परवाच कूठेतरी मी वाचलं आहे. त्यात एक गुरूजी दुसऱ्या गुरूजींना समिधावरून काहीतरी सांगत आहेत कि,….’अरे ! त्यांचं काय एवढं महत्व ? यज्ञातील वस्तू अग्नीपर्यंत पोचवायच्या.”
खरंच समिधांचे काम फक्त इतकंच आहे. हे काम करता करता स्वता:जळुन जात आपलेच अस्तित्व नष्ट करायचे. दिवसभर हे डोक्यातुन जात नव्हते. माझा मलाच राग येत होता. एकेक जळुन गेलेली समिधा आठवत होती.
पुराणातल्या, सीता, ऊर्मिला, मंदोदरी, भरताची बायको, ह्यांच्या बरोबरीच्या युद्धात हरणार म्हणुन चिता जवळ करून जोहार करणार्या रजपूत स्रिया राण्या, महाभारतातली गांधारी, कुंती द्रौपदी याही अशा समिधाच होत्या. पुरुषी अहंकाराच्या अग्नीत जळुन गेल्या व जाताना अग्नीपर्यंत त्यावेळचा काळ घेऊन गेला.
काळ कोणताही असो. “पुरूषी अहंकार, पुरूषी श्रेष्ठत्व आणि पुरुष प्रधान समाज… हाच स्त्रीला समिधा बनवणारा खरा समाज कणा होता.
आजही स्त्री शिकली, मिळवती झाली स्त्रीस्वातंर्याचे वारे वाहिले पण समाज मात्र पुरूष प्रधानच राहिला आहे. स्त्री. -पुरूष समानता फक्त कागदावरच राहिली आहे.
घरात दारात कचेरीत समाजात पुरूष च सरस समजला जातो. आजही ‘मुलगा ‘झाल्यावर बाई सुटकेचा श्वास सोडते. मुलगी पसंत पडली तरच लग्न जुळते. वयस्कर स्त्रिया घरात इतर स्रियांना अपमानित करतात. कार्यात पुरूष च अधिक विधी करतो व स्त्री मम म्हणते.
मुलीपेक्षा मुलाच्याकडे शिक्षणाच्याबाबतीत झुकतं माप असतं. अशावेळेस आपले कर्त्वव्य अग्नीपर्यंत पोचवत या समिधा जळुन जातात.
शेवंताच्या मुलाचे पांच वर्षापूर्वी लग्न होऊन दोन मुली झाल्या. एक दिवस ते सगळे गावाला गेले आणि चार दिवसात शेवंताची सुन विहिरीत पडुन देवाकडे निघुन गेली.
इकडे परत येऊन मुली मामाकडे पोंचवल्या व सहा महिन्यात दुसरी सुन आली सुद्धा. वर्षात मुलगा झाला व शेवंताने दणक्यात बारसे केले. पहिली समिधा जळुन गेली.
नलुची मैत्रीण आठ वर्ष झाली लग्नाला मुल होत नव्हते. एक दिवस संध्याकाळी देवाजवळ दिवा लावताना आग लागली व जळुन मेली. मुल तर हवेच या पुरषी अहंकारात ती समिधा आपले शिक्षण नोकरी रूप रंग घेऊन अग्नीपर्यंत पोचली व नष्ट झाली.
अशा अनेक स्त्रिया शिकलेल्या मिळवत्या पण … आवडत नाहीत… दुसरीच आवडायला लागते…. मुल होत नाही… मुलगाच होत नाही… माहेरून पैसा आणत नाही. … अशा कोणत्या ना कोणत्या पुरूषी अहंकारात स्वत्व अग्नीपर्यंत पोचवुन स्वता:समिधा म्हणुन जळुन गेल्या.
आजही अपवाद सोडले तर स्त्रीला काही निर्णय घ्यायला पुरूषाची परवानगी लागते.घरात पैशाचा हिशोब पुरूषांना द्यावा लागतो. एकत्र कुटुंबात कोणाची कशी कोणाची कशी पण नजर झेलावी लागते. प्रथम पुरूषांची आवड, मत, खुषी यापुढेच मान तुकवावी लागते. नाहीतर समाज… म्हणजे पुरूषी अहंकारच तिला दुषणे देतो.
शेवटी अगतिकतेने मान्य करावेच लागते कि, स्त्री ही प्रथम भोग्य वस्तू… हो ! तिच्या भावना इच्छा खुषी पूर्णपणे नाकारली गेलेली ‘भोग्य वस्तु’आणि गरज संपली की ‘समिधा’…. हेच या पुरूष प्रधान समाजाने ठरवुनच टाकले आहे आणि अशा अनेक स्त्रिया अग्नीत जळुन गेल्या आहेत.
— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान भावाभिव्यक्ती… आजच्या समाजात “महिला दिन”साजरे करतात म्हणून पुरुष हसतात, अवहेलना करून म्हणतात, “आम्ही दीन आहोत, महिला वरचढ झाल्या आहेत ” , पण हे समाजातील केवळ काही भागापुरते खरे आहे; बहुतांश समाजातील महिलांची स्थिती ह्या लेखात वर्णन केल्याप्रमाणेच “समिधा” स्वरूपच आहे. दु:ख मात्र एकच आहे, की शेवंताच तिच्या सुनेची आहुती देताना दिसते; ती खंबीर असेल, तर शेवंताचा नवरा इतके टोकाचे पाऊल उचलायला धजणारच नाही! महिलांनो, स्वतः समिधा बनू नका आणि दुसऱ्या महिलेला समिधा म्हणून जळू देऊ नका!