Thursday, February 6, 2025
Homeयशकथासमाजसेवी प्रकाश तवटे

समाजसेवी प्रकाश तवटे

अतिशय प्रसन्न, हसतमुख, संयमी, शांत, मनमिळावू असे व्यक्तिमत्व लाभलेले, समाजाचा विकास हा ज्यांच्या जीवनाचा ध्यास आहे, लहान मोठयाशी मिळून मिसळून व जुळवून रहाण्याची कला ज्यांना अवगत आहे, सामाजिक संघटन करण्यात ज्यांचा खूप मोठा वाटा आहे, असे समाजाला लाभलेले एक अनमोल रत्न म्हणजे, कराड येथील श्री प्रकाश दादा तवटे होत.

कासार समाज व प्रकाश दादा तवटे हे जणू समीकरणच झाले आहे. त्यांना पहाताक्षणी एक वाक्य मनात येते ते म्हणजे “मूर्ती लहान पण कीर्ती महान”! मनुष्याची खरी ओळख ही त्याच्या नावावरून किंवा
रूपावरून नव्हे तर तो करत असलेल्या कामावरून होत असते असे सदैव कार्यशील असलेले श्री प्रकाश दादा तवटे यांना पाहून खचितच वाटते. तर जाणून घेऊ त्यांची प्रेरणादायी जीवन कहाणी…..

प्रकाश दादा तवटे हे श्री बाळकृष्ण तथा रुस्तुमशेठ महादेव तवटे व मालन बाळकृष्ण तवटे यांचे पुत्र होत. त्यांचा जन्म पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथे १ मार्च ६७ रोजी झाला. येथीलच लक्ष्मीदेवी हायस्कूल मध्ये त्यांचे शिक्षण झाले. पुढे कराड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज येथे एस.वाय. बी.एस.सी.पर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी नंतर घरच्या व्यवसायात लक्ष दिले.

त्यांच्या वडिलांनी कराड येथे भांड्यांचे दुकान १९७६ साली सुरू केले. त्यावेळी व्यवसायासाठी त्यांचे वडील रोज कुंभारगाव व कराड असा २८ किलोमीटरचा प्रवास करत. पुढे १९८९ साली संपूर्ण कुटुंब कराड येथे स्थायिक झाले.

प्रकाश दादांनी जुन्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन असून भांडी, होम ॲपलायानसेस तसेच गिफ्ट आयटेम देखील दुकानात विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली. ग्राहकांचा विश्वास व उत्तम दर्जा हा यशाचा मूलमंत्र त्यांनी व्यवसायात जपला आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायाची भरभराट होत गेली.

मूळ व्यवसायाबरोबरच त्यांनी बांधकाम व्यवसाय वर प्लॉट्सची विक्री या व्यवसायाची जोड दिली. ग्राहकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्यापद्धतीने सोयी सुविधा पुरविल्या. कामात सचोटी व व्यवहारात प्रामाणिकपणा असेल तर प्रगती नक्कीच होत असते असे दादांचे मत आहे.

दादांना सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली ? असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, “माझे वडील सातारा जिल्हा विकास समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी काळाची गरज लक्षात घेउन २०१२ साली कराड येथे वधू वर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे कार्याध्यक्ष पद हे मला देण्यात आले होते. अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने तो मेळावा संपन्न झाला. दोन दिवसीय मेळाव्यात खूप उपस्थिती होती. लोकांची उत्तम व्यवस्था करण्यात आली. अनेक प्रमुख मान्यवरांची देखील उपस्थिती होती. मी हे पहात होतो, मदत करत होतो, अनुभव घेत होतो, नेतृत्व करत होतो. समाजात काम करण्याची जणू ही सोनेरी संधी मला लाभली होती आणि येथूनच सामाजिक कार्याची मला आवड झाली असे सांगताना ते म्हणाले, आज माझ्या या निर्णयाचा खूप आनंद होतो की आपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो, हाच माझ्या सामाजिक कार्याचा एकमेव हेतु आहे व पुढेही रहाणार आहे.”

