मनाची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे आणि मनात आलेली गोष्ट मी करणारच असा आत्मविश्वास असेल तरच यश मिळते. मी माझ्या आयुष्यात नेहमी सकारात्मकता ठेवली. त्यामुळे जीवनात सर्व क्षेत्रात तर सर्व संकटावर मात करता आली, असे उदगार रुग्णांना ‘ताठ कणा’ देणारे जगविख्यात शल्यविशारद डॉ. पी एस. रामाणी यांनी काढले. दादर येथे सारस्वत बँक आणि शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
न्यूरो स्पायनल सर्जरीचे जनक आणि जागतिक वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाच्या योगदानाबद्दल म्हणून डॉक्टरांना नुकतेच जीवनगौरव पुरस्काराने गौरविले गेले आहे त्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक आणि क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या हस्ते त्यांचा ज्ञाती समाजाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सारस्वत बँकेचे अध्यक्ष श्री गौतम ठाकूर, डॉ तुषार रेगे, शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे भूषण जाक हे उपस्थित होते.
डॉ. रामाणी पुढे म्हणाले, वयाच्या 83 व्या वर्षीही माझी जीवनशैली सकारात्मक आहे. मी रात्री कितीही वाजता झोपलो तरी पहाटे पाच वाजता उठतो. मी आजही न चुकता सकाळी जॉगिंग करतो, व्यायाम करतो. त्यानंतर मेडिटेशन करतो. त्यामुळे माझा मेंदू शांत राहतो आणि पॉझिटिव्ह विचार निर्माण होतात. त्यानंतर पाच प्रकारचे प्राणायम केल्यामुळे फुफ्फसे चांगली राहतात.
अलिकडे स्लिप डिस्क हा आजार अनेकांना होतोय. तो जर टाळायचा असेल तर प्रत्येकाने व्यायाम करणे आवश्यक आहे. तसंच वजन आटोक्यात ठेवणं गरजेचं आहे.
ज्याचा पाठीचा कणा तुटला आहे त्याला आपल्या संशोधनाचा फायदा झाल्याचं डॉ. रामाणी म्हणाले. त्यासाठी देशातील अग्रगण्य सर्जिकल कंपन्यांशी चर्चा केली आणि आवश्यक ते साहित्य तयार करून घेतलं.
कधीकधी मणका लूज असतो, वजन वाढलं तर मणक्यावर ताण पडतो आणि तो तुटतो. त्यासाठी स्लिप सर्जरी शोधून काढली आणि त्याला जगाची मान्यता मिळाली. मुख्य म्हणजे रुग्णांना उत्तर मिळालं. “फ्लिप सर्जरी म्हणजे कणा बांधणे. ज्या ठिकाणी कणा तुटला आहे त्या ठिकाणी स्क्रू लावला जातो. बाहेरून रॉड लावला जातो.”
प्रमुख पाहुणे द्वारकानाथ संझगिरी म्हणाले, “प्लीफ सर्जरीमुळे जगविख्यात झालेल्या डॉ. पी.एस. रामाणी यांचे नाव, त्यांच्या संशोधनामुळे पाठीच्या कण्याशी कायमचे जोडले गेले आहे. पाठीच्या कण्यामधील एका दोषावर त्यांनी शोधून काढलेल्या उपायाने दोन लाख रूग्णांना आजवर वेदनामुक्त केले आहे”.
डॉ. प्रेमानंद शांताराम अर्थात पी.एस. रामाणी यांचा जन्म गोव्यातल्या छोट्याशा वाडी या गावात झाला. त्यांनी खडतर परिस्थितीत शिक्षण घेतले. एक मुलगा खडतर परिस्थितीतून शिकून जागतिक कीर्तीचा न्यूरोस्पायनल सर्जन होतो. अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेऊन जागतिक किर्तीचे न्यूरोसर्जन म्हणजे शल्यविशारद म्हणून त्यांनी नाव कमावलं देवदूत ठरले. त्यामुळे डॉ. रामाणी यांच्या आयुष्यावर बनणारा मराठी चित्रपट ‘ताठ कणा’ खडतर स्थितीत शिक्षण घेऊन आयुष्यात चांगले ध्येय गाठू शकणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, देशभर त्याचे स्वागत होईल.
सुप्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
– लेखन : रवींद्र मालुसरे
अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800