Monday, September 15, 2025
Homeकलासमृद्ध जयंत सावरकर

समृद्ध जयंत सावरकर

संगीत नाटके ते वेब सिरीज असा समृद्ध अभिनय प्रवास करणारे, बॅकस्टेज आर्टिस्ट ते मराठी नाट्य संमेलनाध्यक्ष अशी यशस्वी कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी आपल्या अभिनयाने तीन पिढ्यांच्या रसिकांना रिझवले. ८५ वर्षाच्या वाढदिवसानंतर आजही कलाकार म्हणून त्यांचे काम सुरूच आहे.

वेबसीरिज मधून शूटिंग करून घरी परतलेल्या अण्णांना (सावरकरांना) मी रविवारी भेटले. निर्मला वहिनींनी माझे स्वागत केले. अण्णा भेटले ते नेहमीसारखेच हसतमुख. हालचाल वयोमानाने थोडी मंदावलेली पण स्मरणशक्ती मात्र तीच! प्रत्येक नाव, आडनांव, तारखा यांसह प्रसंग सांगत होते. तब्बल दोन तास आमची मुलाखत सुरू होती. पण थकलेले वाटले नाहीत.

मेघना साने मुलाखत घेताना

मी विचारले, “अण्णा तुमच्या ह्या एनर्जी आणि स्मरणशक्ती चे रहस्य काय ?” तेव्हा ते म्हणाले, “मी रोज तीन साडेतीन किलोमीटर चालतो. आणि चालताना मनात श्लोक, स्तोत्र वगैरे म्हणत असतो. स्तोत्रपठणाने आपली स्मरणशक्ती चांगली राहते.”

लहानपणी ज्या गावात शिक्षण घेतले त्या गावातल्या अनेक आठवणी अण्णांनी सांगितल्या. गावाने त्यांना जे संस्कार दिले, ज्याप्रकारे घडवले, ते शिक्षण त्यांना कलाकार म्हणून उभे राहण्यासाठी फार उपयोगी पडले. यासाठी गुहागरमधील गुरुजनांचे ते ऋण व्यक्त करतात. आंबे तोडणे, झाडावर चढणे, मल्लखांब, रहाटेची माळ करणे अशा अनेक खेळांमधून, उपक्रमांतून मुलांमध्ये हिंमत आणि लवचिकपणा येत असे.

पुढे, मुंबईत शिक्षण घेऊन सावरकर स्टेनोग्राफर झाले. शॉर्टहँड टायपिंग मध्ये पहिले आले. स्पीड होता १८० चा ! त्यामुळे नोकर्‍या सतत सांगून येत असत. हौशी नाटकांमध्ये उमेदवारी सुरूच होती. त्यांच्या चाळीतील पुरुषोत्तम बाळ याने विजया जयवंत (मेहता) यांच्या संचात नेऊन सोडले.

तेथे खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध नाट्यशिक्षण सुरू झाले. छोट्या-मोठ्या भूमिका मिळू लागल्या. पण फारसा जम बसला नव्हता. पुढे दामू केंकरे या प्रसिद्ध दिग्दर्शकाकडे बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले. हे काम तसे जोखमीचे आणि वेळेत करायचे असते. त्यांच्या जीवावर मोठे नट बिनधास्त काम करत.
सेट बदलणे, सेटवरील वस्तू अंधारात बदलून योग्य जागी सरकवणे हे योग्य प्रकारे करण्याचे काम फार थोड्या लोकांना जमते. ही माणसे अंधारात काम करतात आणि अंधारातच रहातात. त्यांची नावेही कोणाला माहित होत नाहीत.

दामू केंकरे यांच्याकडे सावरकरांना उत्तम ट्रेनिंग मिळाले. दामू केंकरे नाटकाची तालीम घेत असताना सावरकरांना जवळ बसवून ठेवत आणि निरीक्षण करायला सांगत. असा नाटकाचा अभ्यास चालत असे.

जयंत सावरकर यांचा विवाह मामा पेंडसे या प्रसिद्ध अभिनेत्याच्या कन्येशी, निर्मला यांच्याशी झाला. लग्नाच्या दिवशी जयंतरावांच्या साहेबांनी लग्नासाठी रजा देण्याचे नाकारले म्हणून जयंतरावांनी सरळ नोकरी सोडली. पुन्हा दुसरी नोकरी मिळण्याची खात्री होतीच. नाटकाचे वेड मात्र लग्नानंतरही कायम राहिले. ‘सूर्यास्त’ या नाटकातील अण्णांची गायकवाडची भूमिका गाजली. निर्मलावहिनी देखील या भूमिकेवर खूष झाल्या. पुढे वेगवेगळ्या भूमिका करण्याचे आव्हान पेलायचे होते. अण्णांचे सासरे, मामा पेंडसे यांनी आपल्या नाट्यवेड्या जावयाला प्रसिद्ध दिग्दर्शक जोगळेकर यांच्याकडे ट्रेनिंगला पाठवले. सर्व रसांच्या भूमिका करणारा कलाकार म्हणून घडणे आवश्यक होते. त्याप्रमाणे अण्णांनी खूप मेहनत घेतली आणि स्वतःला गुरूच्या या शिक्षणाने घडवले.

गडकऱ्यांच्या ‘एकच प्याला’ नाटकातील तळीरामच्या भूमिकेने जयंतरावांना अवघ्या महाराष्ट्रातील रसिकांच्या हृदयात स्थान मिळाले. ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकात सुद्धा जयंत सावरकरांना खूप प्रसिद्धी मिळाली. यातील ‘अंतू बर्वा’ आणि ‘हरितात्या’ या दोन भूमिकांना प्रेक्षकांची भरपूर दाद मिळाली.

निर्माता सुधीर भट यांनी आपल्या सुयोग नाट्यसंस्थेच्या नाटकांचा दौरा १९९८ साली अमेरिकेला नेला. त्यात ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे नाटक देखील जाणार होते. जयंत सावरकर यांच्या ऐवजी दुसर्‍या कलाकाराला नेण्याचे घाटत होते. परंतु अमेरिकेतील मराठी आयोजकांच्या आग्रहास्तव अखेर अण्णांची वर्णी लागली. सुधीर भट त्यांना सन्मानाने घेऊन गेले. ऐनवेळी नाटकाच्या चार दिवस आधी डॉक्टर लागू यांना त्यांच्या प्रकृतीच्या तपासणीत काही दोष आढळल्याने फॅमिली डॉक्टरने अमेरिकेच्या दौऱ्यावर जायची परवानगी दिली नाही. मग ‘सुंदर मी होणार’ मधील डॉ. पटवर्धन ही प्रमुख भूमिका कोण करेल हा प्रश्न उभा राहिला.

सावरकर तसे एकपाठी म्हणून प्रसिद्ध आहेत. आजपर्यंत अनेक नाटकातील अनेक नटांच्या भूमिका त्यांनी ऐन वेळेवर केल्या आहेत. त्यामुळे डॉक्टर लागू यांची भूमिका ते करतील असा विश्वास सर्वांना वाटला आणि खरोखरीच अमेरिकेला गेल्यावर या प्रयोगात डॉक्टर लागूंच्या ऐवजी जयंतरावांनी ती भूमिका छान वठवली आणि ती यशस्वी झाली.

जयंत सावरकर यांची रंगभूमी, छोटा पडदा, मोठा पडदा यातील कलाकार म्हणून कारकीर्दही साठ वर्षांहून अधिक काळ झाली आहे. त्यांनी बालनाट्य, हौशी तसेच व्यावसायिक नाटक, सामाजिक आशयाची, विनोदी नाटके तसेच अनेक संगीत नाटकातही भूमिका केल्या आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविले. सह्याद्री वाहिनीनेही ‘नवरत्न’ पुरस्कार देऊन गौरविले. उस्मानाबाद येथे झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले.

गायकाला गाण्याचा रियाज घरी करता येतो पण नटाला भूमिका मिळाल्या शिवाय त्याचा अभिनय कसा करता येईल ? सावरकर म्हणतात, “मी गिरगावात साहित्य संघाच्या जवळ रहात असल्याने नाटके पहाण्याचा उपक्रम सुरू ठेवला. केवळ मनोरंजनासाठी नव्हे तर एकच नाटक अनेकदा पाहून त्याचा अभ्यास करण्यासाठी. मला अनेक संहिता केवळ प्रयोग पाहून पाठ झाल्या. त्यातील हालचाली, बारकावे मी डोळ्याने पाहत होतो. हाच होता माझा अभिनयाचा रियाज.”

१५० हून अधिक नाटकात सहभाग आणि शंभरहून अधिक चित्रपटात भूमिका केलेल्या सावरकरांना नव्या पिढीशी जुळवून घेता आले हे विशेष. नव्या आणि वयाने लहान असलेल्या दिग्दर्शकांसोबत मराठी-हिंदी मालिकेत काम करताना ते आपल्याला दिसतात.

‘सिंघम’ या हिंदी चित्रपटातील भूमिकेने त्यांना भारतभरातील रसिकांपर्यंत पोहोचवले. ‘समांतर’ या वेब सिरीज मधील भूमिकाही कायम लक्षात राहील अशी झाली.

जयंत सावरकर यांची कन्या सुषमा सावरकर आणि सुपुत्र कौस्तुभ दोघेही या क्षेत्रात आपल्या वेगळ्या गुणांनी गाजत आहेत. सुषमा डबिंग क्वीन म्हणून प्रसिद्ध आहे तर कौस्तुभ लेखक झाला आहे. ‘एवढंसं आभाळ’, ‘लोकमान्य, एक युगपुरुष’ सारख्या चित्रपटांचे लेखन त्यांनी केले व पुढे काही नवनवीन नाटके लिहीत आहे.

सावरकरांचे नाव रसिकांच्या हृदयात एक मोठे कलावंत म्हणून असलं तरी ते स्वतःला एक छोटा माणूस म्हणवतात. आपल्या रंगभूमीशी निगडित आठवणींचं एक पुस्तक त्यांनी ‘मी एक छोटा माणूस’ या शीर्षकाखाली लिहिले आहे. उद्वेली बुक्स चे विवेक मेहेत्रे यांनी ते प्रकाशित केले. एकेक प्रसंग खरोखर वाचण्यासारखा आहे. हे पुस्तक एका अर्थाने मराठी रंगभूमीचा इतिहासही आहे. पण जयंतरावांच्या मार्मिक शैलीमुळे मनोरंजकही झाले आहे. रसिकांनी हे पुस्तक जरूर वाचावे.

मुलाखतीच्या शेवटी त्यांना मी शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा भेटण्याचे ठरवून निरोप घेतला.

मेघना साने

– लेखन : मेघना साने
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. ” समृद्ध जयंत सावरकर ” हे मेघना साने यांनी केलेले लेखन आणि सन्माननीय देवेंद्र भुजबळ साहेबांच्या कल्पक संपादनातून चित्रीत झालेले एक यशस्वी विविधांगी कलाकार म्हणून” जयंतराव सावरकर” या़ंची ओळख झाली. पडद्यामागील कलाकार ते नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष या विविध पातळ्यांवर विविध भूमिका साकारत जयंतरावजींची वयाची ८५ उलटून गेली. त्यामुळे मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक भूमिका साकारल्या आहेत. अशा विविधांगी कलाकारास आमचा मानाचा मुजरा !!

    राजाराम जाधव
    सहसचिव सेवानिवृत्त
    महाराष्ट्र शासन

    • धन्यवाद सर! आपले चार कौतुकाचे शब्द नक्कीच लेखनासाठी प्रोत्साहन देतील.
      जयंत सावरकर सरांशी केलेल्या संवादाची मी एक व्हिडिओ क्लिप देखील बनवली आहे.लवकरच प्रकाशित होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा