घरातून पळून आलेल्या मुलांमध्ये केवळ गरीब घरातीलच मुलं नसतात तर उद्योगपती, डॉक्टर, इंजिनिअर, आय ए एस अधिकारी, आय पी एस अधिकारी अशा अत्यन्त सधन, उच्चभ्रू घरातील मुलं ही असतात, ही अत्यन्त धक्कादायक माहिती मला मिळाली. निमित्त होते, घरातून पळून आलेल्या मुलांचे मन परिवर्तन करून त्यांना पुन्हा घरी जाण्यास, राहण्यास तयार करणाऱ्या ठाणे येथील समतोल
फौंडेशनने आयोजित केलेल्या सामाजिक कार्यकर्ते प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाचे. या फौंडेशनचे कार्य पुढे दिले आहेच, पण आज जाणून घेऊ या
फौंडेशनचे कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गोसावी यांचा जीवन प्रवास….
राजेंद्र गोसावी ओळखले जातात ते मुलांप्रमाणेच मोठयांमध्येही लोकप्रिय असलेल्या “वयम” मासिकाशी निगडित असल्याने, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गोर गरीब लोकांना मदत करण्यासाठी सतत तत्पर असलेले, नैसर्गिक व अन्य आपत्तीत तत्काळ धावून जाणारे एक विनम्र व्यक्तीमत्व म्हणून.
राजेंद्र गोसावी यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण या गावातीलच “जीवन शिक्षण विद्या मंदिर” शाळेत झाले. त्यांचे पुढील शिक्षण ठाण्यात झाले.
शिक्षण झाल्यावर राजेंद्र गोसावी कँपकॉन कंपनीत रुजू झाले. काही वर्ष नोकरी केल्यावर त्यांनी पुस्तक वितरण व्यवसायाला सुरुवात केली. “वयम” या बालकांच्या मासिकासाठी त्यांनी वितरण सुरू केले. “वयम” हे मासिक त्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच शाळांमध्ये पोचले आहे.
जिज्ञासा मित्र मंडळ, आदर्श प्रतिष्ठान, न्यायिक लढा
पत्रकार सेवा संस्था, अक्षरमंच प्रतिष्ठान, आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था, होप पर्यावरण संस्था, ज्ञानराज सहकारी पतसंस्था, श्रीकृष्ण योगा सेवा संस्था, आम्ही कला प्रतिष्ठान, नाट्यतुषार संस्था, समतोल फौंडेशन आदी संस्थामध्ये ते विविध प्रकारच्या पदांवर कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून ते नियमितपणे विविध प्रकारचे सामाजिक कार्य करित असतात.
समतोल फौंडेशन
“तहानलेल्याला पाणी, अन भुकेल्याना अन्न” ह्या संत गाडगेबाबांच्या शिकवणीनुसार, आणि..
माणसाने माणसांशी माणसासम वागावे या खऱ्याखुऱ्या सर्वोच्च मानव धर्माच्या मूल तत्वानुरूप समतोल फौंडेशन पंधरा वर्षांहून अधिक काळ, विविध कारणांनी घरातून पळून आलेल्या अथवा हरवलेल्या मुलांना, रस्त्यावर, स्टेशनवर भिक मागणाऱ्या, बूट पॉलिश करणाऱ्या अथवा चोऱ्या, पाकिटमारी करणाऱ्या, भविष्य हरवून बसलेल्या निराधार मुलांना सुसंस्कारित करण्याचे तसेच स्वतःच्या पायावर उभे राहतील असे वेल्डिंग, प्लांबिंग, संगणक, दुरुस्ती, शेती,
गोपालन, शिलाई मशीन चालविणे, आदी उद्योगक्षम प्रशिक्षण देऊन पुन्हा त्यांच्या आई वडिलांच्या स्वाधीन करते.
आतापर्यंत जवळपास दहा हजार पेक्षा जास्त अशा मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करून त्यांना समतोलने ह्या समाज व्यवस्थेचा भाग बनविले आहे.
कोरोनामुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ लॉक डाउन, त्यामध्ये समाजातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सर्वच घटक बाधित झाले. या काळात निराधार मुलांची उपासमार होऊ नये म्हणून ह्या सर्वाना, मुरबाड,(मामणोली) येथील संस्थेच्या स्वामी विवेकानंद, मन परिवर्तन केंद येथे संगोपन सोबतच प्रशिक्षण सुरू आहे.
समतोलचे संस्थापक श्री विजय जाधव आणि विश्वस्त आमदार श्री संजय केळकर आणि समाजसेवक – उद्योजक श्री हरिहरन ह्या सर्वांच्या संकल्पनेतून, ठाणे येथे छोट्याशा जागेत किचन बनवून काही, दानशूर लोकांच्या देणगी स्वरूप मिळालेल्या अन्नधान्यातुन, अन्नछत्र सुरू करून दररोज दोनशे ते अडीचशे अन्न पाकिटे पॅकिंग करून, एका संस्थेने देणगीस्वरूप दिलेल्या ऑटो रिक्षातून ठाणे शहरातील फूट -पाथ वरील केवळ शारीरिक दृष्ट्या दुर्बल वृद्ध भिकाऱ्यांना, तसेच दररोज १८ ते २० तास एखाद्या योध्याप्रमाणे सेवा बजावीत असलेल्या, सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णांचे गरजू नातेवाईक, तसेच खोपट, एसटी डेपोतील ड्रायव्हर, कंडक्टर, यांना जागेवर जाऊन दररोज एका कर्मयोगी प्रमाणे तळमळीचे समतोल सेवक श्री.राजेन्द्र गोसावी आणि सहकारी यांनी अखंड पणे हे अन्नछत्र सुरू ठेवले. वेळप्रसंगी जीवाची पर्वा न करता ते काम करत होते.
समाजसेवी असलेले राजेंद्र गोसावी यांना साहित्याची देखील आवड आहे. त्यांचा “मैत्री” हा काव्य संग्रह प्रकाशित झाला आहे.
अशा या सन्मित्र राजेंद्र गोसावी यांना त्याच्या कुटुंबाकडून चांगली साथ मिळाली आहे. पत्नी उज्वला सतत त्यांच्या कार्यात सहभागी असतात. तर मुलगा चैतन्य संगणक अभ्यासक्रम करीत आहे.
“स्वार्थ आणि परमार्थ” ही उक्ती प्रत्यक्षात आचरणात आणणाऱ्या राजेंद्र गोसावी यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ, 9869484800.
भुजबळ सर, तुमची दूरदृष्टी,सखोल वाचन व लपलेले हिरे शोधून, सर्वां समोर त्यांचे पैलू मांडण्याची कला, अप्रतिम! salute sir!🙋