Saturday, March 15, 2025
Homeलेख"सह्याद्री"चा सुवर्ण महोत्सव

“सह्याद्री”चा सुवर्ण महोत्सव

नमस्कार मंडळी,
मुंबई दूरदर्शन केंद्रास २ ऑक्टोबर २०२२ रोजी ५० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने २ कार्यक्रम झाले. त्यांचा थोडक्यात वृत्तान्त येथे देत आहे.

पहिला कार्यक्रम
१ ऑक्टोबर रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विद्यमाने संपन्न झाला. सुमारे ४० वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शन केंद्रात, मराठी ची गळचेपी होते, म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाने मोर्च्या काढला होता. त्या मोर्च्यात, नंतर मंत्री झालेले प्रमोद नवलकर, सुधीर जोशी आदी मंडळी सहभागी झाली होती. या वरूनच मुंबई मराठी पत्रकार संघास दूरदर्शन विषयी वाटणारी आत्मीयता दिसून येते. अनेक पत्रकार मुलाखती घेण्यासाठी व देण्यासाठी दूरदर्शन केंद्रात येत असतात. तसेच काही पत्रकार दूरदर्शन च्या वृत्त शाखेत अनुवादक म्हणून ही येत असतात.
पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष श्री नरेंद्र वाबळे हे तर युवदर्शन कार्यक्रमाचे एक नियमित मुलाखतकार राहिलेले आहेत. ते ऋणानुबंध त्यांनी अजून जपले आहेत, हे विशेष.

डॉ मेहेंदळे यांच्या २ पुस्तकांचे प्रकाशन

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत लाभले होते. त्यांनी आपल्या भाषणात, त्यांच्या शालेय जीवनापासून दूरदर्शन चा कसा प्रभाव पडत आलेला आहे, हे सांगून महाराष्ट्राच्या सर्वांगिण जडणघडणीत दूरदर्शनच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार
काढून दूरदर्शन केंद्राच्या विकासासाठी राज्य सरकारचे सर्वतोपरी सहाय्य राहील, अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमात डॉ विश्वास मेहेंदळे यांच्या २ पुस्तकांचे प्रकाशन झाले.तर सुप्रसिद्ध मुलाखतकार  गाडगीळ यांनी दूरदर्शन मधील काही मान्यवरांच्या प्रकट मुलाखती घेतल्या.

देवेंद्र भुजबळ यांचा सत्कार करताना, डॉ .डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी डी पाटील….

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले, ते म्हणजे दूरदर्शन मधील विविध मान्यवर व्यक्तींबरोबर एरवी नेहमी पडद्याआड राहून काम करणार्यांचाही स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आलेला सत्कार. जवळपास दोनशे तरी व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मुंबई दूरदर्शन चे पहिले वृत्त निर्माते डॉ गोविंद गुंठे दिल्ली येथून, पहिले वृत्त निवेदक डॉ विश्वास मेहेंदळे, आमची माती आमची माणसं चे निर्माते म्हणून प्रसिद्ध असलेले आणि नंतर केंद्र संचालक म्हणून निवृत्त झालेले श्री अशोक डुंबरे, तसेच निवृत्त निर्माती अनुजा देशपांडे, वृत्त निवेदक अजित देशपांडे, मुलाखतकार प्रा डॉ उज्ज्वला बर्वे आदी मंडळी, पुणे येथून तर निवृत्त निर्माते सर्वश्री अतुल भुसारी, राजू गायकवाड हे नागपूर येथून, तर निवृत्त निर्माते राम खाकाळ हे त्यांच्या दुर्गम भागातील खरवंडी गावातून आले होते. या वरून या मंडळींचे दूरदर्शन वर असलेले प्रेम दिसून येते.

जवळपास साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबानी जोशी यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मुंबई मराठी पत्रकार संघाचे मन:पूर्वक आभार.

