रिकामी झोळी
डॉ. अमृता मुंबईतील एक ख्यातनाम स्त्रीरोग तज्ज्ञ होती. तिच्या कोणत्याही केसमधे तिला अपयश आले नव्हते. त्यामुळे तिचा खूप नावलौकिक होता. समाजातील सर्व स्तरातील स्त्रिया तिच्याकडे उपचारासाठी येत व बऱ्या होऊन आनंदी चेहर्याने घरी जात. तिने कधीही कुणाला पैशांसाठी अडवले नाही. तिचा दवाखानाही सर्व अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज होता.
त्या दिवशी ती अशीच दवाखान्यात मासिके चाळत बसली होती, निवांत. कारण आज पेशंटसची गर्दी नव्हती.
इतक्यात गुजराथी पद्धतीने साडी नेसलेल्या, डोक्यावर पदर घेतलेल्या दोन तरुणी, इकडेतिकडे बघत (जणू कोणी आपल्याला बघत नाही नां ?अशी खात्री करून घेत, दबत दबत दवाखान्यात आल्या. अमृता समोरच होती. तिने “या” म्हणून हात जोडले व हसून त्यांचे स्वागत केले आणि समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. दोघीही खूप बावरलेल्या दिसत होत्या. त्यांची मनःस्थिती अमृताच्या लक्षात आली. ती नावाप्रमाणेच बोलायला, वागायला गोड होती.
“घाबरू नका ! काय प्रॉब्लेम आहे मनमोकळे पणाने सांगा. आज नेमकी गर्दी नाही माझ्याकडे भरपूर वेळ आहे.” अमृताने कॉफी मागवली. आता त्यांची भीती थोडी कमी झाली होती . त्यांतली जी धाकटी होती ती पूर्ण वेळ जणू एखाद्या अपराध्या सारखी गप्प होती. बोलण्याचे काम मोठीच करत होती.
“मी चंपाबेन ही रूपाबेन ! माझी धाकटी देराणी (जाऊ) पण आमचे बहिणी बहिणीं सारखे प्रेम आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून ही काही खात-पीत नाही, बोलतही नाही. एकटीच खोलीत बसून राहते. म्हणून हिला तपासणी करून घ्यायला तुमच्याकडे आणले आहे.”
“ठीक आहे ! मी आतल्या खोलीत हिला तपासते तुम्ही इथे बसा”.
साडी बाजूला करताच चंपाबेन गरोदर असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तिला व्यवस्थित तपासले. मासिक पाळीची तारीख विचारली आणि ती पाच महिन्यांची गरोदर आहे हे अनुमान काढले.
“रुपाबेन ! खुषखबर आहे तू आई बनणार आहेस.” हे ऐकताच रुपाबेन मोठमोठयाने रडू लागली.i
अमृताला कळेना ती का रडते पाणी वगैरे देऊन तिला शांत केले व चंपाबेनला आत बोलवले आणि खुषखबर दिली. ती पण रडू लागली तिने एकदम वाकून अमृताचे पाय धरले.
“डॉक्टर हात जोडतो तुम्हाला ! काही करा पण हिचे पोट खाली (रिकामे) करा. आम्हाला हे ठेवता येणार नाही.
आम्ही एका सधन, खानदानी, पापभीरू गुजराथी कुटुंबातल्या सुना आहोत. सासऱ्यांचा व्यवसाय आहे. सासू सासरे वृद्ध आहेत. तरी व्यवसाय सांभाळतात. ते दोघे, माझा पती रोशन व मी, दोन मुले, रूपाबेन व तिचा नवरा दीपक असे आम्ही एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने आनंदात रहातो.
आमचे खूप मोठे घर आहे तीन मजली. खाली ऑफिस. मधल्या मजल्यावर किचन, डायनिंग, पूजा रूम व सर्वांची स्वतंत्र बेडरूम आहे. घर इतके मोठे आहे की कोण कुठे आहे कळतही नाही.
