जोतिबाची साथ नसती तर .. ? सावित्री एवढे पुरोगामी धोरण स्वीकारू शकली असती का ..?
मग आज ही असे अनेक जोतिबा का महिलांच्या स्वातंत्र्यासाठी पुढे येत नाहीत ? का घराघरातून स्रियांच्या स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे ?
लेखिका, कवयत्री प्रा सुमती पवार यांचा हा विचार प्रवर्तक लेख….
अहो, मी जरा मैत्रिणीकडे जाऊ का ? सौ. विचारते…..
कां ? काय काम आहे ? नवरोबाचा प्रश्न.
त्यांना जायचे असेल तेव्हा मात्र…”मी बाहेर जातो आहे,
उशिरा येईन“! कि निघाले पायात चपला सरकवून. कुठे
जाताय् विचारायची तर प्राज्ञाच नाही. चुकून कोणी एखादीने विचारलेच तर .. “तुला काय करायचेय् ?” कशाला नाक खुपसते ?”
अतिशयोक्ती नाही पण हे संवाद घराघरातून घडत नाहीत असे आपण छातीठोकपणे म्हणू शकत नाही हे कुणी ही मान्य करेल. पुरूषांना परवानगी लागत नाही, सांगावेसे ही वाटत नाही, असा मुक्त परवाना. पण बायकोने मात्र दाराबाहेर पाऊल टाकू नये व टाकल्यास विचारावे ? असे का ?
नवरा बायकोचे नाते हे पूर्ण विश्वासावर आधारलेले हवे, इथे तर पावलोपावली अविश्वास दाखवला जातो. तरी उभे आयुष्य अशा जोडीदाराबरोबर काढायचे ? ही कुठली समाज व्यवस्था आहे ? आणि ती आपण का स्वीकारली आहे ? समज आल्यापासून हे प्रश्न मला भेडसावतात. पण कधीच उत्तरे मिळाली नाहीत व मिळणार नाहीत. सारे अशा वेळी मुग गिळून बसतात.
जी मुलगी आईवडिलांना सोडून परघरी येते , अनोळखी माणसांना स्वीकारते , आपल्या नसलेल्या माणसांना नाईलाजाने का होईना, समाज व्यवस्थेचा एक भाग म्हणून आपले मानते,
त्यांची उठबस करते, हळूहळू त्यांच्यातच मुरून जाते , तरी तिच्यावर विश्वास नाही व तिला स्वातंत्र्य नाही ? कां इतकी बंधने ? का तिच्यावर सक्ती ? सर्वस्व अर्पण करून ही ती इतकी परस्वाधीन का ? माझं तर डोकंच चालत नाही ! स्रियांनी तरी ही बंधने न लाथाडता का धरून ठेवली आहेत ? जी कोणी या बंधनांच्या बाहेर जायचा प्रयत्न करेल , पुरूष तर पुरूष पण स्रियाच त्यांच्या अधिक शत्रू बनतात व हे जोखड अधिक
घट्ट करण्याचा प्रयत्न करतात.
या सर्व गोष्टींना पुरूष व स्रिया सारखेच जबाबदार आहेत. जी कोणी थोडी आधुनिक विचारसरणीने वागते, पुढारलेली दिसते, थोडी बोल्ड वाटते , लगेच नजरा तिरक्या होऊन कुजबुज सुरू होते ? बदनामी सुरू होते. का ? तिच्या चारित्र्याचा ठेका इतरांनी घेतला आहे का ? तिला तिच्या चारित्र्याची काळजी नाही ? बायकाच ह्या बाबतीत अधिक पुढाकार घेऊन चर्चा करतात व पुरूष मजा पाहत गालात हसतात, वा ! किती मजा येते आहे ? कसली मानसिकता आहे
आपणा सर्वांची ही ? का कोणी लक्ष घालून या गोष्टी आटोक्यात न आणता, वर्षानुवर्षे हे चालू आहे ?
अधिक स्पष्ट बोलायचे तर , पुरूषांना घरात बाहेर सर्वत्रच सर्र् रास , सर्वच गोष्टींचा मुक्त परवाना आहे. ते कायम काहीही करून स्वच्छ व शुद्धच असतात. बायको मात्र मित्राशी बोलतांना दिसली तरी संशयाचे भूत घुसलेच म्हणून समजा !
