‘मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणीच मदतीचा हात द्या !’ मनोरुग्णांच्या आयुष्याचा ‘नंददीप’ तेवत ठेवण्यासाठी हवाय मदतीचा ‘स्नेह’
मागे वळून बघताना…
घराबाहेर पडल्यावर एखादेवेळेस मनोरूग्ण दिसताच आपली पावलं थबकतात. मनात पहिला विचार येतो, कुठून हा ‘पागल’ आपल्याला आडवा आलाय ? त्याच्याबद्दल करूणा, प्रेम, दया हे भाव मनात उमटण्याऐवजी घृणा, द्वेष, राग या भावना जागृत होतात. दुर्दैवाने आपल्या घरात कोणी असा मनोरूग्ण असेल तर त्याच्यापासून कुटुंबाची सुटका कशी करून घ्यायची, हाच प्रश्न अनेकांना भेडसावत असतो.
मग अनेकजण आपल्यातीलच एक असणाऱ्या या मनोरूग्णास घरापासून कुठेतरी दूर, अनोळखी प्रदेशात सोडून येतात. तर कित्येकदा हे मनोरूग्ण आपल्याच तंद्रीत घरापासून दूर निघून जातात. अशा मनोरूग्णांना रस्त्यात, रस्त्याच्या कडेला, बसस्थानक, रेल्वेस्थानक इत्यादी ठिकाणी विमनस्क अवस्थेत फिरताना आपण बघतो आणि दुसऱ्याच क्षणी आपल्या कामाला लागतो. मात्र संत गाडगेबाबांच्या विचाराची कास धरून ‘मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणीच मदतीचा हात द्या !’ असा कृतीशील संदेश देत मनोरूग्णांच्या निरपेक्ष सेवेकरीता यवतमाळात ‘नंददीप’ फाऊंडेशन उभे राहिले. माणूस जन्माला आली की, तो केवळ स्वत:च्या सुखासाठी झटतो. मात्र आपण समाजाचेही देणे लागतो, या भावनेतून स्वत:ला जाणीवपूर्वक समाजसेवेत वाहून घेणारे सेवक दुर्मीळ असतात. असेच समाजभान जपणारे असंख्य हात ‘नंददीप’ने पुढे आणले आहेत.
कोरोना काळात अनेकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले असताना, यवतमाळातील रस्त्यांनाच आपले घर मानून जगणाऱ्या बेघर, मनोरूग्ण, भिकारी आदी विविध घटकातील भटक्या जीवांसाठी संदीप व नंदिनी शिंदे यांनी स्वत:च्या घरात जेवण बनवून ते दररोज या लोकांपर्यंत पोहचविले. कोरोना काळात बेघर, मनोरूग्ण जीवांना दोन वेळेचे अन्न पोहचवून देत त्यांची स्वच्छता आणि सर्व प्रकारची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्यातून उचलली. या कार्यामुळे अनेक मनोरूग्ण, भिकाऱ्यांना आपले उकिरड्यावरचे जीणे बदलत असल्याचे जाणवले. या सामाजिक जाणिवेतून २०२० मध्ये ‘नंददीप’ फाऊंडेशनची स्थापना झाली.
कार्यप्रेरणा…
संदीप बाबाराव शिंदे हा तरूण बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर यवतमाळात मामाकडे आला. हेअर सलूनमध्ये काम करून पैशाची बचत करून स्वत:चे हेअर सलून थाटले. लहान भाऊ राजेशचे शिक्षण पूर्ण केले. तो नोकरीवरही लागला. मात्र एक दिवस अचानक राजेशचा हायपर एसिडिटीमुळे मृत्यू झाला. या धक्क्याने संदीप खचून गेला. भावाच्या मृत्यूच्या दु:खामुळे संदीप चिंतेत राहू लागला. या काळात तो विविध ठिकाणी फिरला.
