मनोहर जोशी सर काल पहाटे गेले आणि अनेक आठवणी मनात दाटून आल्या. सर मुख्यमंत्री असताना १९९५ साली, त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे नागपूर अधिवेशन पूर्ण चार आठवडे चालवून दाखविले. त्याच अधिवेशना दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा त्यांच्या हिंदुत्वा विषयीचा निकाल सरांच्या बाजूने लागल्याची बातमी आली. त्यावेळी आम्ही त्यांच्या दालनात एका बैठकीसाठी उपस्थित होतो. संध्याकाळी पाच ची वेळ होती. सरांनी ताबडतोब पेढे मागवून, कार्यालयातील सर्वाँना वाटून आपला आनंद व्यक्त केला.
माहिती खात्यात येण्यापूर्वी मी दूरदर्शन मध्ये होतो. इतर खाजगी वाहिन्या सुरू होऊ लागल्या होत्या. या वाहिन्यांचे महत्व लक्षात घेऊन माहिती खात्याची स्वतःची अशी दृकश्राव्य शाखा असावी, असा अहवाल मी स्वतःहूनच सादर केला. तत्पूर्वी माहिती खात्याची चित्रपट शाखा होती. पण ती बदलत्या परिस्थितीत सुसंगत ठरत नव्हती.
माहिती संचालक श्री सुधाकर तोरणे साहेब, महासंचालक कॅप्टन अशोक देशपांडे साहेब, माहिती सचिव अजित वर्ती साहेब यांनी तो अहवाल गंभीरपणे घेतला. सरांशी चर्चा करून १ ऑगस्ट १९९७ रोजी दृकश्राव्य सुरू करण्यात आली. या शाखेचा पहिला प्रमुख मीच ठरलो.
सर्व वाहिन्यांशी शासनाच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी समन्वय ठेवणे हे मुख्य काम होते. पुढे या शाखेमार्फत “शिवशाही आपल्या दारी” या २४ भागांची मालिका दूरदर्शन वरून दर आठवड्याला प्रसिध्द होऊ लागली.प्रत्येक खात्याच्या मंत्री महोदयांना बोलावून महाराष्ट्र भरातून निमंत्रित केलेल्या प्रेक्षकांनी मंत्र्यांना थेट प्रश्न विचारणे, असा लोक सहभाग असलेली ही मालिका होती. रवींद्र नाट्य मंदिरात बनविलेल्या स्टुडिओत चित्रीकरण होत असे. पुरुषोत्तम बेर्डे त्यांच्या चमू सह प्रत्यक्ष चित्रीकरण, संकलन करीत. शेवटचा २५ वा भाग मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना घेऊन करायचा होता.पण शेवट पर्यंत दोघांच्या वेळा जमून न आल्याने हा भाग प्रसारित होऊ शकला नाही.
युती सरकारच्या वचन नाम्यात “माय मराठी वाहिनी” सुरू करण्यात येईल, असे एक वचन होते. पण केंद्र सरकारच्या धोरणात ते बसत नसल्याने परवानगी काही मिळत नव्हती. एकदा, १७ एप्रिल १९९८ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे मुंबई दौऱ्यावर असताना, राजभवन शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे, तत्कालीन राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर, मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन, केंद्र सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्याच्या सचिवांशी फोन वर चर्चा होऊन “माय मराठी वाहिनी” तील वाहिनी शब्द काढावा आणि वाहिनी ऐवजीं अर्धा तासाचा दैनंदिन कार्यक्रम मुंबई दूरदर्शन वर संध्याकाळी साडे सहा ते सात या वेळेत प्रसारित करावा असा निर्णय झाला. ही घोषणा करताना दाखविण्यासाठी काही असावे म्हणून आम्ही एका बीटा कॅसेट वर आमच्या प्रदर्शन शाखेकडून माय मराठी अशी अक्षरे छान पैकी रंगवून घेतली आणि ती कॅसेट पंतप्रधानांच्या हाती देऊन सर्व मान्यवरांसोबत फोटो काढून घेतला.