त्यांचे उत्कृष्ठ काम पाहून प्रकाशदादा तवटे यांना २०१४ साली अध्यक्षपदी असलेल्या श्री नाना इटकर यांनी युवा अध्यक्ष म्हणून घोषित केले. लातूर येथे उत्साहात पद्गग्रहण सोहळा संपन्न झाला.

आता खऱ्या अर्थाने त्यांच्या सामाजिक कामाची सुरवात झाली. २०१४ साली कराड येथे युवक मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. त्यात १२३३ युवकांचा सहभाग होता. महाराष्ट्राची कार्यकारणी जाहीर झाली. ३६ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून नाव जाहीर झाले. पुढे २०१८ – २०१९ या कालावधीत श्रीरामपूर, माजलगाव,
बीड, लातूर, बारामती, सातारा असे अनेक ठिकाणी युवक – युवती, महिला यांना एकत्रित करून त्यांचे संघटन करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले.

३६ जिल्यातील ३६ जिल्हा अध्यक्ष व सहा विभागीय अध्यक्ष यांना बरोबर घेऊन १३ कलमी अजेंडा घेऊन तो प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात आला.

मध्यवर्तीला युवकांचे नेतृत्व पाहिजे, सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे हे लक्षात घेऊन युवकांना एक चांगले नेतृत्व करणारे अध्यक्ष म्हणून श्री शरदजी भांडेकर यांना अध्यक्ष करण्यात आले यामध्ये युवक संघटनाचा खूप मोठा वाटा आहे असे ते आवर्जून सांगतात.

त्यांनी नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा योग्य मेळ घातला. सर्वांना संघटित केले. ज्येष्ठांचे अनुभव व युवकांची ताकद तसेच महिला वर्गाचेही संघटन करण्यात आले. कासार समाजाची एक अत्यंत मजबूत साखळी तयार झाली. नाशिक येथील पंचवटी कासार संघटना,
पुणे जिल्हा विकास समिती, सो.क्ष.कासार कालिका संस्था पुणे, कराड ट्रस्ट, श्रीरामपूर मानवता चॅरिटेबल ट्रस्ट, इचलकरंजी जैन सेवा मंडळ, महाकालीका ट्रस्ट सातारा यांनी मोठा सहभाग नोंदवला.

२०१९ साली कोरोनाची लाट आली. मात्र त्यावेळी प्रत्यक्ष काही करता आले नाही. तरीही हार न मानता अथवा न थांबता अप्रत्यक्षपणे काम सुरू ठेवले. ऑनलाईन पध्दतीने वधू वर डेटा गृप तयार करण्यात आले. असे सहा गृप झाले ज्यामध्ये १४०० मुला मुलींचा सहभाग आहे. फोन द्वारे पालक एकमेकांच्या संपर्कात राहू शकले. घर बसल्या देखील स्थळ पहाण्यात येत होती. या काळात देखील २० ते २५ लग्न जमली खूप चांगला फीडबॅक मिळाला. अनेकांनी फोन करून या उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम राबविण्यात युवकांचा खूप मोठा वाटा आहे असे दादा आवर्जून सांगतात. आजही हे काम सातत्याने चालू आहे.

ऑनलाइन जनगणना करण्याचे काम देखील करण्यात आले. त्याला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. टास्क फोर्स द्वारे गरजवंताला औषध उपचार, इंजेकॅशन्स,
आर्थिक मदत देखील करण्यात आली. या कामात आनंदजी डांगरे व विविध जिल्ह्यातील युवकांचा खूप मोठा सहभाग होता. रात्री, अपरात्री देखील कार्यकर्ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदत करत होते. माणुसकीचा झरा अखंड वाहत होता. वेळ वाईट होती, मात्र साथ अनेकांची होती. त्यामुळे मानसिक व आर्थिक बळ मिळत होते त्यावेळी तेच खूप गरजेचे होते. समाज आपल्यासाठी आहे याची जाणीव झाली व एक अतूट नाते निर्माण झाले.

दरम्यान, अवकाळी पाऊस झाला. परिस्थिती खूप बिकट झाली. अशा वेळी देखील युवकांना त्यांच्या घरी जाऊन मूलभूत गरजा भागवण्यासठी वस्तू देण्यात आल्या. खूप मोठया प्रमाणात निधी देखील मिळत होता. जेथे कामात पारदर्शकता व प्रामाणिकपण असतो तेव्हा कोणतीही गोष्ट कमी पडत नाही याची जणू ती प्रचिती होती.

पुणे जिल्हा विकास समिती, सो.क्ष.कासार समाज, पुणे व युवक मध्यवर्ती मंडळ यांनी एकत्र येऊन आज गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा लाभ देत आहेत.

आत्मनिर्भर कासार या योजनेखाली २० विद्यार्थ्यांना मोफत कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात आले. शिष्यवृत्ती देखील जाहीर झाली, ज्यामध्ये अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. कोणाचेही
फीविना शिक्षण थांबू नये याच एकमेव हेतूने आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्यात आले व समाजाचे देखील सहकार्य लाभले.

श्री प्रकाश दादा तवटे, श्री शरदजी भांडेकर,
श्री आनंद डांगरे व संपूर्ण टीम हे सर्व काम अतिशय चांगल्याप्रकारे करत आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सर्व टीमने उल्लेखनीय कामगिरी बजावली ही खरच कासार समाजाच्या दृष्टीने एक अभिमानस्पद बाब आहे.

अगदी तळागाळातील कासार समाजापर्यंत पोहचण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात विकास समिती तयार करण्यात आली जेणे करून कामाचा ताण केवळ मध्यवर्ती वर न पडता काम विभागले जाईल व उत्तम कामगिरी करता येईल हाच प्रमुख हेतू. त्या संदर्भात पहिली मीटिंग कराड येथे झाली. पश्चिम महाराष्ट्राची रचना व संघटना कशी उभी करावी या बद्दल चर्चा झाली.

पुढे सातारा येथे विविध विषयांवर विचारविनिमय होऊन खऱ्या अर्थाने कामाला गती मिळाली व प्रमुख मान्यवरांनी एकमताने श्री प्रकाश दादा तवटे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

पुणे येथे अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पद्ग्रहन सोहळा दिमाखात पार पडला. तेव्हा श्री प्रकाश दादा तवटे यांनी समाजाच्या जनगणनेची यादी मध्यवर्तीचे अध्यक्ष श्री शरदजी भांडेकर यांना सुपूर्त केली. पश्चिम महाराष्ट्र विकास समिती व मध्यवर्ती मंडळ एकजुटीने काम करतील असे आश्वासन देखील देण्यात आले. या सोहळ्यात त्यांनी एक जाहीरनामा देखील मांडला ज्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण मुद्दे, जसे की विखुरलेल्या समाजाला एकत्रित आणणे, सामाजिक संघटनांचे महत्व, व्यवसायात नव्या दिशा शोधणे, तरुणांना आत्मनिर्भर करणे, महिलांचे संघटन, अर्थजनासाठी नवे उपक्रम राबविणे, विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे, जिल्हास्तरीय आरोग्य शिबीर राबविणे व विवाहसंस्था टिकण्यासाठी चर्चासत्राचे नियोजन करणे आदी बाबी आहेत.

आज कराड येथे श्री प्रकाश दादा तवटे यांच्या नेतृत्वाखाली समस्त कासार समाजाच्या एकजुटीने विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. जसे की नवरात्रीचे कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, महिला संघटन करून त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जाते.

कराड कालिका ट्रस्टच्या निवडणुकीत सम विचारी लोकांनी ट्रस्टची स्थापना केली. प्रकाशजी तवटे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून कराड कालिका मंदिर याचे नूतनीकरण केले. सुंदर असे मंदिर तयार झाले. कराड येथील कासार समाज एकजुटीने कार्यरत आहे. समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात सर्वांचा मोठा सहभाग असतो याची प्रचिती म्हणजे नुकतीच झालेली मॅरेथॉन तसेच पुणे येथील पद्ग्रहन सोहळ्यात असलेली कराडच्या लोकांची उपस्थिती ही होय.