कनिष्ठ वर्गात हे प्रमाण फार जास्त आहे. बिचाऱ्या ह्या
बायकाच नेटाने संसार ओढत असतात पण काडीचे ही सुख त्यांच्या नशिबी नसते. मारहाण तर रोजच ठरलेली आहे. तरीही अशा नवऱ्याला बायका खाऊपिऊ घालतात, सांभाळतात. कारण तो घरात नसेल तर मग कावळ्यांना मोकळे रान वाटते, म्हणून त्याला सांभाळायचा !
उंबऱ्याबाहेर तर स्री अजिबात सुरक्षित नाही ? का ? बाहेर टपलेले हे डोमकावळे कोण असतात ? माणसेच ना ? का आपण त्याचा बिमोड करत नाही ? तो कोण करेल ? बाहेरून परदेशातून मदत येणार आहे का ? का ह्या बाबतीत आपण इतके निष्क्रिय आहोत ?
प्रश्न ,प्रश्न आणि प्रश्न ? शतके उलटली , उलटत आहेत पण बायकांचा इतिहास काही बदलत नाही . ना राम आहे , ना कृष्ण आहे , ना तिला कुणी वाली आहे.. तरी ह्या मुक्या गाई गोठ्यात मुकाट चारा खात समाज सृजनाचे काम बिनबोभाट करत आहेत ..
वा .. रे .. समाज व समाज व्यवस्था..!!
ह्या बेडी विषयी तीव्र संताप मनात धुमसत असतांना बायका तो गिळत वर्षानुवर्ष जगत आहेत. काही काही भटक्या समाजात तर एवढे अज्ञान व इतक्या विचित्र प्रथा आहेत की, मी त्यांचा इथे उल्लेख सुद्धा करू शकत नाही. इतक्या त्या लाजिरवाण्या आहेत . तरी स्रिया त्या सहन करतात कारण कुणालाच समाजाबाहेर राहून जगता येत नाही. ही फार मोठी व्यथा आहे व प्रचंड मोठी शोकांतिका आहे. हो, शोकांतिकाच ! समाज काय म्हणेल ? हे समाजाचं भूत इतकं मोठं आहे की, बायकांना त्याने एका मजबूत खुंट्याला बांधून ठेवले आहे, की ज्यातून त्यांची सुटका होईल की नाही या विषयी मी साशंक आहे.
ही बंधनाची बेडी कधी सुटेल ? की सुटणारच नाही ? की पुरूषांच्या सोयी साठी आम्ही ती सुटूच देणार नाही ? मला तर खात्रीच आहे , ही बेडी समाज कधीच सुटू देणार नाही. कारण त्यांचा त्यातच फायदा आहे, हुकूमशाही गाजवण्याची संधी आहे .. ती ते कशी सोडणार ..?
इथे एक गोष्ट आवर्जुन नमूद करते की, अपवाद सर्वच क्षेत्रात असतात. मी प्रतिनिधीत्व करते ते ९० ॰/॰ स्रियांचे. दहा टक्के स्रियाही कशा प्रकारच्या असतात हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही. परवा इअर एंडिंगचा एक व्हिडिओ पाहिला. स्रित्वाला लाज यावी अशा एका हॅाटेल मधील त्या निर्लज्ज बायकांचा वावर पाहून मला माझीच लाज वाटली.
मला फक्त एवढेच नमूद करावेसे वाटते की, जोतिबाची साथ नसती तर ? सावित्री एवढे पुरोगामी धोरण स्वीकारू शकली असती का ..?
मग आज ही असे अनेक जोतिबा का महिलांच्या स्वातंत्र्यासाठी पुढे येत नाहीत ? का घराघरातून स्रियांच्या स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे ? की आम्हाला हेच हवे आहे म्हणून आम्ही बघ्याची भूमिका घेतली आहे ?
हे सारे प्रश्न असेच अनुत्तरीत रहाणार आहेत का ?आणि हो , नेहमी प्रमाणे ही फक्त माझी मते आहेत. पण तुम्हाला काय वाटते ?
हे सर्व बदलण्यासाठी काय करावे लागेल ? कसे करावे लागेल ? काही सुचत असेल तर अवश्य कळवा !

– लेखन : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
सुमतीताई पवार यांचा ‘ सर्व जोतिबा कधी होतील?’ हा लेख जोतिराव विचारांच्या कृतीची आज किती नितांत गरज आहे हे सांगणारा आहे.सुमतीताई या प्रतिथयश कवयित्री आहेतच त्यांची लेखक म्हणूनही ही मांडणी प्रभावी आहे.