या भटकंती दरम्यान त्याला ठिकठिकाणी रस्त्यावर विमनस्क अवस्थेत फिरणारे मनोरूग्ण दिसत. ‘पागल’ म्हणून समाजाने ज्यांना वाळीत टाकले ते मनोरूग्ण कोणाच्या आधाराने जगत असतील, या प्रश्नाने संदीप अस्वस्थ झाला आणि अस्वस्थतेतूनच मनोरूग्ण, बेघर, पागल म्हणून समाजाने वाळीत टाकलेल्या लोकांसाठी काम करण्याचा मार्ग मिळाला. राजेशच्या मृत्यूच्या दु:खातून सावरत संदीपने मनोरुग्णांना शोधून ते जिथे असतील तेथे विहीर, हात पंपावर नेवून त्यांची दाढी, कटिंगसह आंघोळ घालून देण्याची सेवा सुरू केली. हे मनोरुग्ण कुठे जात असतील, काय खात असतील, त्यांचा अपघाती मृत्यू झाला तर पुढे काय होत असेल, त्यांचे कुटुंबीय त्यांना का स्वीकारत नाही, असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले. त्यातूनच संदीपने रस्त्यांवर भटकणाऱ्या मनोरुग्णांना शोधून राज्यात विविध ठिकाणी मनोरूग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थामध्ये नेऊन सोडण्याचे कार्य सुरू केले. या कामात वेळ, पैसा आणि श्रम सर्वच अधिक लागत होते. पुढे कोरोनामुळे टाळेबंदी लागली आणि हे काम थांबले. तेव्हा संदीप व नंदिनी यांनी स्वत:च्या घरी स्वयंपाक करून शहरातील बेघर, मनोरूग्णांना भोजन देण्याचे कार्य सुरू केले आणि पुढे पूर्णवेळ मनोरूग्णांसाठी काम करण्याच्या संकल्पातून ‘नंददीप’ फाऊंडेशनचा जन्म झाला.
‘नंददीप’ आज…
समाजाकडून कायमच उपेक्षा वाट्याला आलेल्या मनोरूग्णांना ‘नंददीप’च्या रूपात जणू आपले कुटुंब मिळाले. यवतमाळ नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी ‘नंददीप’च्या कामाने प्रभावित होऊन या कामाला योग्य दिशा मिळावी म्हणून शहरातील नगर परिषदच्या बंद पडलेल्या शाळेची इमारत ‘नंददीप’ फाऊंडेशनला शासकीय सोपस्कार करून तात्पूरत्या स्वरूपात मिळवून दिली. या इमारतीत ‘नंददीप’ने आता ‘बेघर मनोरूग्ण निवारा केंद्र’ सुरू केले आणि ‘नंददीप’च्या कार्यकर्त्यांना नवा हुरूप आला. अवघ्या तिन वर्षात या बेघर मनोरूग्ण निवारा केंद्रात देशभरातील विविध ठिकाणाहून भटकत आलेले 688 मनोरूग्ण दाखल झाले. ‘नंददीप’च्या प्रयत्नाने व सततच्या पाठपुराव्याने आतापर्यंत 564 मनोरूग्ण बरे होऊन आपल्या कुटुंबात परत गेले. ‘नंददीप’ने मनोरूग्णांना बरे करून अगदी नेपाळ, बांगलादेश, पश्चिम बंगाल, आसाम, पंजाब, तेलंगणा, छत्तीसगड, बिहार उत्तर प्रदेश,मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश ओडीसा, सिक्कीम, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यात कुटुंबियांकडे पाठविले. आज ‘नंददीप’च्या निवारा केंद्रामध्ये 124 मनोरूग्ण वास्तव्यास आहेत. यात 72 पुरूष तर 52 महिलांचा समावेश आहे.

विमनस्क जिवांना उभारी…
येथे असलेल्या प्रत्येक मनोरुग्णाची एक स्वतंत्र कथा आहे. त्यांच्या जगण्याच्या या संघर्षातून समाजाला नवप्रेरणा देण्याचा ‘नंददीप’चा हा छोटेखानी प्रयत्न आहे. ‘नंददीप’मध्ये विमनस्क जीवांना उभारी देण्याचे काम होत असल्याचा विश्वास निर्माण झाल्यानंतर येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर, दारोदार फिरणाऱ्या बेघर, मनोरूग्णांची ने-आण करण्यासाठी मंडळाची रूग्णवाहिका दिली. रोटरी क्लब यवतमाळ व रोटरी क्लब मिडटाऊन यांनी ‘नंददीप’च्या कामाला अधिक गतीशील करण्यासाठी नवेकोरे वाहन दिले. तर ‘सेवा समर्पण प्रतिष्ठाण’ ‘नंददीप’च्या कामात हातभार लावून निवारा केंद्राची रंगरंगोटी, दुरूस्ती करून दिली. दररोजच्या अन्नदानासह रस्त्यावरील मृतदेहावर पोलीस प्रशासनाच्या विनंतीने रितसर अंतिमसंस्कार सुद्धा केले. आजवर नंददीपने 200 वर बेवारस मृतदेहावर अंतिमसंस्कार केले. इतर आवश्यक बाबींसाठी दानदाते शोधण्यासाठीही सेवा समर्पण प्रतिष्ठाणसह अनेक सामाजिक संस्था ‘नंददीप’ला कायम सहकार्य करत असतात. या सर्वांसोबतच नागरिकांनी ‘नंददीप’च्या कामाला उचलून घेतल्याने जनता जनार्दनाच्या आशीर्वादाच्या बळावर ‘नंददीप’ची वाटचाल सुरू आहे.