घरात नोकर, मोलकरणी खूप आहेत पण सासऱ्यांना घरच्या स्त्रियांच्या हातचेच जेवण लागते. सासूबाई बिछान्यात आहेत. सासरे सकाळी स्नानादि उरकून पूजेला बसतात. पूजेची तयारी छोटी बहू म्हणजे रुपाबेन करते. मी किचन संभाळते. नाश्ता, जेवण टेबलवर आणून वाढण्याचे काम रूपाबेन करते. जेवणाच्या टेबलावर घरातील सर्वजण भेटतात तीच कायती भेट !
आमचे घराणे जुन्या परंपरा चालवते त्यामुळे आम्ही सुना कधीही घराबाहेर जात नाही. त्यामुळे आमचा कोणाशीही संबंध येत नाही. स्त्रियांच्या खोल्या सुद्धा मोलकरणी स्वच्छ करतात.”
डॉ. अमृता काळजीपूर्वक ऐकत होती व मनाशी अनेक आडाखे बांधत होती. चंपाबेन पुढे बोलू लागली.
“काही महिन्यांपूर्वी माझा देवर, चंपाबेनचा नवरा रोड अपघातात जागीच मरण पावला. तेव्हापासून आमचे हसते, आनंदी घर सुन्न झाले. रुपाबेनने तर हाय खाल्ली. ती खोलीबाहेर येईनाशी झाली. मी जेवणाची थाळी तिच्या खोलीत नेऊन तिला चार घास खाण्याचा आग्रह करायची. मलाही रोज जमेना ! थाळी खोलीवर पाठवायची मी ! काही महिन्यांपूर्वी मोलकरणीने सांगितले, “चंपदिदी ! छोटी बहू की थाली जैसी की वैसी पडी रहती है। सुबहसे उलटी करती रहती है”
मी घाबरले सगळे शांत असताना तिच्या खोलीत गेले व मायेने तिला जवळ घेऊन विचारले, “क्या बात है बेटी ! दीपक तो अब लौटकर नही आने वाला ! सम्हालो अपने आप को ! किशन (कृष्ण) जी की सेवामें मन लगाओ ! “
रुपाबेन रडत रडत सांगू लागली, “चंपादीदी ! आप तो जानती है, दस साल हो गये, मैं दीपक का हाथ पकड़कर, छोटी बहू बनकर इस घरमें आई ! बालगोपाल की आस में दिन, महीने, साल बीत गये ! मेरी गोद हरी ना हुई ! अम्मा जी के कहने पर मैं कितने पूजापाठ, व्रत, उपवास करती हूँ । जान सूखती है फिरभी हार नही मानी !
अमृता कान देऊन ऐकत होती.
“पाँच साल पहले दीपकने चुपचाप डॉक्टरसे टेस्ट करवाई और डॉक्टरने बताया कि तुझमें दोष है तुम पिता नही बन सकते” घराने की इज्जत रखने के लिये हम दोनों ने यह दुख भी स्वीकार किया। मेरा ही दोष मानकर मैं उपवासादि करती रही ! दीपक के बारे में किसी को कानोकान खबर न दी। अब तो भगवान ने दीपक को ही उठा लिया ।
अमृता विचार करत होती
‘मग हिच्या पापाचा धनी कोण ?
“क्या बताउँ ? कैसे बताउँ ? “
आता थोडे मराठी संभाषण करूया. मूळ गुजराथीत, एक दिवस रात्री रोशन भाई माझ्या खोलीत आले. थोडावेळ गोड बोलून माझी चौकशी केली. माझ्या गालांवर हात फिरवून सांत्वन केले. नंतर माझे हात हाती घेऊन म्हणाले, “तू काळजी करू नको. मी तुझी काळजी घेईन.”
