Tuesday, December 3, 2024
Homeयशकथासमाजरत्न नारायण भागवत

समाजरत्न नारायण भागवत

समाजासाठी तडफेने काम करणारे, धार्मिक, सामाजिक आदि विषयांवरील फर्डे वक्ते, उत्तम निवेदक, ज्ञानेश्वरी- भगवत गीतेेचे निरूपणकार, लग्न समारंभात नव दांपत्यांना शुभाशीर्वाद देणारे, अंत्यविधी – दशक्रियेत दुःखीत कुटुंबियांचे सांत्वन करणारे, हायस्कूलवर शिक्षक असताना विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित तन्मयतेने शिकवणारे आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीत एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारे अशा अनेक भूमिका एकाच वेळी समाजरत्न नारायण भागवत उर्फ अण्णा यांनी भूषविल्या. अशा या भागवत अण्णांचा शिक्षक दिनी म्हणजे ५ सप्टेंबर रोजी ७७ वा जन्मदिन साजरा करण्यात आला.त्यानिमित्त त्यांचे केलेले हे अभिष्टचिंतन.

समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होतो. शिक्षकांचे महत्त्व असाधारण आहे. ते जाणल्याशिवाय आपली तांत्रिक- यांत्रिक प्रगती होणार नाही अशी भूमिका भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची होती. त्यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर हा दरवर्षी शिक्षक दिन म्हणून देशात सर्वत्र साजरा होतो. याच राष्ट्रपतींच्या विचारांचे पाईक असलेले भागवत अण्णा यांचाही जन्मदिन हा शिक्षक दिनीच यावा हे तर समाजाचे भाग्यच म्हटले पाहिजे. भागवत अण्णा आपल्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी, गणित विषयाचे एक उत्तम शिक्षक, सर म्हणून वावरले. दहावीच्या,अकरावीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेणे, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे ही कामे त्यांनी एक शिक्षक म्हणून केली. समाजासमोर माइकवर आपुलकीने बोलताना त्यांच्या हाडीमासी शिक्षक असल्याचे पदोपदी जाणवते.

असे हे भागवत अण्णा घडले ते त्यांच्याच वडिलांच्या म्हणजे शंकरराव गणपतराव भागवत यांच्याच तालमीत. सुतार समाज हा तसा अत्यंत सूक्ष्मसंख्य समाज. असे असतानाही शंकररावांनी गावचे नेतृत्व आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर केले. वैयक्तिक, सामाजिक भांडणे, तंटे असले की चितळवेढेस आजूबाजूच्या गावातील लोक हे समांतर असलेल्या शंकरराव मिस्तरींंच्या कोर्टात यायचे. लांबणारी भांडणे, तंटे तिथेच सामोपचाराने मिटायची. इतका दबदबा शंकररावांचा होता. शंकररावांच्या या मध्यस्थीत एक नैतिकता होती. गावी किंवा आजूबाजूच्या गावात जर कीर्तन, प्रवचन असले की कीर्तनकार, प्रवचनकारांचा राबता हा शंकररावांच्या घरी असे.या अध्यात्मिक विचारांच्या बैठकीतून शंकररावांकडे नैतिकता आली होती. याच संस्कारांचे सिंचन भागवत अण्णा यांच्यावर नकळत झाले. आता पुढे पुढे जायचे अशी मनाला उभारी देत अण्णांमध्ये ज्ञानलालसा निर्माण झाली. चितळवेढे, राजुरला शालेय,माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अण्णा इंग्रजी स्पेशल विषय घेऊन बी.ए. झाले. हे करीत असताना गावची यात्रा, गणेशोत्सवात वकृत्व स्पर्धा, नाट्य स्पर्धा होत.यातही त्यांचा पुढाकार असे. यातूनच ते एक उत्तम वक्ते, निवेदक म्हणून पुढे आले.

एखादा हायवे, रस्ता यांची वळणे ही आधीच ठरलेली असतात. पण मानवी जीवनातील रस्त्यांवर माणूस कोणत्या वेळी कोणते वळण घेईल हे त्यालाही सांगता येत नाही. असाच प्रसंग भागवत अण्णांच्या जीवनात अनपेक्षितपणे आला. चार वर्षे इंग्रजी, गणिताचे धडे देणारे भागवत गुरुजी पाचव्या वर्षी लोकांना “एलआयसीत गुंतवणूक करा. आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे जीवन सुरक्षित करा.” , “जीवन के साथ भी, जीवन के बाद भी” असे धडे देऊ लागले. एलआयसीतील नोकरी हा त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचार टर्निंग पॉईंट ठरला. या नोकरीतूनच भागवत अण्णांना आर्थिक स्थिरता आली. यामुळेच अण्णा सुतार समाजाला वेळ देऊ शकले.

!!आधी प्रपंच करावा नेटका!!
मग घ्यावे परमार्थ विवेका !!
या संत रामदास स्वामींच्या उक्तीनुसार अण्णांनी आधी आपला संस्कार नेटका केला. नंतर समाजकारण आणि परमार्थही ते मोठ्या आवडीने आजही करीत आहेत.