आता पुढे काय ?
‘नंददीप’च्या माध्यमातून मनोरूग्णांची पूर्णवेळ सेवा सुरू झाली आहे. या मनोरूग्णांची देखभाल, निवास, भोजन, पोशाख, औषधी आदींसाठी समाजातील दातृत्वाचे हात नेहमीच ‘नंददीप’ला आधार देत आले आहेत. दररोज विविध दात्यांच्या सेवाभावातूनच अन्नदान केले जाते. मात्र हा डोलारा सांभाळण्यासाठी ‘नंददीप’ला कायमस्वरूपी मदतीची गरज असते. नगर परिषदेने दिलेल्या इमारतीत तात्पूरती व्यवस्था झाली आहे. आता बेघर मनोरूग्ण निवारा केंद्रासाठी यवतमाळमधील दानशूर व्यक्तिमत्व मा. हरीओम बाबूजी भूत यांनी साडेतीन एकर शेती दान केली आहे.
त्या ठिकाणी मनोरूग्ण निवारा केंद्रासह, पुनर्वसन केंद्र, वैद्यकीय उपचार केंद्र, मनोरूग्णांच्या कुटुंबियांकरीता हेल्पलाईन, समूपदेशन केंद्र सुरू करण्याचा ‘नंददीप’चा मानस आहे. यासोबतच दैनिक ‘लोकसत्ता’मधील ‘सर्व कार्येशु सर्वदा’ या उपक्रमातूनही नंददीपला देश, विदेशातून मोठा आर्थिक हातभार लाभला.
‘नंददीप’च्या निवारा केंद्रातील मनोरूग्ण सामान्य माणसासारखे पूर्ववत व्हावे, त्यांचे जीवन सुकर होऊन कुटुंबाने त्यांचा स्वीकार करावा, हा ‘नंददीप’चा ध्यास आहे.

समाजभान जपूया !
‘नंददीप’ने आता केवळ मनोरूग्णांच्या उत्थानासाठी काम करण्याचा निश्चय केला आहे. हे शिवधनुष्य पेलण्यासाठी अर्थातच समाजभान जपणाऱ्या संवेदनशील मनांसह मदतीच्या हातांची गरज आहे. आर्थिक, वस्तू स्वरूपात ही मदत मिळावी, यासाठी ‘नंददीप’ कायम प्रयत्नशील आहेत. आपल्यासारखाच एक माणूस आणि आपल्याआतील माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या या कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, असे मनातून वाटत असेल तर ‘नंददीप’ला रोख, वस्तू, धान्य, कपडे आदी स्वरुपात आपली ‘फुल ना फुलाची पाकळी’ मदत हवीच आहे.
त्यासाठी सोबत ‘नंददीप’चे अकाऊंट डिटेल्स, डिजिटल पेमेंट आदींची माहिती दिली आहे. ही सर्व मदत कलम 80G अंतर्गत करमुक्त आहे. तसे प्रमाणपत्र नंददीप फाऊंडेशन दानदात्यांना देईल.
“हिच आमुची प्रार्थना, अन् हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे!” हाच ‘नंददीप’चाही ध्यास आहे. समाजातील माणूसपण जगणाऱ्या आणि जपणाऱ्या ‘नंददीप’च्या ध्यासपर्वात सहभागी होऊन या प्रवासात आपणही कृतीशील साक्षीदार व्हावे, हीच अपेक्षा.
पत्ता – नंददीप फाऊंडेशन, बेघर निवारा केंद्र, सुनीता बिल्डींग समोर, नगर परिषद शाळा क्र. १९, समर्थवाडी, यवतमाळ, संपर्क – ८२०८२२९२३४ / ९५५२२२५०८०

— लेखन : नितीन पखाले. पत्रकार, यवतमाळ.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
विनम्र अभिवादन..!