ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, अशा व्यक्तींविषयी आणि इतर मान्यवर व्यक्तींच्या अज्ञात बाबींविषयी अतिशय धैर्याने पुस्तक लिहिल्याबद्दल आणि ते छापल्याबद्दल “सत्तरीतील सेल्फी” या पुस्तकाचे लेखक श्री चंद्रकांत बर्वे आणि न्यूज स्टोरी टुडे च्या प्रकाशिका सौ अलका भुजबळ अशा दोघांचेही कौतुक केले पाहिजे, असे गौरोद्गार सुप्रसिद्ध मुलाखतकार तथा लेखक श्री सुधीर गाडगीळ यांनी काढले.
श्री गाडगीळ यांच्या हस्ते उरळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
श्री गाडगीळ पुढे म्हणाले, “सत्तरीतील सेल्फी” हे पुस्तक मी वाचले आणि फार चकितच झालो कारण मला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी या पुस्तकामुळे कळाल्या, त्यामुळे प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे, असे झाले आहे. लीला बावडेकर बाईं संपादक असताना त्यांच्या सोबत मला काम करायला मिळाले होते.
पण देवेंद्र भुजबळ यांनी बावडेकर बाईं सोबत काम करताना त्यांना आलेले अनुभव पुस्तकात दिले आहेत, ते मला माहित नव्हते. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, अशा व्यक्तींविषयी लेखकाने बेधडक लिहिले आहे, असे नमूद करून त्यांनी व्यंकटेश माडगुळकर कामाच्या वेळी बरोबर काम करत होते, हे मी पाहिले आहे, असे सांगितले. या वेळी श्री गाडगीळ यांनी त्यांच्या शैलीत श्री बर्वे यांची घेतलेली छोटेखानी मुलाखत उपस्थितांची दाद मिळवून गेली.
निसर्गोपचार आश्रमाचे प्रमुख डॉ अभिषेक देविकर यावेळी बोलताना म्हणाले की, पुस्तक हाती घेताच या पुस्तकाच्या नावामुळे पुस्तकाविषयी मला असे कुतूहल वाटले की, सत्तरच्या दशकाविषयी हे पुस्तक असेल. पण ते तसे नसून लेखक चंद्रकांत बर्वे यांच्या सत्तर वर्षांच्या आयुष्यातील ३५ वर्षांच्या आकाशवाणी, दूरदर्शन मध्ये भेटलेल्या व्यक्तींविषयी या पुस्तकात लिहिले आहे. ते खरोखरच वाचनीय झाले आहे. आज लोक शिक्षित झाले आहेत पण ते समजदार झाले आहेत असे म्हणता येत नाही, असा खेद व्यक्त करून त्यांनी कोणतेही पुस्तक मनोरंजनही करते आणि ज्ञानही देते असे प्रतिपादन केले. महात्मा गांधीजी म्हणत, जो खूप शक्तिशाली आहे, तो कुठे तरी कमजोर असतो. हे लक्षात घेतले पाहिजे, असे पुस्तक वाचताना सतत जाणवत रहाते. हे पुस्तक लिहिल्याबद्दल आणि ते प्रकाशित केल्याबद्दल त्यांनी लेखक, प्रकाशक यांचे अभिनंदन केले.
पुस्तकाची समीक्षा करताना प्राध्यापिका आशी नाईक यांनी पुस्तकाचे यथायोग्य मूल्यमापन केले. त्या म्हणाल्या, “सत्तरीची सेल्फी” ह्या नावातून असे प्रतीत होते की लेखक अंदाजे ७० वर्षांचे असावेत. त्यांच्या काळात तर भ्रमण ध्वनीच नव्हता मग सेल्फी ह्या शब्दाचे काय प्रयोजन असेल असा विचार माझ्या डोक्यात सुरू झाला. प्रसिद्ध, प्रख्यात अशा व्यक्ती भेटल्या तर पूर्वी सही घेतली जायची, आता सेल्फी घेतली जाते. पण सेल्फी मध्ये सेल्फी घेणारा असतो पण ह्या पुस्तकात तर लेखकाने त्यांना भेटलेल्या व्यक्तींबद्दल टिप्पणी केली आहे, स्वतः बद्दल नाही. ह्यावरून हेच लक्षात येते की व्यक्तीची जडण घडण तिला भेटलेल्या व्यक्तींमुळे, आलेल्या अनुभवांवरून होते म्हणून असे म्हणता येईल की पुस्तकाच्या शीर्षकातील सेल्फी शब्द ७० वर्षांच्या लेखकाची आधुनिक काळाशी जोडलेली नाळ दर्शवतो. कामाच्या निमित्ताने त्यांना अनेक अशा व्यक्तींना भेटायच्या संध्या मिळाल्या, ज्या त्या त्या काळात त्यांच्या क्षेत्रात अग्रेसर होत्या, त्यांचा नावलौकिक होता, त्या प्रकाशझोतात होत्या आणि म्हणूनच प्रसिद्ध होत्या.