हा संपूर्ण कार्यक्रम आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

“सुवर्ण सह्याद्री

दुसरा कार्यक्रम,
“सुवर्ण सह्याद्री” झाला तो खुद्द वरळी येथील मुंबई दूरदर्शन केंद्राच्या स्टुडिओ ए मध्ये. “स्नेह मिलन” असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. त्यामुळे अतिशय मनमोकळ्या, हृद वातावरणात या कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी, दूरदर्शन मधील दिवंगत सहकार्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर गायिका तथा निवृत्त दूरदर्शन अधिकारी डॉ शैलेश श्रीवास्तव यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने काही भजने व गीते सादर केली. निर्माते तसेच कलाकार श्री मलकराज पंचभाई यांनी त्यांना बहारदार साथ दिली. या भक्ती व संगीतमय कार्यक्रमाने सर्वांची दाद मिळविली.

दूरदर्शनच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच, २ ऑक्टोबर १९७२ रोजी शुभारंभाच्या कार्यक्रमात कशा गमती जमती झाल्या, हे आपल्या मिश्किल शैलीत डॉ याकूब सईद यांनी सांगून सर्वाँना चांगलेच हसविले. नव्वदीतही आपण तरुण असल्याचे त्यांनी दाखवून दिले. दूरदर्शनचे निवृत्त केंद्र प्रमुख डॉ मुकेश शर्मा यांनी ही आपल्या आठवणी, अनुभव सांगितले.

तर नुकतेच केंद्र प्रमुख म्हणून पाय उतार झालेले श्री नीरज अगरवाल यांचे, “आजच्या काळात स्मार्ट मोबाईल फोन मुळे प्रत्येक व्यक्ती ही निर्माता झाली (“कंटेंट क्रिएटर”) असून फार मोठी साधनसामुग्री असलेल्या दूरदर्शन पुढे सकस कार्यक्रमांच्या निर्मितीचे आव्हान आहे” हे बोल अंतर्मुख करणारे आहेत.

निवृत्त अभियंते शरद मोघे यांनी दूरदर्शनच्या पहिल्या दिवसापासूनच्या, तसेच दूरदर्शनच्या प्रसिध्द मनोऱ्यावर ते दोनदा कसे गेले, या आठवणी सांगून दूरदर्शन च्या उभारणीत इंजिनिअरिंग सेक्शन चे महत्व विषद केले.

विद्यमान इंजिनिअरिंग संचालक श्री अर्जुन विभुते यांनी दूरदर्शन वर केलेली कविता सादर करून “हम भी कुछ कम नहीं” हे दाखवून दिले.

माजी दूरदर्शन निर्माते, निवृत्त माहिती संचालक, तथा न्यूज स्टोरी टुडे या आंतरराष्ट्रीय पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी दूरदर्शन व माहिती खात्यात काम करीत असतानाच्या दूरदर्शन विषयक आठवणीं सांगून दूरदर्शनची अमृत महोत्सवाकडे दमदार वाटचाल होण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन केले.

यावेळी अन्य अनेक अधिकारी, कर्मचारी यांनी ही आपापली मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी “स्टुडिओ ए” मध्ये विशेष सजावट तर मुख्य इमारती बाहेर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दूरदर्शन चे सर्व शाखांचे विद्यमान अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी यांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत.

डॉ मृण्मयी भजक यांनी सूत्रसंचालन केलेल्या,
या कार्यक्रमावर आधारित दूरदर्शन वृत्तांत लवकरच प्रसारित होत आहे.

तिसरा कार्यक्रम
तिसरा कार्यक्रम झाला, तो दूरदर्शनच्या आजवरच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेणारा. जवळपास दोन तासांचा हा कार्यक्रम दूरदर्शन वरून २ ऑक्टोबर रोजी प्रसारित करण्यात आला. हा कार्यक्रम आपण यू ट्यूब वर “सुवर्ण सह्याद्री” नाव टाकून पाहू शकता.

चौथा कार्यक्रम
ठाणे येथे मराठी ग्रंथ संग्रहालयात ७ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यालाही ठाणेकर नक्कीच छान प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे.

मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाराष्ट्र भर आजचे दूरदर्शन आणि खाजगी वाहिन्या, त्यांचे स्वरूप, प्रेक्षकांच्या अपेक्षा या विषयी विविध विद्यापीठे आणि अन्य संस्थांमध्ये ही विचार मंथन होणे, समयोचीत ठरेल.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments