Friday, November 22, 2024
Homeबातम्या"समाजभूषण २" प्रेरणादायी - हेमंत कासार

“समाजभूषण २” प्रेरणादायी – हेमंत कासार

“समाजभूषण २” हे पुस्तक अतिशय प्रेरणादायी असून ते प्रत्येकाने आवर्जून वाचले पाहिजे. या यशकथा म्हणजे समाजाला लाभलेले हिरे आहेत, ज्यांनी शून्यातून त्यांचे विश्व उभे केले. त्यामुळे हे पुस्तक वाचून निश्चितच नवीन समाजभूषण तयार होतील यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास ज्येष्ठ कर सल्लागार हेमंत कासार यांनी व्यक्त केला. ते सौ रश्मी हेडे लिखित आणि न्यूज स्टोरी टुडे प्रकाशित “समाजभूषण २” या पुस्तकाच्या सातारा येथील प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऍड सौ सुचेता महेश कोकीळ या होत्या.

श्री हेमंत कासार पुढे म्हणाले, लेखिका रश्मी हेडे यांनी आता व्यावसायिक स्वरूपात लेखन करावे. समस्त समाजाची त्यांना भक्कम साथ राहील.

महाकालिका देवी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अमर रांगोळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हे पुस्तक लिहिणे ही सोपी गोष्ट नव्हे. कारण अनेक लोकांची माहिती संकलन करून ती शब्दात मांडणे हे खूप मेहनतीचे काम आहे व ते रश्मीताईंनी उत्तम केले आहे. असेच काम पुढेही त्यांच्या हातून घडावे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई अशोक कुंदप यावेळी बोलताना म्हणाल्या, श्री देवेंद्रजी भुजबळ व सौ अलकाताई भुजबळ यांची साथ व मार्गदर्शन लाभल्याने रश्मीच्या लेखणीला न्याय मिळाला. हे पुस्तक म्हणजे तिच्या प्रामाणिक कष्टाचे फळ आहे.

सौ संध्याताई खुटाळे मनोगत व्यक्त म्हणाल्या, इंग्रजी माध्यमातून शिकलेली एक मुलगी जेव्हा मराठीतून उत्तम लिखाण करते तेव्हा ती निश्चितच कौतुकास पात्र आहे. ती कुटुंबाची जबाबदारी पार पाडते, क्लासेस देखील घेते हे तेव्हा शक्य होते जेव्हा तिला कुटुंबाची साथ असते.

लेखिका सौ रश्मी हेडे म्हणाल्या की, समाजाच्या माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. तसेच कुटुंबाची, समाजाची साथ मिळाली. सामाजिक गुरू श्री हेमंतजी कासार, साहित्यिक गुरू श्री देवेंद्रजी भुजबळ व गुरू पत्नी सौ अलकाताई भुजबळ यांनी सतत मार्गदर्शन केले. त्यामुळे हा सर्व प्रवास सुखकर होऊ शकला. समाजभूषण या पहिल्या पुस्तकाप्रमाणेच ‘समाजभूषण २’ या पुस्तकाला देखील उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा ऍड सौ सुचेता कोकीळ यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सौ रश्मी यांच्या माहेरी, पुणे येथे धुमधडाक्यात पुस्तक प्रकाशन झाले तसेच ते तिच्या सासरी, सातारा येथेही होत आहे, दोन्ही ठिकाणी तिचा सत्कार झाला ही तिच्या कामाची पोच पावती आहे, असे सांगून आनंद व्यक्त केला. साहित्यिक क्षेत्रात काम करताना एकाग्रता फार महत्वाची असते. आज या क्षेत्रात उत्तम काम करणारे व्यक्तिमत्व रश्मीताईं मुळे समाजाला लाभलेलं आहे. या समाजभूषणानी आपल्या क्षेत्रात अजून उंच भरारी घेऊन स्वतःचे स्वतंत्र पुस्तक निघावे व ते लिहिण्याचा मान देखील रश्मी ताईना मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी सातारा कासार समाजाच्या वतीने लेखिका सौ रश्मी हेडे यांचा तसेच पुस्तकाची अत्यंत सुबक, सुंदर छपाई केल्याबद्दल लोकमंगल मुद्रणालयाचे श्री नीरज देशपांडे यांचा व ”समाजभूषण २’ पुस्तकातील उपस्थित कथा नायक, नायिका यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन श्री अनिल हेडे यांनी केले.

यावेळी महाकालिका देवी ट्रस्टचे विश्वस्त श्री रवींद्र कुंदप, विश्वस्त श्री शामराव सासवडे, श्री भानुदास मोहिरे आणि समाज बंधूभगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments