“सुवर्णधन 2024” हा प्रा डॉ सुवर्णा गुंड – चव्हाण ,सोलापूर यांनी संपादित, प्रकाशित केलेला दिवाळी अंक “मराठीची स्थिती गती” या विषयाला वाहिलेला आहे. या अंकात माझा पुढील प्रसिद्ध झालेला लेख हा चार महिन्यांपूर्वी लिहिलेला आहे. तेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झालेला नव्हता. म्हणून लेखात त्या विषयीचा काही उल्लेख नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
– संपादक
खरं म्हणजे, अजूनही समाज माध्यमांकडे पुरेसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मुख्यत्वे करून करमणुकीचे साधन म्हणूनच त्याचा वापर होत असतो. पण हे समाजमाध्यम कल्पकतेने, गांभीर्याने वापरले तर त्याचा कसा विधायक वापर होऊ शकतो याचे उदाहरण म्हणून आम्ही सुरू केलेल्या “न्यूज स्टोरी टुडे” www.newsstorytoday.com या आंतरराष्ट्रीय मराठी पोर्टलकडे बघता येईल.
या पोर्टलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या हे पोर्टल ९० देशात पोहोचले असून ५ लाखाहून अधिक याचे व्ह्युज आहेत.
मराठी भाषा, बातम्या, लेख, साहित्य, संस्कृती, कला, पर्यटन, सेवा याचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी हे पोर्टल महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे देश विदेशातील लेखक, कवी, वाचक, विविध क्षेत्रातील व्यक्ती या पोर्टलशी जोडले गेले आहेत आणि जोडले जात आहेत.
या पोर्टल वर आता पर्यंत दररोज एक लेख, बातमी, साहित्य तसेच काही विशेष प्रसंगी अनेक, अशा १००० हून अधिक कविता तर वाचक लिहितात.. या सदरातून वाचकांची असंख्य पत्रे प्रसिध्द झाली आहेत.
असे जरी असले तरी पोर्टल चालवित असताना काही समस्या दररोज भेडसावत असतात. त्यातील काही प्रमुख समस्या म्हणजे अजून हि खूप लोकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मोबाईल वर टायपिंग करणे जमत नाही. तर ज्या युवा पिढीला मोबाईल वापराचे ज्ञान आहे, ते फारसे काही लिहिताना दिसत नाहीत. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, “ज्यांचे कडे मंत्र आहे (सांगण्यासारखे काही) त्यांना तंत्र अवगत नाही आणि ज्यांना तंत्र अवगत आहे, त्यांच्या कडे मंत्र नाही !”
या समस्येबरोबरच दुसरी प्रमुख समस्या म्हणजे शुध्द लेखन ही होय. खरं म्हणजे ही समस्या केवळ आम्हालाच जाणवते असे नाही, तर छोटी छोटी तर जाऊच द्या, मोठी मोठी वृत्तपत्रे, वृत वाहिन्या यामध्ये देखील शुध्द लेखनाच्या खूप चुका आढळतात. आपण आपल्या भाषेविषयी जागरूक असलेच पाहिजे. आपली भाषा शुध्द लिहिल्या जाईल,बोलल्या जाईल याकडे आपला कटाक्ष असलाच पाहिजे.
तिसरी समस्या म्हणजे,इंग्रजी शब्दांचा अवास्तव वापर. खरं म्हणजे ज्या ज्या गोष्टींसाठी मराठी शब्द आहेत, तिथे तिथे आपण मराठी शब्दच वापरले पाहिजे. जिथे पर्यायच नाही, अशा ठिकाणी इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही भाषेतील शब्द वापरणे आपण समजू शकतो.
इथे एक गोष्ट मला आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे परदेशस्थ मराठी बंधू, भगिनी जितकी शुध्द मराठी भाषा लिहितात, बोलतात तितकी शुध्द मराठी भाषा आपल्या महाराष्ट्रातील बरीच मंडळीही वापरत नाही. याचे बहुधा महत्वाचे कारण म्हणजे आपल्याला आपल्या भाषेचा जितका अभिमान असायला हवा, तितका नसावा.
विशेष म्हणजे, एकीकडे महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद पडत आहेत, तर दुसरीकडे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशांमध्ये मात्र मराठी शाळा सुरू झाल्या आहेत आणि होत आहेत. अशा शाळांविषयीचे खुद्द न्युज स्टोरी टुडे पोर्टल वर प्रसिद्ध झाले आहेत.
खरं म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठी भाषा जगातील सर्वाधिक भाषा बोलण्याच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. या पोर्टल चे एक लेखक श्री दिलीप गडकरी यांनी तर युनो मध्ये मराठी भाषा वापरली पाहिजे, अशी सूचना केली आहे, ती खरंच विचारात घेण्यासारखी आहे.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, युवक युवतींनी प्रत्यक्ष पुस्तक वाचनाकडे अधिक भर देण्याची गरज आहे. सर्वच बाबी आज मोबाईल वर उपलब्ध असल्या तरी प्रत्यक्ष चांगली पुस्तके वाचल्याचा परिणाम, प्रभाव हा दूरगामी परिणाम करणारा, त्यातील सार कायमस्वरूपी लक्षात राहणारा असतो. त्यामुळे गरज म्हणून जरी आपण मोबाईलचा वापर करीत असतो, तरी पुस्तके वाचनाला तो पर्याय होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
मी इथे जरी प्रसार माध्यमातील मराठी बाबत काही विचार व्यक्त केले तरी प्रत्यक्ष व्यवहारात देखील मराठी माणसाने स्वतःच मराठी बोलले पाहिजे. निदान मुंबईत तरी अशी परिस्थिती दिसते की, समोर च्या व्यक्तीला मराठी येतच नसेल, असे गृहीत धरून मराठी माणूस स्वतःच हिंदी किंवा इंग्रजी भाषा बोलायला लागतो. बऱ्याचदा काही वेळाने लक्षात येते की, दोघेही मराठी आहेत म्हणून. काही वेळा तर मला असेही दिसून आले की, मराठी नसणारी व्यक्ती देखील उत्कृष्ट मराठी बोलू शकत असते पण आपणच अन्य भाषेत बोलू लागतो, त्यामुळे ती व्यक्ती ही त्याच भाषेत बोलू लागते.त्यामुळे आपल्या भाषेचा आपल्यालाच अभिमान नसेल, तर तो इतरांनी बाळगावा, अशी आपण अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे मराठी चा अभिमान याचा अर्थ दुसऱ्या भाषेचा दुस्वास असे अजिबात समजता कामा नये. उलट आजच्या जगात जितक्या अधिक भाषा आपल्याला येतील, तितका अधिक फायदा आपलाच होत राहील, हे वास्तव आपण लक्षात घेतले पाहिजे.
मराठीचा वापर वाढण्याबाबत विविध शासकीय, अन्य साहित्य संस्था प्रयत्नशील आहेत पण मला विशेष कौतुक वाटते ते म्हणजे काही काळापूर्वी स्वायत्तता मिळालेल्या ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयाने एम ए (मराठी) हा असा अभ्यासक्रम तयार केला आहे की, त्यात मराठी भाषेबरोबरच माध्यमांविषयीचे विषय असल्याने मराठी प्रसार माध्यमांची गरज मोठ्या प्रमाणात भागेल आणि या विद्यार्थ्याना देखील रोजगार उपलब्ध होईल.
समाज माध्यमे यांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे महत्व,अपरिहार्यता विचारात घेऊन तसेच अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये तर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मराठी शाळांची संख्या पाहून महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठे आणि स्वायत्तता मिळालेली महाविद्यालये यांनी मराठी भाषा, साहित्य आणि प्रसार माध्यमे यांची सांगड घालून अभ्यासक्रमात काळानुरूप बदल करणे किंवा नवीनच अभ्यासक्रम सुरू करणे ही काळाची गरज आहे.
(पूर्व प्रसिद्धी: सुवर्णधन दिवाळी अंक,सोलापूर)
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800