निवृत्त केंद्रीय गृहसचिव,विद्वान प्रशासक,२२ पुस्तकांचे लेखक डॉ माधव गोडबोले यांचं काल पुण्यात हृदयविकाराने निधन झालं. त्यांचे सुहृद ज्येष्ठ लेखक, चतुरस्र कलाकार, इंदूर निवासी श्री श्रीकृष्ण बेडेकर यांनी वाहिलेली ही शब्द सुमनांजली…..
मी जन्मजात ‘श्रीकृष्ण’ असलो; तरी “भक्तिमार्ग” माझ्या दिशेने आल्याचं फार तर एखादंच उदाहरण सापडेल, कारण सिंह राशीला साजेसं माझं जाज्ज्वल्य बोलणं आणि अनाठायी जागी एक घाव नि दोन तुकडे करणारी वृत्ती ! सबब भरपूर आत्मविश्वास व गाठीला “भेटीलागी जिssवाss,
लागलिसे आssसss”
असल्याशिवाय माझ्या वाटेला कुणी येत नाही; परंतु मला पुण्यातील लॉ कॉलेज रोड समोरील ‘भक्ति मार्गा’वर आपला ‘सांगाती’ करणारी एक असामान्य, सहृदयी आसामी होती, ती म्हणजे डॉ.माधव गोडबोले.
आजपासून ३०-३२ वर्षांपूर्वी प्रधान मंत्री पी. व्ही. नरसिंव्हाराव यांच्या कारकीर्दीत डॉ. माधवराव गोडबोले हे केंद्रीय गृहसचिव होते. रात्रंदिवस राजकारण्यांच्या ग ‘राड्या’ तच राहिल्यामुळे ते निवृत्तीनंतर पध्दतशीरपणे सांसद वा राज्यपाल अथवा आणखी काहीही होऊ शकले असते; पण आपलं पाऊल वाकडं पडू न देता, निरनिराळ्या समित्यांवर नेमले जाऊन सामाजिक सुधारणांत ते रस घेऊ लागले. त्यांची अनेक पुस्तकंही प्रकाशित. तात्पर्य ते नांव कानांवरून गेलेलं; तरी त्यांच्याशी कधी दूरान्वयाने संबंध येईलसं वाटलं नव्हतं; पण स्वर्गात फक्त लग्नगांठीच नव्हे, इतर भेटी-गांठीसुध्दा बांधल्या जात असाव्यात ! त्यामुळेच १९९९ सालअखेर सौ.गीतासह पुण्यात भटकताना लॉ कॉलेज रोड समोरच्या भक्ति मार्गाला लागलो अन् डाव्या बाजूच्या घरावर ‘गोडबोले’ पाटी दिसली. शिरलो आत, म्हटलं– “इंदूरवरून आलोय. संदर्भ वगैरे काही नाही; परंतु आतून वाटलं की; भेटावं तुम्हाला.”
गोडबोले दांपत्याने आमची माणुसकीला साजेशी दखल घेतली; मात्र पुढे त्या घरी जाणं झालं नाही व गोडबोले देखील इंदुरात पायउतार झाले नाहीत. अर्थात एकदा धागा जुळला की; शक्य तो सलग राखायचा ही माझी आवड. त्यास अनुसरून फोन, पत्र-भेटीतून आस्ते आस्ते आपसात जिव्हाळा झुळझुळू लागला.
२००४ साली, वयाच्या ६१व्या वर्षी व्यवसायाला अखेरचा दंडवत घातला व पत्र-सारांश आंतर्देशीय मासिकाचा अनुभव जमेस धरून, ‘शब्द दर्वळ’ दिवाळी वार्षिक प्रकाशित करायचं ठरवलं आणि रात्रीचा दिवस करून कसाबसा पहिला अंक बाजारात आणला, त्याचं कौतुक होऊन तो अनपेक्षित पुरस्कृतही झाला.
लगेचच २००५-६ चा ‘शब्द दर्वळ’ मनी-मानसी आकारू लागला. पहिला फोन माधवरावांना. म्हणाले–
” खूप कामं आहेत हो, निदान दोन महिनेतरी उसंत नाही, पाहतो !”
तशातही मी माझं टुमणं पुढे दामटतच राहिलो आणि डॉक्टरसाहेबांना माझी तळमळ जाणवली. काही दिवसांतच अभ्यासपूर्ण लेख हाती आला.
मागची १६ वर्ष ‘शब्द दर्वळ’ आवर्जून भक्ति मार्गाने जात राहिला, मानधनाचं गा-हाणं कधीच कानी आलं नाही. कालांतराने मी अन् माझं गुण-वैविध्य डॉक्टरांना भावून, मंगेश पाडगांवकर अस्तंगत झाल्यानंतर एके दिवशी त्यांचा सांगावा आला–
“बेडेकर, तुमची ठळक माहिती तसेच तुमच्यावर वृत्तपत्रांतून छापून आलेल्या लेखांच्या प्रती त्वरित धाडा. काहीतरी करीन म्हणतो.”
पडत्या फळाची आज्ञा मनावर घेत मीही तातडीने सारं काही पोचतं केलं.
इथे मुद्याची बाब सागायची ती अशी की; आय.ए.एस. सारख्या हुद्यावर पोचूनही, ते कधी गुद्यावर आले नसावेत ! मला म्हणायचे– “मी माझे ‘गोडबोले’ हे आडनांव बदलवून घेणार आहे. खरे तर गडावर राहणारे ते ‘गडबोले’, गोडबोले हा अपभ्रंश आहे.”
थोडक्यात काय, माझ्या संदर्भात डॉक्टरांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आणि मुख्य सचिवांना अत्यंत मऊ शब्दात, जवळ जवळ एकाच मसुद्याची पत्र पाठवली. फरक इतकाच की; दुस-या व तिस-या पत्राच्या शेवटी– “बेडेकर यांचा शासनातर्फे देण्यात येणा-या पुरस्काराने यथोच्च सन्मान केला जावा असे मी इच्छितो.” असं वाक्य होतं !
दोन वर्षांआधी पुण्यात जी ‘श्रीकृष्ण बेडेकर अमृत महोत्सव समिती’ अस्तित्त्वात आली, तिच्यातील काही थोर मंडळींत डॉ.माधवराव गोडबोलेही होते व ज्या संस्थांनी वा व्यक्तींनी समितीला भरघोस देणग्या दिल्या, त्यातदेखील गोडबोले यांचा सिंहाचा वाटा म्हणजे किती ? तर त्यानी चक्क ₹ २५,०००/- समितीच्या बँक खात्यात जमा केले होते. इतकेच नव्हे; तर माझ्या एकूणच कार्य-कर्तृत्त्वास समर्पित २५६ पृष्ठाच्या ‘इत्थंभूत’ (अद्याप अप्रकाशित) ग्रंथात शुभारंभाचा लेख “महाराष्ट्र दखल कधी घेणार ?” माधवरावांनी लिहिला, त्यातील थोडा भाग इथे उद्धृत करतोय–
“श्री.श्रीकृष्ण बेडेकरांच्या अमॄत महोत्सवाच्या निमित्ताने अनेक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामाचा प्रेमाने व उत्साहाने लेखाजोखा मांडला जात आहे हे योग्य आहे. इतक्या विविध क्षेत्रांत सहजगत्या वावरणारे व आपली छाप उठवणारे बेडेकर हे जगावेगळे व्यक्तिमत्त्व आहे यात शंकाच नाही. त्यांच्याकडे बघून त्यांच्यात इतके कलागुण वसत असतील यावर माझातर प्रथम विश्वासच बसला नाही; पण त्यांच्या कार्याची जसजशी ओळख होत गेली, तसतसे एक व्यक्ती इतक्या सर्व गोष्टी इतक्या कौशल्याने कशा करू शकते हे पाहून खरे तर; त्यांचे नांव ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ मध्ये जायला पाहिजे असे वाटू लागले.
बेडेकर हे मुंबईचे, अगदी गिरगांवकर; पण ५०-६० वर्षें ते इंदूरवासी असूनही त्यांनी महाराष्ट्राची भाषा व संस्कृती जपण्यासाठी आणि संवर्धनासाठी केलेले अथक प्रयत्न विसरून चालणार नाही. मी माझ्या प्रशासकीय कार्यकाळातील १९ वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राबाहेर घालवला आणि त्यामुळे बाहेर राहून भाषा व संस्कृतीशी नाळ टिकवून ठेवणे किती कठीण असते, हे प्रत्यक्ष अनुभवले आहे.
त्यामुळेच मला बेडेकरांचे काम, त्यासाठीचा उत्साह आणि जिद्द ही इतक्या प्रकर्षाने जाणवते.
महाराष्ट्रापासून दूर असलेल्या मराठी व्यक्तींनी भाषा व संस्कृती संवर्धनाचे केलेले काम बहुधा उपेक्षित राहते हा नेहमीचाच अनुभव आहे. बेडेकरही त्याला अपवाद नाहीत असेच म्हणावे लागेल. तरीही खचून न जाता, चिकाटीने, धडाडीने बेडेकरांनी त्यांचे कार्य इंदूरहून अव्याहतपणे, स्वत:ची पदरमोड करून चालू ठेवले आहे याची दखल महाराष्ट्र शासनानेच नव्हे; तर महाराष्ट्रानेही घेणे आवश्यक आहे यात शंका नाही.”
मध्यंतरी त्यांना फोन (ते मोबाईल वापरत नसत.) केला. ते उत्क्ठेने उद्गारले–“सांगा सांगा.”
“काही विशेष नाही, ऑगस्ट २१ ला दिल्लीहून मला एक फोन आला की;–
“जल्द ‘पद्मश्री’ के लिये आपका आवेदन भेजे।”
तेव्हा मी नकार कळवत स्पष्ट केलं की;
“मैंने आपको पद्मश्री देने के लिये नहीं कहां और न ही मुझे उसकी आवश्यकता है।”
त्या कथनाने डॉक्टर खवळले–
“का नाही म्हणालात ? तुम्ही होकार द्यायला हवा होता, पुढील वेळी ही चूक करू नका आणि चांगली बातमी ऐकवा.”
एवढ्यावरच ते बोलणं संपलं. दरम्यानच्या काळात फिरून एक-दोनदा ओझरतं संभाषण झालं. मागील वर्षीचा ‘शब्द दर्वळ’ मी ‘औद्योगिक पडझड- धावपळ विशेषांक’ या शिर्षकाने काढायचं ठरवलं, त्या सुमारास पुन्हा डॉ. गोडबोले यांचं दार ठोठावलं,
“कोविद-१९,२० मधील पडझडीबद्दल प्रशासनिक दृष्टिकोनातून एक लेख पाठवा.”
म्हणाले– “बरं लिहितो.” अन अभिवचनानुसार लेख आला.
मात्र यानंतर डॉक्टरसाहेबांशी हक्काने बोलण्याची संधि कधीच लाभणार नाही. कारण कळविण्यास अत्यंत दु:ख होते की,…..
श्रीमती सुजाता गोडबोले आणि कुटुंबियांच्या वाट्याला आलेल्या डोंगरागत दु:खातील एक वाटेकरी – मी !

– लेखन : श्रीकृष्ण बेडेकर. इंदूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.