पुण्यातील कोथरूड भागातील सक्सेस स्क्वेअर सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ
पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्याहस्ते नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष नागेश नलावडे होते.
यावेळी बोलताना श्रीमती खर्डेकर यांनी नाल्यातील डुक्करांची समस्या, दुर्गंधी आणि सोसायटीच्या रस्त्याच्या प्रश्नासह इतरही समस्या सोडविण्यावर आपला भर राहील, असे आश्वासन दिले. प्रभागातील अनेक प्रश्न आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मार्गी लावले आहेत, असे सांगून खर्डेकर म्हणाल्या की, सक्सेस स्क्वेअर सोसायटीच्या समस्याही आपण आठवडाभरातच सोडवू शकू.
नाल्यामुळे येणाऱ्या दुर्गंधीसाठी आरोग्य विभागाला स्वच्छतेचे आदेश आपण देणार असून प्रवेशद्वारासमोरील रस्त्याचा प्रश्नही स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांशी बोलून सोडविता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भरमसाठ वाढलेल्या मालमत्ता कराबाबतच्या प्रश्नातूनही मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये सोसायटीतील शंभरावर स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी यशस्वी ठरलेल्या 24 स्पर्धकांना खर्डेकर व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
सोसायटीचे अध्यक्ष नागेश नलावडे, कार्यकारिणी सदस्य एल. एन. कुलकर्णी, सदस्या मेधा काजळे, श्री. देव यांच्यासह अनेकांनी यावेळी विविध समस्या मांडल्या.
प्रारंभी सोसायटीचे सचिव प्रदीप काजळे यांच्या हस्ते खर्डेकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष आशिष शिंदे यांनी प्रास्ताविक केले. शीतल गुर्जर यांनी सूत्रचालन केले. तर श्रीकांत गुर्जर यांनी आभार मानले.
– लेखन: सुनील कडूसकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800