नवी मुंबईतील प्रसिध्द, १२५० फ्लॅट, ६ सोसायट्या मिळून बनलेल्या मिलेनियम टॉवर्स, सानपाडा मध्ये पहिल्यांदाच ‘सहा सोसायट्या, एक गणपती’ म्हणजेच “एक मिलेनियम एक गणपती” ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
घरोघरी गणेशाचे आगमन होतेच, तसेच प्रत्येक सोसायटी चा सुध्दा एक गणपती असतोच. पण यंदाच्या गणेशोत्सवात ‘एक गाव एक गणपती’ या धर्तीवर ‘एक मिलेनियम एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे, असे येथील मिलेनियम टॉवर्स क्लब कमिटीचे मेंबर भास्कर अय्यर यांनी सांगितले. सर्वांनी एकत्र येत एकात्मतेची भावना वाढीस लागण्याच्या दृष्टीने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला होता. तोच विचार घेऊन आम्ही कार्यरत असून पहिल्यांदाच सानपाडा नवीमुंबई येथील एवढ्या मोठ्या मिलेनियम टॉवर्स मध्ये आम्ही ही संकल्पना राबवत असून हिच संकल्पना सगळ्यांनी राबवावी, असेही ते म्हणाले.
सहा सोसायट्या आणि सुमारे १२०० फ्लॅटमधून राहणारे जवळपास पावणेचार हजार रहिवासी एकत्रितरित्या गणेशोत्सव साजरा करणार आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोना या महाभयंकर रोगाची साथ सर्वत्र पसरली होती. त्यामुळे गणेशोत्सवच नव्हे तर, सर्व सण-उत्सव साजरे होवू शकले नाहीत. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे.
३१ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान कोरोनानंतर सर्वांनी एकत्र यावे, या मुळे विजेची, पैशाची बचत होईल आणि सांघिक भावना निर्माण होईल हे उद्दिष्ट आहे. म्हणून प्रत्येक सोसायटीत वेगळा गणेशोत्सव साजरा न करता सहा सोसायट्यांमिळून एकच गणपती महोत्सव साजरा करावा, असा मिलेनियम टॉवरमधील रहिवाशांनी निश्चय केल्यामुळे यंदा एकच गणपती मिलेनियम टॉवरमध्ये स्थापन केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बुधवार दि. ३१ ऑगस्ट रोजी गणेशाची प्रतिष्ठापना होऊन १२.३० वाजता स्थापना पूजा करण्यात येईल. रोज सायंकाळी आरती नंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दहा दिवसीय गणेशोत्सवादरम्यान स्वच्छतेचे महत्त्व या विषयी लहान मुलं एक छोटी नाटिका (स्किट) सादर करणार आहेत. तसेच कराओके, झुंबा, ड्रॉईंग, मल्लखांब, वन मिनिट क्वीझ, फॅशन शो, अंताक्षरी, डान्स, मॉम अँड सन, प्रिंसेस अँड डॅड, कथाकथन, मंगळागौर, फनफेअर असें वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत. तर ६ ऑगस्ट रोजी ‘डिजिटल एडिक्शन’, आपलं मिलेनियम कसं चांगलं राखता येईल, अशा विविध विषयावर वैचारीक चर्चासत्रही सादर करणार आहे. यात मिलेनियम टॉवरमधील तज्ञ सहभागी होणार आहेत. यामुळे मिलेनियम मधील सर्वांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे.

तसेच मिलेनियम टॉवरमधील रहिवाशांच्या घरी तयार होणारे वेगवेगळे पदार्थ ५६ पदार्थ एकत्रित करून (५६ भोग) त्याचा महाप्रसाद म्हणून, भजन झाल्यावर वाटप करण्यात येणार आहे. या वेळी गणपती समोर सर्व मिलेनियम मधील रहिवासी मिळून अथर्वशीर्ष चे २१ आवर्तने म्हणणार आहेत असल्याचेही अलका भुजबळ व डॉ. संजीवनी कुमार यांनी सांगितले.
मिलेनियम टॉवरमध्ये डॉक्टर्स, वकील, उद्योजक, अभियंते, व्यावसायिक, शासकीय अधिकारी, प्राध्यापक यांच्याबरोबरच चित्रपट क्षेत्रातील निर्माते वास्तव्यास आहेत. आसामी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील निर्माते व पद्मभूषण जानू बरूवा हेही येथेच वास्तव्यास आहेत.
दहा दिवस साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी ड्रेसकोड परिधान केलेल्या कलाकारांच्या सहभागाने लेझिम, ढोल, ताशाच्या गजरात मिरवणूक निघणार आहे. यात सोसायट्यांमधील सर्व भाविक सहभागी होणार आहेत. हा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी भास्कर अय्यर, श्रीकांत आणि माधुरी जोशी, श्री व सौ नंदूर्डीकर, सावंत, बालाजी, हिंगणे, श्रीमती अनिला मयांक, डॉ. संजीवनी कुमार, भारती रेड्डी, नितेश झा, आरती पवार यांच्यासह जवळपास ६० ते ७० स्वयंसेवक अतिशय उत्साहाने गणेशोत्सव उत्तम रित्या पार पडण्यासाठी मेहनत घेत आहेत.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
सर्वांचे आभार. एक गाव एक गणपती ही टिळकांच्या संकल्पने चं सगळ्यांनी अनुकरण करावे हिच इच्छा. तसेच संपूर्ण फॅमिली चा एकच गणपती असला तर सगळे या निमित्ताने एकमेकांना भेटतील.
खूपच छान असा उपक्रम, याने बंधुभाव व एकोपा वाढेलच तसेच प्रदूषण,आर्थिक अशा अनेकप्रकारची बचतही होणार आहे।प्रत्येक सोसायटी व गावी अशा प्रकारे उपक्रम राबविण्यात आले तर पोलीस व शासकीय यंत्रणे वरील येणारा ताण कमी होईल!!! गणपती बाप्पा मोरया। सगळयांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा।
🌹सुंदर संकल्पना 🌹
एक गाव एक गणपती,सुंदर संकल्पना साकार होत आहे. असेच चित्र सर्व ठिकाणी राबवले तर किती तरी गोष्टींची बचत होईल. एकोपा वाढेल.मानवशक्तीचे खरे उदाहरण, अनेक विचार एकमत अशी प्रथा उदयास येईल.
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
गणपती बाप्पा मोरया !
🌸🌸🌸🌸🌸
सौ.वर्षा भाबल.