प्रकाशजी तवटे यांना क्रिकेटची आवड अगदी बालपणापासून आहे. त्यावेळी त्यांनी जिल्हास्तरीय अनेक सामने खेळले आहेत. वाचनाची देखील त्यांना आवड आहे. प्रकाशजी यांना राजकीय मंडळींशी ओळख करून घ्यायला व त्यांच्याशी जोडून रहायला आवडते. त्यामुळे समाजाला देखील त्यांच्या माध्यमातून मदत अथवा मार्गदर्शन मिळू शकते असे त्यांना वाटते.

प्रकाशजी यांच्या वडिलांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवर मंडळी, श्री बाळासाहेब देसाई, माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण, माजी नगराध्यक्ष पी.डी.पाटील, श्री यशवंतराव मोहिते यांच्याबरोबर घरोब्याचे संबंध होते. वडिलांनी अनेक तरुणांना नोकरी मिळण्यासाठी स्वावलंबाचे धडे देऊन
मदत केली. वडिलांच्या पुढाकाराने त्यावेळी कुंभारगावात प्रथम एस टी सेवा सुरू करण्यात आली. वडील हेच त्यांचे आदर्श असून सामाजिक कार्याची आवड ही वडिलांपासून मिळाली आहे असे ते आवर्जून सांगतात.

प्रकाशजी तवटे यांचे एकत्रित कुटुंब असून त्यांचे जेष्ठ बंधू श्री श्यामसुंदर तवटे, वहिनी सौ गीतादेवी श्यामसुंदर तवटे यांचे मोलाचे सहकार्य असल्याने ते समाजात काम करू शकतात. प्रकाश दादा बाहेरगावी असल्यावर सर्व कारभार ते सांभाळतात.

पत्नी सौ सुलभा प्रकाश तवटे या खूप समजूतदार व समंजस असल्याने त्यांचा प्रकाशजी यांच्या सामाजिक कार्यात पूर्ण पाठिंबा आहे असेही ते आवर्जून सांगतात. समाजात काम करताना कळत नकळत घराकडे दुर्लक्ष होते. वेळ देता येत नाही. मात्र पत्नी कोणतीही तक्रार न करता घरची जबाबदारी सांभाळून घेते. त्यामुळे ते निश्चिंतपणे समाजकार्य करू शकतात असे ते आवर्जून सांगतात.

प्रकाश दादा यांचा मुलगा सौरभ हा एम.बी.ए. झाला असून सध्या हैदराबाद येथे नोकरी करत आहे. त्याला देखील वडिलांसारखी क्रिकेटची खूप आवड आहे. त्यांची मुलगी सौ सायली प्रतीक मोहिरे ही बंगलोर येथे स्थायीक असून नोकरी करत आहे.

कासार संघटनची शक्ती जोमाने तयार करावी तसेच भावी पिढीला प्रेरणा देणारी असावी असे त्यांना मनस्वी वाटते. त्यामुळे ते तरुणांना हाच संदेश देतात की त्यांनी समाजाच्या प्रवाहात यावे. समाजाचा विकास साधायचा असेल तर ज्येष्ठांचे अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, महिलांची साथ व तरुणांचा आवाज म्हणजे त्यांचे विचार ही लक्षात घेतले पाहिजे कारण ज्या समाजात युवकांचा मोठा सहभाग असतो तेथे समाजाची प्रगती नक्कीच होऊ शकते व कामालाही गती मिळते असे त्यांना वाटते. असे हे प्रकाशदादा तवटे तरुण पिढी साठी एक आयडियल आहे. एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचा भावी कार्यासाठी अनेक शुभेच्छा.

रश्मी हेडे.

– लेखन : रश्मी हेडे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. 🌹अप्रतिम व्यक्तिमत्व 🌹
    अभिनंदन
    लेखन सुरेख
    🌹धन्यवाद रश्मी हेडे मॅडम 🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी