ज्येष्ठ कार्यकर्ते व लेखक सयाजीराव वाघमारे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा अभिष्टचिंतन सोहोळा मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरात नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते व आरपीआय सेक्युलरचे संस्थापक श्मामदादा गायकवाड होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज बाबासाहेब राजे भोसले, माजी पोलीस अधिकारी विश्वास कश्यप, काकासाहेब खंबाळकर, विक्रीकर विभागाचे निवृत्त उपायुक्त व सयाजीराव वाघमारे अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष रमेश चक्रे, रवी गरूड आदीं प्रमुख पाहुणे म्हणून तर दलित पँथरचे सुखदेव सोनोने विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी वाघामारे यांच्या गेल्या ४०-४५ वर्षातील सामाजिक कार्याचा मान्यवरांनी आढावा घेतला.
श्री बाबासाहेब राजे भोसले म्हणाले की, समाजाला अजूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजलेले नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. समाजावर आजही अंधश्रद्धा आणि बुवाबाजीचा मोठा पगडा आहे. समाजाला घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगण्याची जबाबदारी आपण पार पाडू, असे त्यांनी जाहीर केले.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना श्री सयाजीराव वाघमारे म्हणाले की, मी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली असली तरी ‘बाद’ झालो, असे समजू नका. यापुढेही समाजासाठी जे जे करता येईल, ते ते करीत राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सयाजीराव वाघमारे गौरव पुस्तिकेचे प्रकाशन झाले. तसेच श्री वाघमारे यांचा गौरव करून त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.
सुरुवातीला ‘मी प्रथमत: भारतीय व अंतिमत: भारतीय’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश देणारे सयाजीराव वाघमारे लिखित पथनाट्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहुल सोनावणे व विशाखा त्रिभुवन यांनी केले. तर आभारप्रदर्शन सोनावणे यांनी केले.
कार्यक्रमास अमृत महोत्सव समितीचे उपाध्यक्ष हेमंत मोकल, कार्याध्यक्ष विलास पवार, खजिनदार अशोक नागकिर्ती, सरचिटणीस एन. डी. कांबळे, वाघमारे यांचे स्नेही, नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800