नवीन वर्षी, दर शुक्रवारी असणार आहे, नवे सदर… “सहज सुचलं म्हणून.” लिहिणार आहेत, दिल्ली स्थित लेखिका क्षमा प्रफुल.
क्षमा प्रफुल यांचे आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
चौक
South Delhi ची शांत दुपारची वेळ. काही समान आण्यला बाहेर पडले होते आणि आमच्या घरापासून तिसऱ्या चौकाजवळ गाडी थांबली होती.
ह्या चौकात सिग्नल खूप जास्त वेळ असतो. त्यामुळे डोंबाऱ्याची मुलं त्यातल्या त्यात गाड्यांच्या मधून वाट काढत येऊन जिथे थोडी जागा मिळेल तिथे कोलांट्या उड्या, दोरीवरच्या छोट्या छोट्या कसरती करताना दिसतात. आई किंवा मोठी बहीण रस्त्याच्या कडेला किंवा divider वर बसून ढोल वाजवत असतात. डोक्यावर टोपी त्याला लांब दोरी आणि त्याला एक पेंडूलम सारखं काही तरी अडकवलेले.आणि गरगरा मान डोकं फिरवत ती दोरी लयीत डोक्या भोवती फिरवतात .. आणि कुठे लागत पण नाही.
त्या लहान मुलांचे चेहरे मोठे गमतीशीर रंगवलेले असतात. बाकदार काळी मिशी ओठावर काढलेली असते आणि भुवई जाड केलेली असते. वेळेचं गणित असं काही जबरदस्त असतं की सिग्नल सुरू व्हायच्या आत ती चार पाच पोरं आजूबाजूने धावत गाड्यांना वेढा घालत पैशांची मागणी घालतात.
त्याच सिग्नल वर एखादा तरुण सुंदर collection असलेला इंग्लिश पुस्तकांचा गठ्ठा घेऊन आपल्याला लालच देत असतो. अगदी हॅरी पॉटर .. पावलो कॉएलो पुस्तकांचा संग्रह.. नागा .. एक से एक..आमचे ड्रायव्हर काका म्हणाले होते घेऊ नका ..आत कोरी निघतात पाने..पण नेहेमी ह्या चौकात विकायला येणारा हा तरुण असं कसं करेल? ..कधी तरी त्याला पकडलं जाईलच ना ? हा मला पडलेला प्रश्न. एक दिवस लेकीला एक पुस्तक विकत घ्यायचे होते. आणि बऱ्या पैकी स्वस्त दरात मिळत होते. लेक द्विधा मनस्थितीत. काय करावं …मी म्हटलं घेऊन टाक .बघू नंतर काय ते..पण छान निघालं पुस्तक.दिल्ली ठगोंकी हा समज बराच आतापर्यंत रुतला आहे त्यातून आलोय बाहेर बऱ्यापैकी .
तर असे नेहेमी विकायला येणारे earphone, USB असे काही विकणारे डोंबाऱ्याची पोरं ,पुस्तक विकणारा तरुण,भिकारी एकूणच काय ह्या चौकात खूपच वर्दळ असते.
हा एक गोष्ट आठवली ह्या चौकाची. विशेषता..ह्या चौकात अगदी किरकोळ शरीरयष्टी, पांढरी दाढी, स्वच्छ कपडे कुबड्या खाकेत असलेला एक मुसलमान म्हातारा भिक मागताना दिसतो. आमचे ड्राईव्हर काका आधी टॅक्सी लाईन मध्ये होते. त्यांना दिल्ली आणि दिल्ली जवळचा परिसर खडान खडा पाठ..अमिताभ की कोठी पासून, वीरेंद्र सेहवाग पर्यंत बऱ्याच जणांच्या कोठ्या दाखवून झाल्या. त्याच्या मागच्या कथा पण त्यांना माहिती. तर ह्या म्हाताऱ्या बद्दल सांगताना ते म्हणाले की हा म्हातारा खूप पूर्वीपासून ह्याच चौकात उभे राहून भीक मागतो आहे. आता त्याची मुलं मोठी झाली. स्वतःची घरे आहेत.मुलं चांगली स्थिरावली ..भीक मागू नका म्हणतात ..पण ज्या व्यवसायाने सगळं काही दिलं त्याच्या कडे कशी पाठ फिरवायची ? म्हणून अजून भीक मागतो तो म्हातारा..
त्याची त्याच्या व्यवसायाबद्दल ची निष्ठा पाहून कौतुक ही वाटलं..पण पायाला bandage कुबड्या खाकेत..भीक आता कोणी देत पण नसावं ..तेंव्हा वाटत खरंच ह्या सगळ्याची आता गरज आहे का ?
खरतर जेंव्हा त्याने भीक मागायला सुरुवात केली असेल तेंव्हा इतके मोठे रस्ते, इतका मोठा चौक, वरून जाणारा flyover, चौकात जमणारा ट्रॅफिक, इतकी वाहनांची वर्दळ हे कदाचित काहीच नसेल..पण त्याला भीक देणारा माणूस नक्कीच तेंव्हा असावा म्हणूनच त्या मिळणाऱ्या भिकेवर त्याने त्याच्या मुलांना पोसलं असेल.
आज परिस्थिती बदलली आहे पण “तो” अजूनही नाही बदलला.म्हणूनच मुलं नाही म्हणत असताना ज्या भिक मागण्यामुळे त्याचा संसार उभा राहिला कदाचित त्याला प्रामाणिक राहण्याचा त्याचा प्रयत्न असावा .
तुम्हाला काय वाटतं ?
– लेखन : क्षमा प्रफुल. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800