दुसऱ्या रात्री ते पुन्हा माझ्या खोलीत आले माझे हात धरून बसले, हळूच पाठीवर हात फिरवला. मी दचकले, त्या पुरुषी स्पर्शाने घाबरले व दूर सरकले. रोशनभाई आणखी जवळ सरकले, त्यांनी मला मिठीत घेतले, उचलून पलंगावर नेले आणि दीदी ! घडू नये ते घडले. रोजच रोशनभाई मध्यरात्री नंतर खोलीत येत राहिले व रोजच पुनरावृत्ती होत राहिली. सगळ्यांच्या भीतीने मी ओरडू शकत नव्हते. प्रतिकार करू शकत नव्हते.
मला उलट्या होताहेत हे त्यांच्या कानी गेल्यावर त्यांनी खोलीत येणे बंद केले.
मला जेवण तसेही जात नव्हते तरी अन्न त्याग करून जीवन संपवावे असा प्रयत्न मी सुरु केला. घराण्याच्या बेअब्रूपाई आत्महत्या करू शकत नव्हते.
“ह्या पापाचा धनी आपला साळसूद दिसणारा नवराच आहे हे ऐकून हंसाबेन दिङ्मूढ झाली. तरी अब्रू वाचवण्याचा प्रयत्न करायचा म्हणून आम्ही दोघी आज तुमच्याकडे आलोय डॉक्टर मदत करा. पाडून टाका हे पाप !”
आता डॉ. अमृता बोलू लागली,
“रुपाबेन ! तुझे ५ महिने झाले आहेत. कायद्यानुसार ५ महिन्यानंतर गर्भपात करणे गुन्हा आहे. मी एक मार्ग सुचवते. औषधे टॉनिक लिहून देते. ७ वा महिना लागला की पोट दिसू लागेल. त्याच्या आधी तब्येतीचे कारण दाखवून मी तुला बाळ जन्मे पर्यंत अॅडमिट करून घेईन. नंतर ते बाळ आपण अनाथाश्रमात ठेवू”
“चंपाबेन काळजी घ्या हिची. कुठेही वाच्यता करू नका. वेळेवर दवाखान्यात अॅडमिट करा पुढची मदत मी करेन”
जड पावलांनी दोघी घरी गेल्या.
ठरल्याप्रमाणे चंपाबेन रुपाबेनला घेऊन आली, अॅडमिट करून घरी गेली.
दोन महिन्यांनी रुपाने एका सुंदर, गोंडस मुलीला जन्म दिला. बाळ जन्मतःच डॉ. अमृताने ताब्यात घेतले. दवाखान्या समोर एक आलिशान कार येऊन उभी राहिली. एक तरुण जोडपे उतरले व बाळाला ताब्यात घेऊन गाडी भुरदिशी एक वळण घेऊन निघून सुद्धा गेली.
ते एक श्रीमंत, अपत्यहीन जोडपे होते. अनेक उपाय थकल्या नंतर त्यांनी मूल दत्तक घेण्याचे ठरवले होते.
कायद्यानुसार डॉ. अमृताने बाळ जन्मल्या नंतर त्याची अनाथाश्रमात अनाथ म्हणून नोंद करवली. तेव्हा कुठे ते बाळ त्यांना दत्तक घेता आले.
ज्यांनी बाळ दत्तक घेतले त्यांनी अनाथाश्रमाला एक लाख रुपये देणगी दिली. सर्व कायदेशीर व्यवस्था डॉ. अमृताने परस्पर केली होती.
बिचारी रुपाबेन मात्र आई झाली, पण जबरदस्तीच्या अनैतिक संबंधातून. कुटुंबाची इभ्रत राखण्यासाठी बाळ दृष्टीसही पडले नाही.
तिच्या पदरी रिकामी झोळीच आली.
[ डॉक्टर मैत्रिणीने सांगितलेली सत्यकथा ]
— लेखिका : सुलभा गुप्ते. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
हृदयस्पर्शी……