१ मे १९९८ पासून माय मराठी कार्यक्रम प्रसारित करण्याची घोषणा तर झाली पण माहिती खात्याची तयारी काहीच नव्हती. हाती फक्त १३ दिवस होते. म्हणून वर्टी साहेबांनी एन एफ डी सी चे तत्कालीन प्रमुख, मूळ चे आय पी एस अधिकारी असलेले रवी गुप्ता यांना प्रमुख म्हणून काम करण्यास राजी केले. नाटककार वसू भगत, एक खाजगी एडिटर रवी, त्याचा सहायक, आमचे नियमित कॅमेरामन, संकलक अशी सर्व टीम मिळून कामाला लागलो आणि ठरल्या प्रमाणे १ मे पासून माय मराठी कार्यक्रम प्रसारित होऊ लागला. या आधी रोजच्या कार्यक्रमांचे कव्हरेज करणे आणि कॅसेट दूरदर्शन वर पाठविणे इतकेच मर्यादित काम होते. पण रोज कार्यक्रम तयार करून तो दूरदर्शन कडे प्रसारण करण्यासाठी दूरदर्शन कडे पाठविणे, त्यांनी काही हरकती घेतल्यास त्या दुरुस्त करणे हे अत्यंत जिकिरीचे ठरत असे.
पुढे माझी माहिती उपसंचालक म्हणून २६ जून १९९८ रोजी पदोन्नती होऊन कोकण भवन येथे नेमणूक झाली. काही काळ माझी मंत्रालय, कोकण भवन, फिल्म सिटी अशी त्रिदंडी यात्रा झाली. दरम्यान सचिव, महासंचालक यांच्या बदल्या झाल्या. रवी गुप्ता ही गेले आणि त्यांचे काम विनय आपटे पाहू लागले. शेवटी दैनंदिन कार्यक्रम निर्मिती, प्रसारण ही जबाबदारी माहिती खात्याची नसून फिल्म सिटी ची आहे, या वर शिक्का मोर्तब होऊन त्यांच्याकडे हे काम गेले. पण काही कारणांनी माय मराठी कार्यक्रम बंदच झाला.
जोशी सर आपल्या कार्यक्रमांच्या प्रसिध्दी बाबत फार जागरुक असत. तरी त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. एखाद्या महत्वाच्या कार्यक्रमाची, बैठकीची बातमी दूरदर्शन वर, दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये न दिसल्यास ते दुसऱ्या दिवशी सर्वांना धारेवर धरत. त्यामुळे सर्व जण अतिशय दक्षतेने काम करीत असत.
सर्व जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक यांना सुद्धा अतिशय तत्परतेने काम करावे लागे. त्यांच्या दौऱ्यांचा झपाटा विलक्षण असे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांचे कव्हरेज करताना सर्वांची दमछाक होत असे. अशा त्यांच्या कार्य कर्तृत्वाने त्यांनी अमीट छाप उमटवली.
शिस्तशीर, वक्तशीर आणि कडक असलेले सर, सहृदयी आणि मनकवडे सुध्दा होते. एकदा आम्ही सरांच्या एका संदेशाचे चित्रीकरण करण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेलो होतो. त्याकाळी काही दिन विशेष असले की मुख्यमंत्र्यांच्या संदेशाचे प्रसारण दूरदर्शन वरून होत असे. चित्रीकरण मात्र माहिती खात्याला करून पाठवावे लागे.
आम्ही चित्रीकरण सुरू करणार तितक्यात सुपरस्टार अमिताभ बच्चन सरांना भेटण्यासाठी आल्याचा निरोप आला. त्यामुळे आम्ही चित्रीकरण थांबवून बाजूला उभे राहिलो. अमिताभ बच्चन यांनी त्यांची कन्या श्वेता हिच्या विवाहाची पत्रिका सरांना दिली. चहापान झाले. मनातल्या मनात मी म्हणालो, आपल्या नशिबात अमिताभ बच्चन दुरूनच पाहणे आहे. तितक्यात अमिताभ बच्चन निघताच सरांनी त्यांना थांबवून त्या दोघांसोबत उपस्थित अधिकाऱ्यांचाही अगत्याने फोटो काढून घेतला.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर अमिताभ बच्चन सोबत फोटो, ही एक कायमची आठवण झाली. सरांना विनम्र अभिवादन.
— लेखन : देवेंद्र भुजबळ. निवृत्त माहिती संचालक.☎️ 9869484800
जुन्या आठवणी खूप छान लेख
जोशी सरांच्या आठवणींना सुरेख उजाळा दिला.