आशीर्वाद
“अग क्षमा, एव्हढा मोठा कुकर, काढून टाक बरं. दुसरा नवीन घे” सासूबाईंनी ऑर्डर सोडली. “अहो आई ! तुम्हीच दिला आहे तो कुकर. माझी काही इच्छा नाही होत. तो काढण्याची. एव्हढा दडस आणि आजकाल कुठे, ही अशी क्वालिटी मिळते ? मला काढवासा नाही वाटत.”
अगं, जेंव्हा तो आपण घेतला, तेंव्हा येणारे जाणारे सतत असायचे आणि भरपूर असायचे. तुला त्रास व्हायचा म्हणून तो घेतला होता. आता इथे दिल्लीत, असे एकदम कोण यायला चाललंय ? आपण इनमिन सहा माणसं. तो नऊ लिटर चा कुकर. माळ्यावर ओझं.”
आई म्हणत होत्या ते खरंच होत. ९ लिटर चा कुकर. पण इथे आल्यापासून काढलाच गेला नव्हता .”
छोट्या कुकर मध्ये एकेक गोष्ट करायची. सकाळी मुलांच्या शाळा, नवऱ्याचं ऑफिस, बाबांची कित्ती वर्षांची ११ वाजता जेवायला बसायची सवय. नुसती तारांबळ असायची !
आई बाबा, मी आल्यावर पंधरा दिवसांनी दिल्लीत राहायला आले. सामान पूर्णपणे लावलं पण गेलं नव्हतं. त्यात आमच्या दोघींचा (माझी धावपळ पाहिल्यावर) आम्हा सासुसूनेचा संवाद.
१७ जून ला आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस. आईना विचारलं, काय घेऊ आई ?
आईनी क्षणाचाही विचार न करता पटकन पाच लिटर चा कुकर, म्हणून सांगितलं. मी तो घेईन माझ्या हिशोबाने. आता छानशी साडी घेऊ या. बाबांची तब्येत आताशा ठीक राहत नसल्यामुळे आईंच बाहेर जाणं जवळपास थांबलं होत. म्हणून त्यांना साडी घ्यायची नव्हती.
त्यांना माझा नको तितका काटकसरी स्वभाव माहीत असल्यामुळे त्याही अडून बसल्या. शेवटी तू तू मैं मैं नंतर कुकर घ्यावाच लागला.
खरं म्हणजे, बरीच वर्ष त्याने साथ दिली. एव्हढ्यात त्यात व्यवस्थित अन्न शिजत नव्हते. म्हणून दुरुस्त करायला दिल्यावर सुद्धा त्याचा प्रॉब्लेम solve झाला नव्हता. दोन वेळे ला टाकला. तो repair वाला विकून टाकण्यासाठी आग्रह धरत होता. मला तो अजिबात विकायचा नव्हता. आईंच्या भाषेत तो ‘माळ्यावर ओझं’ झालं तरी चालेल. पण माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत विकणार नाही. मग त्यात ढोकळा, केक बनवणे सुरू झाले. आमच्या मित्र मंडळींचा गेट टुगेदर पुलाव जीरा राईस….
एक दिवस लेक आणि सून म्हणाल्या, तेव्हढ्यासाठी हा कुकर कशाला ठेवायचा ? केक साठी आेटीजी पण आला होता. मी लक्षच दिला नाही.
एव्हढ्यात आम्हाला एक मार्केट आवडायला लागलं होत. तिथे गेलो. माझ्या नवऱ्याने तो कुकर तिकडे दाखव म्हणून सुचवलं.
मार्केट आम्हाला नवीन असलं तरी खूप वर्षापासून होतं. जुने दुरुस्ती करणारे होते.
आणि काही नाही योग्य gasket आणि volve फक्त बदलावा लागेल असं तो दुरुस्तीवाला म्हणाला. शेवटचा एक प्रयत्न म्हणून करून पाहायला ठरवलं आणि काय गंमत माझा कुकर पूर्ववत सुरू झाला. पूर्ण झाल्यावर त्याची शिट्टी वाजली आणि मला घबाड मिळाल्याचा आनंद झाला.
माझी बंगाली सून हसून म्हणाली “आई, आखिर आपने repair कराके लाया ही.”
मी तिला भावूक होऊन म्हणाले, “बेटा ये दादी का आशीर्वाद है. इसे ऐसे कैसे ना वेस्ट जाने दू ?”
तंदुरुस्त झालेल्या कुकरच्या शिटी ऐकायला येतायेत.. इतकं मस्त वाटतय म्हणून सांगू !
सासुबाईंना/आईना सांगायला हवं “आई माझा आवडता कुकर दुरुस्त झाला !

– लेखन : क्षमा प्रफुल. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800