त्यातली काही सर्वसामान्यांना माहीत असलेली नावे म्हणजे पंडीत भीमसेन जोशी, लेखक पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगुळकर, विजय तेंडुलकर, मराठी रंगभूमीवर गाजलेली नावे जशी की प्रभाकर पणशीकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, भक्ती बर्वे, हिंदी सिनेमा क्षेत्रातील दिग्गज जसे की राजकपूर, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, उदित नारायण आणि अजूनही बरेच कलाकार, काही डॉक्टर्स, काही पत्रकारिता क्षेत्रातील मोठी नावे, आपले पूर्व रक्षा मंत्री मनोहर पर्रीकर आणि त्याच बरोबर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा. ही मांदियाळी इथे संपत नाही पण मी इथे थांबते.
एखादी व्यक्ती एखाद्या घटनेकडे कशी पाहते हे मात्र त्या व्यक्तीच्या “स्व” वर बरेच अवलंबून असते. चंद्रकांत बर्वे कसे आहेत तर उत्तम निरीक्षण कौशल्य असलेले, चिकित्सक वृत्ती असलेले आणि अगदी बिनधास्त, बेधडक पणे त्यांचे विचार मांडणारे. अत्यंत मनमोकळेपणाने त्यांनी स्वानुभव कोणताही आड पडदा न ठेवता, परिणामांची तमा न बाळगता वाचकांपर्यंत पोहोचवले आहेत. तुमच्या माझ्या सारख्या सामान्य वाचकांना कलाकार म्हटलं की त्याची फक्त कला माहीत असते, लेखकाचे लेखन, कवीची कविता, राजकारण्याचे काम किंवा आश्वासने, डॉक्टर लोकांचे सल्ले, त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव असे जे सगळ्या जगाला दिसते तेच माहीत असते पण ते तितकेच असेल असे नाही ना ! आता हेच बघा…
वऱ्हाड निघालय लंडनला नावाने एकपात्री प्रयोग करणारे प्रा. लक्ष्मण देशपांडे ह्यांनी एका दुःखद प्रसंगी आपले नाटकी अश्रू पत्रकारांना दिसावेत म्हणून पुसले नाहीत.
व्यंकटेश माडगुळकर मीटिंगमध्ये चक्क झोपत असत आणि कधी कधी तर घोरत देखील असत. !
पंडीत भीमसेन जोशी रेकॉर्डिंगच्या आधी पटकन बाहेर जाऊन दारूचे २ घोट घेऊन गायला बसत.
विजय तेंडुलकरांनी आकाशवाणीकडून काहीही काम न करता २ वर्षे मानधन मिळवले.
हे आणि असे बरेच काही आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल, धक्का बसेल पण त्याने सत्य बदलते का.. ?
त्या वेळी, त्या प्रसंगी त्या परिस्थितीत ते सत्य होते, तसे घडले होते आणि तेच लेखकाने मांडले आहे. इतके साधे आणि सरळ आहे हे.
प्रत्येक व्यक्तीचे अनेक पैलू असतातच की. जसे माझे आहेत आणि तुमचे ही आहेत. जशी मी एखाद्या वेळी एखाद्या व्यक्ती समोर असते तशी मी दुसऱ्या व्यक्ती बरोबर नसते, जशी मी १० वर्षांपूर्वी बोलायचे, वागायचे तशी मी आत्ता नाही बोलत किंवा वागत. तसेच आहे ह्या मंडळींचे कारण ती सुद्धा माणसं च तर आहेत.
