राज्याचे सेवानिवृत्त मुख्य माहिती संचालक श्रीपाद सहस्त्रभोजने सर यांचा 97 वा वाढदिवस आज नागपुरातील प्रतापनगर येथील त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला.
यावेळी निवृत्त माहिती संचालक शरद चौधरी, सहकारी सर्वश्री अनिल गडेकर, अजाबराव खारोडे, विनायक तडसे, डोमा भुसारी, बोरकर आदींनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी सौ. वसुधा सहस्त्रभोजने ही उपस्थित होत्या.
अल्प परिचय
श्री. सहस्त्रभोजने यांनी तरुण भारतमध्ये पत्रकारितेला सुरुवात केली. त्या नंतर महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी खात्यात प्रसिद्धी अधिकारी म्हणून विविध पदांवर त्यांनी काम केले. मात्र आजही त्यांची ओळख ही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, अ. रा. अंतुले, शंकरराव चव्हाण यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणूनच आहे इतक्या यशस्वीपणे त्यांची ही कारकीर्द राहिली.
राज्याचे मुख्य माहिती संचालक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर गेल्या 35 वर्षांपासून ते नागपुरात स्थायिक झाले आहेत .
सहस्त्रभोजने सरांनी जनसंपर्काच्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी शासनाने त्यांची विशेष नियुक्ती केली होती. संपूर्ण मराठवाड्यात त्यांनी सकारात्मक भूमिका निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली .
राष्ट्रप्रेम
कट्टर राष्ट्राभिमानी असलेले सहस्त्रभोजने सर हे दरवर्षी सैनिक कल्याण निधीला एक लाख रुपयाचा निधी देतात. गेल्या वर्षी सुद्धा 7 डिसेंबरला त्यांनी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन एक लाख रुपये जमा केले. 25 वर्षांपासून कल्याण निधीला मदत करण्याचे त्यांचे हे कार्य अविरत सुरु आहे.
– टीम एन एस टी, 9869484800