मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने आयोजित करण्यात यावयाच्या विविध कार्यक्रमांची सुरुवात महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या ‘सत्यशोधक समाजा’ला सप्टेंबर २०२२मध्ये १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून “सत्यशोधक समाजाच्या कार्याचे आजचे संदर्भ” या विषयावर ग्रंथालयाच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात या परिसंवादाने नुकतीच करण्यात आली.
या परिसंवादात प्रा. प्रतिमा परदेशी, डॉ. उमेश बगाड आणि डॉ नीतीन रिंढे ह्या वक्त्यांनी अनुक्रमे “सत्यशोधक समाज आणि अ-ब्राह्मणी स्रीवाद”, “सत्यशोधक समाज व शेतकरी चळवळ” आणि “सत्यशोधक साहित्य : वाचन संस्कृती घडवण्याचा प्रयत्न या विषयांवर अत्यंत व्यासंगपूर्ण विवेचन केले.
प्रा. परदेशी यांची मांडणी स्त्री-मुक्ती चळवळीच्या प्रचलित मांडणीला छेद देणारी होती. डॉ. बगाडे यांनी जातीच्या आधारे समाजाच्या संपत्तीचे, प्रामुख्याने ‘अतिरिक्त’ मूल्याचे वाटप कसे होते हे सांगून अविद्येच्या संकल्पनेवर भाष्य केले.
तर डाॅ. नीतीन रिंढे यांनी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी फुले व त्यांच्या सहकाऱ्यांनी कसे अविरत प्रयत्न केले व तो प्रवास किती कठीण होता हे सोदाहरण सांगितले.‘शूद्र-अतिशूद्र, स्त्रिया, शेतकरी या सर्व उपेक्षित-शोषित घटकांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा सर्वांगीण शोषणविरुद्ध कृतिशील बंड पुकारणारे जोतिराव फुले हे केवळ ‘समाजसुधारक’ नव्हते; तर ते द्रष्टे ‘समाज क्रांतिकारक होते,’ असे मत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.
ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारिणीच्या कार्याध्यक्ष शीतल करदेकर, संदर्भ विभाग कार्यवाह उमा नाबर व कोषाध्यक्ष जयवंत गोलतकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
या परिसंवादाला विश्वस्त प्रताप आसबे, उपाध्यक्ष प्रभाकर नारकर, डाॅ. प्रदीप कर्णिक, कार्यकारिणी सदस्य सुनिल राणे, स्वप्निल लाखवडे, सुरेंद्र करंबे, महेश कवटकर,अमेय कोंडविलकर तसेच अभ्यासू वाचक, मान्यवर आदींची लक्षणीय उपस्थिती होती.
– टीम एनएसटी. 9869484800