मानवी मनाचे वेगवेगळे पैलू असतात आणि ह्या सेलिब्रिटी म्हणून समाजात वावरत असलेल्या लोकांचे असेच आत्तापर्यंत ज्ञात नसलेले पैलू लेखकाने ह्या लेखांमध्ये परखडपणे मांडले आहेत. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने त्यांचे कौतुक करते आणि त्यांच्या सडेतोडपणाला सलाम ठोकते.
ह्या पुस्तकाच्या निमित्ताने वाचकांना त्यांच्या आवडत्या आणि कुतूहल वाटणाऱ्या व्यक्ती बद्दल काहीतरी नवीन माहिती मिळेल अशी मला खात्री वाटते. ज्यांना लोकप्रिय व्यक्तींच्या आयुष्यात डोकावून पाहण्याची इच्छा असेल त्यांनी हे पुस्तक नक्की वाचा. लेख वाचून माझ्या मनातील त्या व्यक्तींची प्रतिमा बिघडेल की काय अशी भीती असेल तर त्या सर्व वाचकवर्गांने हे पुस्तक आवर्जून वाचा आणि वाचताना .. हा लेखकाचा अनुभव आहे, हे लेखकाचे मत आहे हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे हे सुजाण वाचकाने प्रत्येक क्षण ध्यानात ठेवले पाहिजे. स्पष्ट, परखड शब्दात अभिव्यक्त झाल्याबद्दलच नव्हे तर स्व बरोबर राहू द्या, असेही त्यांनी सांगितले.
पुस्तकाविषयी आपले मनोगत व्यक्त करतांना लेखक श्री चंद्रकांत बर्वे म्हणाले, महात्मा गांधी यांनी कायम सत्याची कास धरली होती, म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या निसर्गोपार आश्रमात हे पुस्तक प्रकाशित होत आहे, याचा विशेष आनंद होतो आहे. या पुस्तकातील प्रत्येक शब्द सत्यच आहे. सत्य हे कल्पिताहून श्रेष्ठ असते. मी हुशार नसल्याने नेहमी खरंच बोलतो, असे सांगून त्यांनी आकाशवाणी, दूरदर्शन मध्ये ३५ वर्षे नोकरी करीत असताना विविध क्षेत्रातील शेकडो व्यक्ती भेटल्या. पण पुस्तकातील व्यक्तींविषयीच लिहावेसे वाटले कारण त्यांच्यात इतरांपेक्षा काही तरी वेगळे होते, म्हणून त्यांच्या विषयी लिहिले, असे सांगून नाण्याला दोन बाजू असतात. तशा सेलिब्रिटींनासुध्दा दोन बाजू असतात. लोकांना एकच बाजू दिसते पण मला त्यांची दुसरी बाजू पहायची संधी मिळाली, असे सांगून वाचकांनी समतोलपणा राखून हे पुस्तक वाचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुस्तकाच्या प्रकाशिका म्हणून बोलताना सौ अलका भुजबळ म्हणाल्या, प्रत्येक पुस्तक वाचून मी प्रथम ते पुस्तक प्रकाशित करण्याजोगे आहे की नाही, ते तपासते. चंद्रकांत बर्वे यांचे हे पुस्तक मी वाचले, तेव्हा चकित झाले कारण त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांविषयी अतिशय परखडपणें लिहिले आहे. त्यांचा हा परखडपणा, निर्भयपणे केलेले लेखन भावल्यामुळेच हे पुस्तक प्रकाशित करण्याचे धाडस केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्र संचालनही त्यांनीच केले.
न्यूज स्टोरी टुडे चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी आभार प्रदर्शन करताना, लेखक श्री चंद्रकांत बर्वे हे मिश्किल स्वभावाचे असून ही सत्य सांगण्यात ते कधी मागेपुढे पाहात नाहीत, असे सांगून नवनवीन कल्पनांचे नेहमी स्वागत करणारे निसर्गोपचार आश्रमाचे प्रमुख डॉ अभिषेक देविकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे, उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास आश्रमवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यावर पुस्तक खरेदी आणि मान्यवरांच्या त्यावर सह्या घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
पुस्तक वाचायची खूपच उत्सुकता आहे
एकंदरीत पुस्तक वाचायची उत्सुकता खूप वाढली आहे…
कार्यक्रम खुपच छान अनुभव देऊन गेला. प्रत्येकाचे भाषण खुप छान होते. पुस्तक वाचनीय आहे यात शंकाच नाही.