हिंदू संस्कृती हिंदुस्थानचा श्वास आहे. त्यामुळे जर हिंदुस्थानचं संरक्षण करायचं असेल, तर आपल्याला हिंदू संस्कृतीचं संवर्धन करावं लागेल, हे स्पष्ट आहे आणि यासाठी संघटनेची गरज आहे हे ओळखून नागपूर येथे डॉ केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ सालच्या विजया दशमीला दहाबारा समविचारी तरुणांना सोबत घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. सुरुवातीला दहाबारा स्वयंसेवक असलेल्या संघाचे आजमितीला जगभर ४० लाखाहून अधिक सदस्य आहेत.

संघाचे विचार देश भर पोहोचविण्यासाठी १९४२ सालापासून प्रचारक नेमण्यास सुरुवात झाली. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन हजारो स्वयंसेवक आपल्या घरादाराचा, करिअरचा, सुखासीन जीवनाचा त्याग करून आयुष्यभर झिजत राहिले.
या निस्वार्थी भावनेने आयुष्य वेचलेल्या प्रचारकांचे त्यागमय जीवन आणि कार्य जगासमोर आले पाहिजे, अशी संकल्पना
अमेरिकास्थित जेष्ठ अभियंते तथा स्वयंसेवक श्री विनोद बापट यांना सुचली. ती संकल्पना त्यांनी विवेक प्रकाशनाचे संपादक श्री रविंद्र गोळे यांच्या समोर मांडली. त्यांनीही ही संकल्पना मनावर घेऊन संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य लक्षात घेऊन मूर्त स्वरूपात साकारली आणि अशा प्रकारे “समिधा” हा निवडक १०१ प्रचारकांच्या प्रेरणादायी जीवनाची कहाणी सांगणारा ग्रंथराज शनिवारी श्री राम जन्मभूमी न्यास चे कोशाध्यक्ष पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या आणि इतर मान्यवरांच्या हस्ते मुंबईतील बाबुलनाथ परिसरातील श्री प्रेमपुरीजी आश्रम ट्रस्ट च्या सभागृहात प्रकाशित करण्यात आला.

यावेळी बोलताना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले की, मातृभूमीची आस असणाऱ्या प्रत्येकास भावणाऱ्या या ग्रंथात प्रचारकांचे संपूर्ण जीवन नाहीय तर त्यांच्या जीवनाची नुसती झलक आहे. राम मंदिर आणि राष्ट्राच्या उभारणीत अमूल्य योगदान असलेल्या सर्व प्रचारकांना आपण वंदन करतो. संन्यासांना तरी त्यांच्या भगव्या कपड्यांमुळे आपसुकच मान,सन्मान मिळतो.पण हे प्रचारक संन्यासापेक्षा अधिक जास्त सन्यासी होते. ते प्रण्यासी झाले होते. अशा प्रचारकांचे जीवन लोकांपुढे आले पाहिजे, असे आपल्याला खूप वर्षांपासून वाटत होते, ते काम आज पूर्ण झाले असे सांगून त्यांनी प्रचाराकांना कशा कठीण परिस्थितीत काम करीत रहावे लागले हे सोदाहरण सांगितले. स्वामीजींच्या अमोघ वाणीने सर्व सभागृह स्तब्ध झाले होते.

आजपर्यंत विवेक प्रकाशनाने ३५० पुस्तके प्रकाशित केली असली तरी “समिधा” हा ग्रंथ विवेक प्रकाशनाचा मुकुटमणी ठरेल असा विश्वास कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

विवेक प्रकाशनाचे संपादक श्री रविंद्र गोळे यांनी विवेक प्रकाशनाच्या ७७ वर्षांच्या वाटचालीचा नेमकेपणाने आढावा घेऊन “समिधा “ची माहिती दिली.

यावेळी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते श्री विनोद बापट आणि ग्रंथातील रेखाचित्रे साकारणाऱ्या कुमारी तन्वी नांगुडे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे यांनी सर्व मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रतीक कडू यांनी त्यांच्या भरदार आवाजात संघ गीत सादर केले. निवेदिता सावंत यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन सौ शीतल खोंड यांनी केले.

या कार्यक्रमास संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे सभागृह खचाखच भरले होते.

अनावश्यक भाषणबाजी टाळल्याने आणि अत्यंत आटोपशीरपणे कार्यक्रम झाल्याने, हा कार्यक्रम दीर्घकाळ लक्षात राहिल, असा झाला. याबद्दल सर्व संबंधितांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच.

दूरदर्शन मधील आमची सहकारी, निर्माती मीना गोखले ही सौ मीनल विनोद बापट यांची बाल मैत्रीण. तिने आम्हाला; म्हणजे जेष्ठ पटकथा लेखक दिग्दर्शक श्री प्रदीप दीक्षित (हे तर पुण्याहून आले होते), रामायण फेम कॅमेरामन श्री अजित नाईक, मी स्वतः (देवेंद्र भुजबळ), आणि माझी पत्नी, सौ अलका भुजबळ आवर्जून या कार्यक्रमासाठी बोलाविले, त्यामुळे देशभक्ती ने भरलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहता आले त्याबद्दल तिचे मनःपूर्वक आभार.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800