ब्रह्मांडात सा-या, देश हाच देव
जगी एकमेव, स्वर्ग इथे
सांगतो डोलतो, तिरंगा आपुला
जपा स्वातंत्र्याला, प्राणपणे
ठेवा आठवण, नित्य हुतात्म्यांची
आई भारतीची, करू पूजा
अमृत कलश, राज्य घटनेचा
दीन दलितांचा, आधारच
भीमराव बाबा, थोर शिल्पकार
मानू उपकार, सर्व काळ
ज्योत समतेची, त्यांनी पेटविली
घटना लिहिली, सर्व श्रेष्ठ
जगातली मोठी, लोकशाही दिव्य
न्यायाचेच काव्य, गण तंत्र
घेऊया शपथ, झटू अविरत
देशसेवा व्रत, आचरुया
देशभक्त नेते, टिळक नेताजी
नेहरू, गांधिजी, विनायक
राणी लक्ष्मीबाई, गो-याशी झुंजली
अमर जाहली, साहसाने
क्रांतिवीर सारे, शिरिष कुमार
शूर ती वड्डार, स्मरू त्यांना
महान तो त्याग, अंतरी रुजवू
राष्ट्रगान गाऊ, अभिमाने
नको भेदाभेद, मंत्र जपू हाच
चंदन देहाचं, झिजवुया
देशास आपुल्या, बनवू समर्थ
येईल रे अर्थ, जगण्याला

– रचना : राजेंद्र वाणी