वृत्त — वनहरिणी
स्वर मुरलीचे कानी येता कुंजवनी मी धाव घेतली
नाचत नाचत तालावरती गोप गोपिका रास खेळती ||
कुणा न उरले भान कुणाचे स्वर गुंजन ते धुंद करितसे
तोडुन सारे भावबंध हे तुझ्याकडे मी धाव घेतसे ||
तुझी माधवा ओढ अनावर धावत आले जगा विसरुनी
तुला पाहुनी चैतन्याचा निर्झर झरतो माझ्या मधुनी ||
माझे मी पण तुला समर्पित माझी मी तर उरले नाही
राधा मोहन अद्वैताचे रूप मनोहर जग हे पाही ||
तुटले सारे माया बंधन उन्मुक्त कशी झाली बाधा
कृष्णार्पण हे जीवन केले कृष्णरूप ती होई राधा ||

– रचना : ज्योत्स्ना तानवडे. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर कविता , ज्योत्स्नाताई…!