या शाळांनाही पुरस्कार देण्यात आले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात सामाजिक संवेदनशीलता असलेल्या कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या. सुप्रसिद्ध कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी विविध क्षेत्रातील महिलांशी सहृदयतेने संवाद साधून हा कार्यक्रम सादर केला. पत्रकार हिना कौसर खान यांनी आपल्या मुलाखतीतून मदरसा आणि तलाक प्रक्रियेबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.
ज्येष्ठ लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांनी आपल्या नाट्यलेखनाची प्रेरणा व प्रक्रिया यावर भाष्य केले.
तर ब्रेल लिपीमध्ये १३८ पुस्तके ज्यांनी लिहिली आहेत त्या सरोज टोळे यांनी आपल्या सहजसुंदर शैलीत आपल्या लेखनाच्या वाटचालीबद्दल सांगितले. ‘ब्रेल लिपीला आपण अनभिज्ञ होतो. पण ती शिकल्यानंतर इतर महिलांनाही त्यात प्रवीण करू शकलो. हे आपल्या आयुष्यात सहजच घडले.’ असे त्या म्हणाल्या. सरोज टोळे यांनी लिहिलेल्या एकूण साहित्यप्रकारांचा आणि लेखनाचा आवाका पाहून सर्व सभासद महिलांनी टाळ्या वाजवून त्यांना गौरविले.
तिसऱ्या सत्रात आश्लेषा महाजन यांचा ‘अनवाणी ते कॅटवॉक’ हा नाट्यसंहिता व काव्य सादरीकरणाचा कार्यक्रम छान रंगला.
सदर साहित्य संमेलनासाठी व संस्थेच्या इतर उपक्रमांसाठी संस्थेच्या विश्वस्त मंजरी ताम्हनकर, डॉ. नीलिमा गुंडी व डॉ. ज्योत्स्ना आफळे व इतर पदाधिकारी चंचल काळे, कविता मेहेंदळे, शलाका माटे, यामिनी रानडे, वैशाली मोहिते तसेच कार्यकारिणी सदस्या अंजली कुलकर्णी, आरती देवगावकर, डॉ. कीर्ती मुळीक, रंजना फडणीस, पल्लवी पाठक व स्वाती यादव यांनी काम केले.
– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळ’ हे नाव अगदी समर्पक असल्याचा पुरावा हा लेख वाचून मिळाला. उत्तम संकल्पना आणि ती प्रत्यक्ष अंमलात आणणे या दोन गोष्टी साधल्यामुळे या कार्यक्रमाचे स्वरूप व्यापक झाले आहे. हा वृत्तांत समोर वाचनात आणून news story आणि मेघना ताई यांनी मोठा कार्यभाग साधला आहे.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन 💐
मनापासून अभिनंदन… अभिनव उपक्रम. अनेक शुभेच्छा
मेघनाताई, एका सुंदर अश्या कार्यक्रमाचा आढावा आपण घेतला आहे. संमेलनातील सर्व सत्रा विषयी मुद्देसूद लिहिले आहे. एका सुंदर क्षणाचे आपण साक्षीदार झालो याचा आनंद आहे. आपली भेट ही विशेष आनंददायी ठरली.
मेघना साने फारच छान मांडणी केली आहे.स्रियांचे विविध क्षेत्रातले योगदान समोर आले आहे.
धन्यवाद मॅडम!
साहित्यप्रेमी भगिनी मंडळाला ३८वर्षे पूर्ण हेच फार अभिमानाची बाब आहे आणि त्या माध्यमातून साहित्य प्रेमी सखींना एक मोठा अविस्मरणीय मंच निर्माण करून देणे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं साहित्य प्रेम जपत प्रोत्साहन देत त्यांना वेळोवेळी साहित्याच्या माध्यमातून उत्तुंग झेप घेत स्व: कर्तृत्वाचा ठसा उमटवून
नवनवीन कलाकृती साहित्य निर्मिती घडणे ही खूप अभिनंदनीय बाब आहे आणि अशा या अनोख्या अविस्मरणीय कार्यक्रमाचा यथोचित सुंदर आढावा आदरणीय मेघना मॅडम यांनी आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल सर्व सत्कार मूर्ती आणि मेघना मॅडम यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.मनपूर्वक अभिनंदन सर्वांचे आणि पुढील कार्यास अनंत अनंत हार्दिक शुभेच्छा.
मेघना साने यांनी अगदी सविस्तरपणे आपल्यासंस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन 38 व्या स्त्री साहित्य संमेलनाचा वृत्तांत लिहिला आहे,त्याबद्दल धन्यवाद.💐💐
मेघना साने यांनी अगदी सविस्तरपणे आपल्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन ३८व्या स्त्री साहित्य संमेलनाचा वृत्तांत लिहिला आहे,त्याबद्दल धन्यवाद .👌👌👍
मेघना साने यांनी लिहिलेल्या वृत्तांतामुळे साहित्य आणि संशोधन प्रेमी भगिनी मंडळाचे कार्य, त्याची ओळख झाली आहे. सर्व उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत. स्त्रीची भूमिकाच वेगळी असल्यामुळे स्त्री लेखकांचा, त्यांच्या साहित्याचा विचार होणं हे अत्यंत आवश्यक आहे. या कल्पनेचा परी घ आणखीन विस्तारत जावो हीच सदिच्छा.
धन्यवाद सुचित्राताई !तुमचेही लोकसत्ता मधील आर्टिकलस् आम्ही वाचत होतो.
तुम्ही आमच्याशी संवाद साधून ,आम्हाला त्या कार्यक्रमात आमंत्रित केलेत म्हणून धन्यवाद!
मेघनाताई खूपच छान आढावा घेतला आहे त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल सविस्तर समजले असेच संमेलन ठाण्यातही व्हावे
मेघनाताई खूपच छान आढावा घेतला आहे त्यामुळे या कार्यक्रमाबद्दल सविस्तर समजले तसेच फोटो टाकल्यामुळे जणू काही तिथेच आहोत असे वाटले खूप छान असं संमेलन ठाण्यातही व्हायला हवंय
फारच सुंदर सविस्तर आणि नेटका वृत्तांत दिला आहे. योग्य ती छायाचित्रे वापरून सुंदर मांडणी केली आहे.
साहित्य प्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने मेघना ताई आणि news story’.com ला खूप खूप धन्यवाद .
‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळ’, पुणे येथे झालेल्या कार्यक्रमाचा अतिशय उत्तम आढावा मेघना साने यांनी घेतला आहे.
प्रतिभा सराफ
धन्यवाद प्रतिभा!! तुमच्यामुळेच या सोहळ्याचे साक्षीदार होता आले.
तुम्हाला पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन!
वा, मराठी साहित्य क्षेत्रात अतिशय प्रेरणादायी कार्य करणाऱ्या आदरणीय लेखकांचा यथोचित सत्कार आणि त्याचे उत्तम शब्दांकन.👌👌 पुरस्कार प्राप्त सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि ते अमच्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल मेघनाताई आणि News Story चे आभार.💐💐💐💐
धन्यवाद नूतनताई!