एक हरहुन्नरी, प्रतिभाशाली, धडाडीचे, भारदस्त, निर्भीड असे व्यक्तिमत्व लाभलेले म्हणून अखिल भारतीय जैन कासार सेनेचे संस्थापक अध्यक्ष म सुभाषजी मधुकर साळवी ओळखले जातात. तर जाणून घेऊन त्यांचा खडतर प्रवास व आज त्यांनी घेतलेली उत्तुंग भरारी……
कोकणातील तळवडे (बाजारवाडी) या खेडेगावातील एका सर्व सामान्य, एकत्र कष्टकरी कुटुंबात २० ऑक्टोबर १९६६ रोजी जन्मलेले सुभाषजी साळवी, यांच्या कुटुंबात सात चुलते तर एक आत्या होत्या.
वडील मधुकर काका यांचे तळवडे येथे किराणाचे होलसेल दुकान, तर चार नंबरचे काका मनोहरजी साळवी (अण्णा) यांचे जोगेश्वरी (मुंबई) येथे सुहास स्टोअर नावाचे पान तंबाकुचे दुकान होते.
वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी सुभाषजी साळवी यांचे पितृ छत्र हरपले. होत्याचे नव्हते झाले. तो सर्व कुटुंबावर खूप मोठा आघात होता. कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ हरपल्याने शोककळा पसरली. साळवी कुटुंबासाठी तो काळाकुट्ट दिवस ठरला.
श्री साळवी यांचे शालेय शिक्षण सुरू होते. लहान वयात खूप मोठी जबाबदारी पडली. त्यांचे काका अण्णा हे सुभाषजींना जोगेश्वरी येथे घेऊन आले व त्यांच्यावर दुकानाची जबाबदारी सोपवली. मार्गदर्शन ही केले. येथेच ते व्यवसायातील खाचखळगे शिकले.
त्यांची कर्तृत्व, जिद्द व चिकाटी पाहून काकांनी त्यांना जोगेश्वरीतील मेघवाडी येथे सुभाष स्टोअर नावाने स्वतंत्र व्यवसाय सुरू करून दिला.
सुभाषजींचे लग्न १९९२ साली झाले. त्यांची पत्नी सौ उषा या उत्तम गृहिणी आहेत. याच साली मुंबईत दंगल झाली. कर्फ्यु लागला होता. त्यावेळी सुभाषजी पहाटे खारी बटर विकत होते. बिकट परिस्थितीचा त्यांनी धीराने सामना केला. ते डगमगले नाही की थांबले नाहीत. नियती त्यांची परीक्षा घेत होती. मात्र ते ही तेवढेच खंबीर होते. १९९३ साली त्यांच्या मुलाचा जन्म झाला. मात्र त्यावेळी तो आनंद साजरा करायला पेढेही आणण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्या पडत्या काळात त्यांचे जिवलग मित्र श्री बाळ गवस यांनी त्यांना मोलाची साथ दिली म्हणून ते सावरू शकले असे ते प्रांजलपणे कबूल करतात.तो काळ खूप खडतर होता.
थोड्या दिवसांनी व्यवसायात जम बसल्यावर सुभाषजी यांचे कुटुंब मुंबईत आले. पुढे त्यांनी बहिणींना व भावांना शिकवून त्यांच्या लग्नाची जबाबदारीही चोख निभावली. श्री साळवी यांनी लहान भाऊ संदिप यास फार्मसीचे शिक्षण देऊन जोगेश्वरी येथे सुभाष मेडिकल नावाने दुकान सुरू करून दिले.
काळाची व कुटुंबाची गरज ओळखून त्यांनी अतिशय धाडसी निर्णय घेऊन १९९५ साली इस्टेट एजंटचा व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांची दिवसेंदिवस प्रगती होत गेली. त्यांच्या प्रामाणिक कष्टाचे फळ मिळाले.
व्यवसायाचे कोणतेही शिक्षण अथवा कौटुंबिक परंपरा नसताना देखील त्यांनी उल्लेखनीय, यशस्वी वाटचाल केली. प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी उंच मजल गाठली. त्यांनी “कोमल कन्स्ट्रक्शन” नावाने व्यवसाय सुरू केला. अनेक वर्षे हा व्यवसाय धडाडीने करून त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. सध्या श्री सुभाष साळवी यांचा जोगेश्वरी पूर्व व बदलापूर येथे महावीर प्रॉपर्टी कन्सल्टंट चा व्यवसाय यशस्वीरित्या चालू आहे.
सामाजिक कार्याचे बाळकडू त्यांना कुटुंबाकडून लाभले असे ते आवर्जून सांगतात. गावात कोणालाही कोणतीही मदत पाहिजे असल्यास त्यांचे कुटुंब नेहमीच सर्वांना मदतीचा हात देते. ती परंपरा त्यांनी आजही जपली आहे.
सामाजिक बांधिलकीचा वसा जपत श्री सुभाषजी साळवी यांनी दिगंबर जैन मंडळाची जोगेश्वरी येथे २०१२ मध्ये स्थापना केली. या मंडळाचा सामाजिक संघटन करण्याचा प्रमुख हेतु असून समाजाला बळकटी मिळावी, समाजाने प्रगती करावी याच प्रमुख उद्देशाने मंडळाची वाटचाल सुरू आहे.
जैन कासार सेनेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच समाज्यातील समस्यांवर चर्चा करण्यात आली.
श्री साळवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा जिल्ह्यामधून पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उत्तम कामगिरी करीत आहेत. समाजाला लाभदायक असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम केले जातात.
महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम देखील अतिशय उत्साहात साजरा होतो. सर्वांना आग्रहाचे आमंत्रण असते. उत्तम प्रतिसाद मिळतो. नगरसेवक तसेच विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असते. या कार्यक्रमात श्री साळवी यांच्या पत्नी, मुलगी व संपूर्ण कुटुंब सहभागी होते. महिला पोलीस कर्मचारी यांसाठी देखील हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
दिवाळीत देखील १०० ते २०० घरी मिठाई वाटली जाते. त्यामुळे गरिबांची दिवाळी देखील गोड होते. अनंत चतुर्थीला त्यांच्या विभागातील मोठया गणपती मंडळांना ते स्वतः प्रसाद देतात.
दर वर्षी निपाणी येथील स्थवनिधी येथे गुरुकुल शाळेतील गरजू मुलांना देखील शैक्षणिक साहित्याचे तसेच इतर उपयुक्त वस्तूंचे वाटप केल्या जाते.
श्री साळवी वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी गरजवंतांना मिठाई व इतर उपयुक्त साहित्याचे वाटप करतात.श्री साळवी यांचा ५० वा वाढदिवस देखील असाच उत्साहात सर्व प्रतिष्ठित मान्यवर, कुटुंब व मित्र परिवाराच्या सानिध्यात साजरा करण्यात आला.
दिलदार व्यक्तीमत्व लाभलेले श्री साळवी मोफत वधू वर मेळाव्याचे उत्तम आयोजन करतात. सर्वांचे हसतमुखाने स्वागत करून नाष्ठा व जेवणाची देखील उत्तम सोय केली जाते. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. माणसे वाढली तर जेवण वाढवा अशी सक्त ताकीद केली जाते. कोणीही उपाशी जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न असतो. यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो, जो आज अतिशय दुर्मिळ गुण आहे.
लहानपणापासून वडिलांसोबत आठवडा बाजारला ते जात. त्यामुळे बैलगाडीची त्यांना फार आवड आहे. गावात पूर्वी प्रवासाला बैलगाडी हेच साधन असायचे. गावात सर्वात मोठी बैलजोडी ही साळवी कुटुंबाची होती याचा त्यांना अभिमान आहे. त्यांचे काका हे गुरांचा व्यवसाय देखील करायचे. त्यामुळे श्री साळवी यांना बैलगाडीचे प्रचंड आकर्षण आहे. आजही कोठेही जाताना जर बैलगाडी दिसली तर थांबून आवर्जून फोटो काढतात.
सुभाषजी यांना पिठले भाकरी खायला खूप आवडते. तसेच त्यांना पांढरे वस्त्र परिधान करायला आवडते. पांढरा रंग म्हणजे त्यांना स्वच्छ वृत्ती व निर्मळ अंत:करणाचे प्रतीक वाटते.
साधी राहणी व उच्च विचारसरणी लाभलेले श्री साळवी सर्वांमध्ये लोकप्रिय आहेत. सर्व जण त्यांना प्रेमाने भाई म्हणतात.
त्यांचे प्रेरणास्थान वडील, काका (अण्णा) व माननीय बाळासाहेब ठाकरे आहेत. माणुसकी अजूनही जिवंत आहे हे श्री साळवी सारख्या लोकांकडे पाहून जाणवते.
श्री साळवी यांचा मुलगा दर्शन याचे बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण झाले असून तो वडिलांच्या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांची मुलगी कोमल
ग्रॅज्युएट आहे. त्यांची सुनबाई सौ सायली ही उत्तम गृहिणी आहे. श्री साळवी यांना एक नातू देखील आहे.
भाई हे नेहमीच सर्वांना मदत करतात. रात्री अपरात्री देखील ते लोकांच्या मदतीला धावून जातात. त्यांच्या घराचे व मनाचे दरवाजाने कायम सर्वांसाठी खुले असतात.
कोणतीही कौटुंबिक अथवा व्यवसायिक समस्या असली तरी ते नेहमीच सर्वांना साथ देतात. श्रीमंत – गरिब असा कोणताही भेदभाव ते करत नाही. सर्वांशी जोडून राहण्याची कला त्यांना उपजत आहे व त्यामुळेच ते सर्वांचे लोकप्रिय भाई आहेत.
समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान असते. वधू वर मेळाव्यात ते पालकांना व मुलांना मार्गदर्शन करतात. जोडीदार निवडताना श्रीमंत अथवा गरीब असा भेदभाव अथवा शिक्षित उच्चशिक्षित या पलीकडे विचार करावा, असे त्यांचे सांगणे असते.
शिक्षणाची तफावत बघू नका. परिस्थितीवर जाऊ नका. स्वकर्तृत्वावर यशस्वी वाटचाल करा असा मोलाचा सल्ला ते तरुणांना देतात.
सुभाषजी साळवी यांची यशोगाथा वाचल्यावर एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते, काही गोष्टी दिसतात तितक्या सोप्या नसतात. आयुष्यात यालाच अनुभव म्हणतात.
उंचावरून पडणाऱ्या पाण्याचाच
सुंदर धबधबा बनतो.
आयुष्यात चढउताराच्या अनुभवानेच
खरा मनुष्य घडतो.
कोकणाची शान तर जोगेश्वरी येथील जैन कासार संघटनेचा अभिमान लाभलेले धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष जी साळवी यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून अशीच उत्तमोत्तम कार्य घडत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
💦 अभिनंदन..🎉
समाजभूषण , माननिय श्री. सुभाष जी यांचा परिचय व धावता जीवन पट … रश्मी ताईंनी…. छान शब्दात सादर केला.
🙏🌹🙏
श्री साळवी यांच्या जीवनाचा प्रेरणादायी लेखाजोखा…