परमार्थाचे बाळकडू भागवत अण्णांना हे पिता शंकररावांकडून मिळाले. यामुळेच अण्णा ज्ञानेश्वरी, भगवत गीतेवर सहजतेने निरूपण करतात. आळंदीच्या विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्थेचे ते आजीव सभासद तर सुतार समाज धर्मशाळा- त्रिंबकेश्वर येथे ते ज्येष्ठ विश्वस्त आहेत.याच बरोबर ते अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघ समाज, अखिल महाराष्ट्र ओबीसी संघटना यांच्याशी ते आजही संलग्न आहेत.तसेच अण्णा ज्या सांगवी-पुण्यात आता रमलेले आहेत तेथील सांगवी चैतन्य हास्य क्लबचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेेत. आळंदी, त्रंबकेश्वरची त्यांची वारी कधी चुकत नाही.

अशा या धार्मिक वृत्तीच्या अण्णांचा जन्म 5 सप्टेंबर 1948 रोजी नगर जिह्यातील चितळेवेढे येथे झाला. त्यांना पाच भाऊ, तीन बहिणी आहेत. त्यातील भागवत अण्णा हे शेंडेफळ आहे. समाज वैभव मुरलीधर गोरे (काका ) संगमनेरकर हे त्यांचे सासरे होते.पत्नी सौ. संजीवनी यांनी आपल्या पतीस मोलाची विशेषत: समाज कार्यासाठी मोकळीक दिली,साथ दिली.अशा या अण्णांना वैभव, जयंत, गौतम व कन्या सौ. स्मिता बाळासाहेब रोकडे ही मुले आहेत. श्रीरामपूरला एलआयसीत नोकरीत असताना त्यांनी समाजकार्याला गति दिली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तेथे प्रभू श्री विश्वकर्माचे एक सुंदर मंदिर साकारले गेले.

१९७१ पासूनच अण्णांनी सुरू केलेले समाजकार्य त्यांना स्वस्थ बसू देत नसे. यातूनच महाराष्ट्र विश्वकर्मा महासभा या मुंबईतील संस्थेशी अण्णा हे जोडले गेले. १९७५ ते १९९० या काळात ते तेथे कार्यरत होते. महासभेत असतानाच त्यांनी त्यांच्या समाज कार्याला खऱ्या अर्थाने आणखी वेग दिला.जेंव्हा सुतार समाजात फारसी जनजागृती झालेली नव्हती अशा काळात म्हणजे १९७७ मध्ये भागवत अण्णांनी संगमनेर येथे राज्यस्तरीय सुतार समाज मेळावा घेतला. नंतर पुढे त्यांनी राज्य पातळीवरील दुसरा मेळावा नाशिक नगरीत यशस्वीपणे घेतला. या दोन्ही मेळाव्यातून त्यांनी समाज संघटित करण्याचा मंत्र समाज बांधवांना दिला. यामुळेच आज सुतार समाज चांगल्यापैकी संघटित झालेला दिसत आहे. मुला मुलींची लग्ने जमवण्यासाठी समाज बांधवांचा वेळ, पैसा हकनाक वाया जातो. हे लक्षात घेऊन भागवत अण्णांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर आणि परिसरात २००६ ते २०१८ या काळात अनेक वधू वर परिचय मेळावे यशस्वी झालेले आहेत. अशा या अण्णांविषयी लिहावे तेवढे कमीच आहे. अनेक कुटुंबात आजी आजोबा हे आपल्या नातवंडांवर संस्कार करतात. त्याच माळेतील भागवत अण्णा आहेत. पुणे, गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालय ही शाळा त्यांची नात वृंदा हीची. ‘ग्रॅण्ड पैरेंट्स डे’ अर्थात ‘आजी आजोबा दिन’ गेल्या वर्षी येथे होता.तेंव्हा या कार्यक्रमात या शाळेतील सर्व चिमुकली मुले मुली आणि निमंत्रित आजी – आजोबा,शिक्षक जमलेले होते. तेेथे भागवत अण्णांनी अस्सखलीत, फर्ड्या इंग्रजीत भाषण केले.असे इंग्रजीत बोलणारे तेच एकमेव आजोबा होते. त्यांचे हे भाषण खूपच प्रभावी होते.असे सर्व टिचर माझ्या बाबांचे अभिनंदन करताना म्हणत होते, असे वृंदाने सांगितले.असे हे माझे बाबा माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत.

वृंदाने व्यक्त केलेल्या या भावना संपूर्ण समाजाला लागू होतात.अण्णा संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान आहेत.भागवत अण्णांच्या प्रगतीचा पाया हा प्रयत्नांवर उभा आहे. “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेेलही गळे” या विचारांवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. “कर्म से हार या जीत कुछ भी मिल सकता है”. “लेकिन कर्म न करने से केवल हार ही मिलती है”. हे बोधपर वाक्य ज्या एलआयसीत अण्णांनी काम केले त्या कंपनीच्या जाहिरातीत असून या वाक्यातील विचार आचरणात आणणारे अण्णा आहेत. शेवटी आपण ज्या समाजात घडलो,त्या समाजाचेही आपण काही देणे लागतो याच भावनेतून अण्णा जीवनाकडे पाहतात. आपल्याकडे असलेला वेळ, आपल्याकडे असलेले विचार हे समाजाला देण्यात धन्य मानणाऱ्या आणि समाजकार्य करताना कोणतेही आढेवेढे न घेणाऱ्या चितळवेढेच्या या ज्येष्ठ समाजसेवकाला त्यांच्या ७७ व्या जन्मदिनानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.

— लेखन : नारायण जाधव. ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण : २६
Dr.Satish Shirsath on पुस्तक परिचय
सौ. शिवानी श्याम मिसाळ. on कदरकर काकू : चैतन्याचा झरा
वासंती खाडिलकर, नासिक on कदरकर काकू : चैतन्याचा झरा
गोविंद पाटील on शब्दात येत नाही