Wednesday, July 2, 2025
Homeलेखसर एम.विश्वेश्वरय्या

सर एम.विश्वेश्वरय्या

अभियांत्रिकी क्षेत्रातील मैलाचा दगड ठरलेले जगविख्यात अभियंता सर एम.विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्म दिवस देशात “अभियंता दिन” म्हणून साजरा केला जातो.या निमित्ताने हा विशेष लेख…

सर विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटक राज्यातील मुद्देनहाल्ली या गावात झाला, अन् जणू भारताच्या अभियांत्रिकी क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा एक तेजस्वी अभियंता उदयास आला.

“मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” या उक्तीनुसार ते शालेय जीवनापासूनच बुद्धिमान होते. त्यांचं उच्च शिक्षण पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झाले. इंजिनियरिंगची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केल्याने, त्यांची गुणवत्तेच्या आधारावर तत्कालीन मुंबई सरकारने कुठलीही परीक्षा न घेता, थेट त्यांची नेमणूक
सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंतापदी केली. हेच त्यांच्या बुद्धिमत्तेचं गमक होय.

पारतंत्र्याच्या काळात १९११ ते १९१५ पर्यंत ते म्हैसूरचे दिवाण होते. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात डी.लिट. तथा अन्य पदव्या संपादन केल्या. त्यानंतर त्यांच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावतच गेला.

विश्वेश्वरय्या यांनी १८९५ ते १९०५ या दशकात देशातील महत्वाच्या प्रकल्पांच्या उभारणीत मोलाचे योगदान दिलं. त्यात मध्य प्रदेशातील टिग्रा प्रोजेक्ट, कर्नाटकचा क्रिष्णा राजा सागर, हैद्राबाद येथील पूरसंरक्षक योजना, मुंबईची ब्लॉक सिस्टीम ऑफ एरिगेशन आणि बिहार व ओरिसातील अनुक्रमे रेल्वे ब्रीज आणि वॉटर सप्लाय स्कीम हे प्रमुख प्रकल्प विश्वेश्वरय्या यांच्या जागतिक किर्तीचे मानबिंदू ठरले. इतकेच नव्हे तर, म्हैसूरचा केआरएस हा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा ब्रीज गणला गेला. यामुळेच त्यांचे नाव देशासह जगात आजही मोठ्या दिमाखात घेतले जाते.

इंजिनियरिंग, कृषी, उद्योग, जलसिंचन, शिक्षण या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना भारत सरकारने १९९५ मध्ये “भारतरत्न” हा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करून सन्मानित केलं.

विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करून हिंदुस्थानचे नाव साऱ्या विश्वात उंचावले, याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान आहे.

या पार्श्वभूमीवर बांधकाम, ऊर्जा, जलसिंचन, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंतांनी विश्वेश्वरय्या यांचा आदर्श घेवून पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या भारत पुनर्निर्माण मोहिमेत आपले भरीव योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येते.

खरं तर, प्रत्येक क्षेत्रात काहीच अधिकारी-कर्मचारी गैरप्रकार करत असतात, पण त्यामुळे सारं सरकार बदनाम होतं असतं. याला आळा घालणं काळाची गरज आहे. कारण केवळ पैश्यांच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाचे प्रकल्प, रस्ते उभारले जातात अन् त्यामुळे अपघात होऊन निरपराध लोकांना नाहक आपले प्राण गमवावे लागतात.

आपल्या देशात काही ठिकाणी पूल तुटण्याच्या, इमारती ढासळण्याच्या तर, कधी धरणं फुटण्याच्या आणि रस्ते धसण्याच्या घटना घडत असतात, हे खेदजनक आहे. अशा निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे दुर्घटना घडून जीवित हानीसह राष्ट्रीय संपत्तीचेदेखील नुकसान होत असते.

आजच्या घडीला अनेक ठिकाणी ग्रामीण भागासह शहरी भागातील रस्त्यांची ऐन पावसाळ्यात अक्षरशः चाळण झाल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ते ! हा पेच जनमानसाच्या मनात निर्माण होतो. यासंदर्भात समस्त अभियंता वर्गाने आत्मचिंतन करून ह्या अप्रिय घटना पुन्हा उद्भवणार नाहीत, यासाठी पुरेपूर दक्षता घ्यावी.

अभियांत्रिकी क्षेत्रातलं सर एम. विश्वेश्वरय्या यांचे महान योगदान सदैव स्मरणात ठेवून शासकीय अन् खाजगी क्षेत्रातील अभियंत्यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात हीच खरी विश्वेश्वरय्या यांना मानवंदना ठरेल.

देशासह राज्यातील सरकारी व खाजगी आस्थापनांतील अभियंतांनी निव्वळ व्यावसायिक दृष्टिकोन न बाळगता, सामाजिक बांधिलकीतून समाजाचं देणं फेडण्याच्या दृष्टीने शहरी व ग्रामीण भागांतल्या नागरिकांसाठी रस्ते, पाणी, वीज, घरे या सारख्या मूलभूत सुविधा उत्तम दर्ज्याच्या द्याव्यात. अभियंत्यांनी आपले कर्तव्य सदसदविवेकबुद्धीने बजवावे  म्हणजे जगविख्यात अभियंता सर एम.विश्वेश्वरय्या यांच्या नावलौकिकला आणखी एक मानाचा शिरपेच खोवला जाईल.

अभियंता दिनानिमित्त अभियांत्रिकी क्षेत्रातील तमाम सदस्यांना हार्दिक शुभेच्छा. तुमच्या हातून अधिकाधिक प्रमाणात देश सेवा घडो अन् त्यातून देश बलवान होवो, म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्राचे नाव खऱ्या अर्थाने जनमानसात अजरामर होईल, हे निश्चित.

– लेखन : रणवीर राजपूत
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४