डिंकाचे लाडू !!!
“आई, ताईसाठी डिंकाचे लाडू करणार असशील ना ? थोडे जास्तच कर.” होणाऱ्या मामाची होणाऱ्या आजी जवळ जोरदार फरमाईश !
“अरे अजून वेळ आहे खूप. आता तर कुठे डोहाळ जेवणाची तयारी करायचीय. “डिंकाचे लाडू बाळंतपणानंतर करतात”
“हों का?”” मला वाटलं वर्षभर करतात” मामा हिरमसून म्हणाला.”पण तू विसरु नको बरं! लक्षात असू दे” ” तू विसरु देशील का मला?” माझी आई हसून म्हणाली.
हा संवाद माझ्या आईचा आणि भावाचा. बाळाची येण्याची चाहूल लागल्याचे कळताच, मामाची तिकडे लगबग सुरू झाली आणि माझ्याऐवजी डिंकाच्या लाडुचे डोहाळे ह्यालाच लागले.
आई डिंकाचे लाडू अप्रतिम करायची. मुळात सुगरण आणि कोणाला खाऊ घालायचे म्हटलं की तिच्या अंगात अन्नपूर्णा शिरायची. मुळात करण्याची अन करून खाऊ घालायची खुप आवड. त्यात वडिलांचा उत्साहाने सहभाग. मग काय विचारायचं !
आम्ही तेव्हाचे विदर्भवासी. उन्हाळा प्रचंड .थंडी जेमतेम आठ ते पंधरा दिवस असणार. तेंव्हा ग्लोबल वॉर्मिग ची warning मिळाली नव्हती ना!
ऋतुचक्र बऱ्यापैकी नियमात होतं . थंडी केंव्हा पडणार हे साधारण prediction हवामान खात्याने न सांगता ही बरच खरं ठरायचं!😊
त्यामुळे त्या कडाक्याच्या आठ ते पंधरा दिवसांच्या थंडीत सुद्धा थोडेसे डिंकाचे लाडू बनायचेच.
आणि आता तर गोड निमित्त होत. बाळाच्या आगमनाचं.
बाळंतपणानंतर पंधरा दिवसांनी आईने डिंकाचे लाडू केले. मोठ्या डब्बाभर (म्हणजे साधारण तीन किलो🫢)माझ्या बरोबर मामा पण आवडीने खायचा. मला म्हणायचा पण. ताई, ह्याला, तुझ्या बाळाला, पण शिकवीन मी लाडू खायला. कारण बाळाच्या बाबांना मुळात गोड आवडत नव्हत..आणि डिंक मेथीचा लाsssडू ????? सवाल ही नही उठता🤣
मी परत सासरी जायला निघाल्यावर आईने तीन डब्बे बरोबर दिले. डिंकाच्या लाडूचे.
एक मोठा माझ्यासाठी, एक सासूबाईना आणि त्यांना येणाऱ्या जाणाऱ्या ना द्यायलाही आवडायचा, म्हणून त्यांच्यासाठी एक डब्बा…आणि एक आजे सासूबाईंना. आईंच्या आईला ! specially मला आठवण ठेवून वेगळा डब्बा दिला. म्हणून तेव्हा पंचाहत्तरीतल्या त्यांना कोण आनंद झाला !
आता दिल्लीत आहोत .कडाक्याची थंडी काय असते ते चांगलेच अनुभवतोय आणि आता आईचा वारसा मी चालवते. दर थंडीच्या दिवसात, मोठ्या डब्बा भर डिंकाचे लाडु होतात. मुलं आणि सासू बाई आवडीने खातात. अन मैत्रिणीकडे पण पोहोचतात.
ह्या वर्षी थंडी थोडी उशिरा पडली. माझा पण लाडू बनवण्याचा मुहूर्त लागतच नव्हता. माझी मैत्रीण रश्मी चा फोन आलाच. सवयी प्रमाणे खळखळून हसत विचारलच “अग, अजून तुझे डिंकाचे लाडू अजून झाले नाही का? आम्ही वाट पाहतोय.” कारण recipe विचारण्यात अर्थ नाही, हे तिला माहिती आहे . कारण स्पष्टच सांगितले ना तिला, जोपर्यंत आपण बरोबर आहोत तोपर्यंत लाडू मीच पाठवणार.
“अग मुहूर्त निघत नव्हता, थांब आता सुरुवात करतेच”. मी तिला म्हटल.आणि अशा प्रकारे मुहूर्त साधून, ह्या वर्षीचे डिंकाचे लाडू मोठ्या डब्यात विराजमान झालेच. इती डिंकाचे लाडुची कहाणी सफल संपूर्ण.
जशी आमच्याकडे आवडीने होतात..तसे तुम्हांला मनापासून आवडत असतील तर तुमच्याकडे ही होवोत ही सदिच्छा !!😆

– लेखन : क्षमा प्रफुल. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800