Saturday, June 14, 2025
Homeसाहित्य!! समिधा !!

!! समिधा !!

थोर समाजसेविका साधनाताई आमटे यांचे ‘समिधा’ हे आत्मचरित्र वाचून सुचलेली कविता….

साधनाताई आमटेंच्या
‘समिधा’ आत्मचरित्राची
कथा अपूर्व आनंदवन
दीनदु:खितांच्या वेदनेची ||

ताई बाबा मिळून जपती
मनी सप्तपदीच्या वचना
निवारा निबिड अरण्यात
सोबती रुग्णांच्या वेदना ||

खुरटलेल्या तनामना
घातली मायेची फुंकर
वठलेल्या देहावरती
फुटले आशेचे अंकुर ||

या सेवा यज्ञातील श्रेष्ठ
ज्वलंत समिधा बनती
या अमूल्य तपश्चर्येतील
पुण्यश्लोक ‘साधना’ असती ||

करूणामयी प्रेमळ अशा
मुरलीधराची साक्षात धून
घनदाट अरण्यात पसरे
आश्वासक कोवळे ऊन ||

त्याग प्रेम सेवेची ताई
मातृदेवता सजीव मूर्ती
त्यांच्या प्रेरक कार्यातूनी
घडो संवेदना जागृती ||

समाजऋण फेडणे धर्म
तन मन धन देऊनी
तीन पिढ्यांनी गिरविले
ध्येय हेच आनंदवनी ||

ज्योत्स्ना तानवडे

— रचना : ज्योत्स्ना तानवडे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments