मागच्या आठवड्यातली दुःखद बातमी ! आमचा एक पी एच डी च्या ग्रुप मधला जुना मित्र अचानक गेला. आमच्यापेक्षा बराच लहान, अदमासे अवघ्या पन्नास वर्षांचा. चिकनगुनिया चे निमित्त झाले आणि कायमचा निघून गेला ! पन्नाशीचे वय हे निश्चितच सध्याच्या काळात मृत्यूचे वय नव्हे. पूर्ण भरात आलेला संसार, पुढच्या दहा वीस वर्षांची स्वप्ने आणि प्लॅन्स करत असणारी फॅमिली, या सर्वांना काहीही सूचना न देता, सर्व खेळ अक्षरशः अर्ध्यावर टाकून गेला हा मित्र.
नजीकच्या काळातल्या माझ्या पाहणीत आलेल्या दुर्घटनेपैकी ही अजून एक. माझा कंपनीतला जवळचा सहकारी इंजिनियर काही कामानिमित्त कार ने प्रवास करत असताना दुर्घटनाग्रस्त झाला आणि तत्क्षणी त्याने प्राण गमावले. असाच चाळीस एक वर्षे वयाचा आशेने आणि उमेदीने भरलेला तरुण. त्याची पत्नी तर उन्मळून पडली होती. पदरात लहान मुले आणि तिच्या सांगण्याप्रमाणे, हा असताना कधी तिने बँकेतून पैसे पण काढले नव्हते स्वतः होऊन, अशी परिस्थिती. तिचे सांत्वन करणार तरी कसे ?
अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला सुद्धा घडताना दिसतात. जीवन नश्वर आहे, कोणाचा कधी नेम देऊ शकत नाही, ईश्वरेच्छा बलियसी, मानवाच्या हाती काही नसते… हे सर्व सामान्य माणूस वर्षानुवर्षे ऐकत, अनुभवत आला आहे. या सर्व वचनांना आणि परिस्थितीला दुसरा काहीही उपाय नसल्यामुळे निमूटपणे शरणागती पत्करून सामोरा जातो आहे. पण जेव्हा या घटना दूर कुठेतरी होत नसून तुमच्या जवळच्या परिघातील माणसांना स्पर्श करू लागतात तेव्हा मात्र अंतर्मुख होऊन विचारांचे मोहोळ मनात उठू लागते.
आपल्या पूर्वजांनी यावर खरे तर मार्ग शोधून ठेवला आहे. जीवनाच्या ठराविक टप्प्यांवर वानप्रस्थाश्रमातून सर्व जबाबदाऱ्या कमी करत संन्याशाश्रमात प्रवेश करणे. हेतू हाच, की आपल्या जाण्यामुळे आपणावर विसंबून राहण्यांवर कमीत कमी परिणाम व्हावा. परंतु यात गोम अशी आहे की ईश्वराने वानप्रस्थाश्रमा पर्यंत पोहोचावे एवढे आयुष्य तरी दिले पाहिजे ना ? इथेच तर घोडे पेंड खाते आहे !
आजूबाजूच्या जगाच्या रीती आणि व्यवहार सुद्धा बदलत चालले आहेत. कमी प्रजनन दर असलेल्या अनेक देशात सक्तीच्या सेवानिवृत्तीचे वय हे पार पासष्ट पर्यंत वर गेले आहे. म्हणजे गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रमाच्या कालमर्यादा पण वाढल्या आहेत. त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या जास्त्त काळ पर्यंत मनुष्य पार पाडत राहणार हे नक्की. अर्थात या परिस्थितीत जर ईश्वराने कमी आयुष्य दिले, तर त्याचा अनिष्ट परिणाम ही भोगावा लागणार. सर्वच कठीण होत चालले आहे.
अकाली आलेला मृत्यू, अनेक प्रकार च्या गुंतागुंती, मागे राहिलेल्यांसाठी निर्माण करतो हे तर सांगायलाच नको परंतु अवेळी जवळ येत असलेला काळ, हे सत्य जर जाणाऱ्या माणसाला आधी कळले तर परिस्थिती काही वेगळी होते का ?
एक उदाहरण मात्र मी जवळून पाहिले आहे. अनेक वर्षे उलटून गेली त्या घटनेला. कंपनीतला एक सहकारी असाध्य रोगाने आजारी होता. वय पंचेचाळीस ते पन्नास च्या मध्ये. शेवटी डॉक्टरांनी सुद्धा हताश होऊन हात वरती केले आणि कुटुंबीय इस्पितळातून त्याला घेऊन घरी आले. शेवट चे काही दिवस त्याचे घरीच जावेत म्हणून. त्या अवस्थेत मी त्याला भेटायला त्याच्या घरी जाऊन पोहोचलो होतो. जरा साशंकच होतो कि तो बोलायच्या मनस्थितीत आणि शारीरिक स्थितीत असेल का नाही असे. घरी पाहतो, तर हा शांतपणे चक्क खुर्चीत बसला होता. मला बघताच कंपनीच्या कामाविषयी बोलायला लागला. थांबवले मी त्याला… म्हटले… बाबा रे ! हे कामाचे बोलायला आलो नाही मी. अतिशय “सोर्टेड” होता तो. अगदी सहज आणि स्थिर आवाजात म्हणत होता “थोडाच वेळ राहिलाय सर…” त्याची पत्नी पण बाहेर आली. चहा घेणार का विचारले. कोणालाही न जुमानता, पुढेपुढे येणाऱ्या त्या मृत्यूच्या पावलांना त्रयस्थपणे बघणाऱ्या आणि सामोरे जाणाऱ्या त्या दोघांकडे बघून माझ्या अंगावर शहारे आले होते. विमनस्क मनस्थितीत परत आलो मी. एका आयुष्याच्या सांगतेची अशी शांतपणे वाट बघणारे कुटुंब मन अक्षरशः विदीर्ण करत होते. नंतर अनेक दिवस संवेदना बधिर होत्या माझ्या. त्या नंतर एक दीड महिन्यातच माझा सहकारी हे जग सोडून गेला.

हे असे प्रसंग अनुभवले की प्रचंड प्रश्न पडू लागतात. नवीन गाडी घेणे, घर घेणे, दागिने करणे… सर्व भौतिक गरजा भागवण्याचा प्रयत्न करणे, नोकरी, शिक्षण यात दुसऱ्यांशी चढाओढ करणे हे आणि अशा अनेक गोष्टी का कराव्यात जर शेवटी आयुष्याचा अंत हा असा आणि अचानक होणार असेल तर ?
पण मग उभ्या आयुष्याचे नियोजन जे सर्व जण आपल्या क्षमतेनुसार करीत असतात ते बंद करायचे का ? ते करणे चुकीचे आहे काय ? प्रोजेक्ट इंजिनिअर्स जे अनेक वर्षे चालणारे भव्य प्रोजेक्ट्स करीत असतात, त्यांनी आयुष्याचा काही नेम नाही म्हणून सगळे प्रयत्न बंद करावे काय ? आणि राष्ट्रपुरुष जे राष्ट्र उभारणीसाठी आयुष्य वेचतात, त्यांचे काय ? अगदी सर्व सामान्य माणसाला साधे घर घ्यायचे असल्यास पैशाचे नियोजन कित्येक वर्षे सांभाळावे लागते, त्यांनी हात पाय गाळून हरी हरी म्हणत बसावे का ?
प्रश्न, प्रश्न आणि अजून प्रश्न ! आम्हाला फक्त प्रश्नच पडतात. आमची कुवत एवढी नगण्य, की त्यांची उत्तरे कोण देणार ? आजूबाजूच्या कोणी ज्ञानी माणसाला विचारावे, तर सर्वच आमच्या सारखे कामकरी मुंग्या ! ह्या प्रश्नांची उत्तरे वेदपुराणात, अध्यात्मात शोधावी तर तेवढा व्यासंग नाही. प्रयत्न करून वाचावे, तर वेळ नाही आणि वेळ का नाही, तर सर्व कळून सवरून सुद्धा आम्ही त्याच जीवन चक्रात स्वतः ची आणि कुटुंबाची आर्थिक, भौतिक उन्नती करण्यातच गुंतलेलो ! प्रसंग आला की अंतर्मुख जरूर होतो, मार्ग शोधू लागतो… पण तेवढयापुरतेच ! नवीन दिवस उगवला की आम्ही परत आपापल्या पोटापाण्याच्या कामात मश्गुल ! पटणारी उत्तरे मिळणार कशी ?
लेखक अरविंद जगताप सांगून गेलेत की, आज च्या सोशल मीडियाच्या जमान्यात “पत्रे” कालबाह्य ठरल्यामुळे माणसाची त्याच्या आणि तुमच्या संबंधांची कडू गोड “आठवणी” येणे, ही गोष्ट सुद्धा आपण विसरून जात आहोत.
कारण कुणाची आठवण आली की लगेच विज्ञानामुळे त्याला संपर्क करता येतो. “ऑनलाईन” आणि “तत्क्षणी” बातमी काढता येते. या चे दुष्परिणाम असे होतात की माणूस अकाली गेला तरी आठवणी अश्या फारश्या रहातच नाहीत. मग RIP म्हटले की पुढच्या दिनक्रमाला सुरुवात. “काल होता, आज नाही” हेच उरणार शाश्वत ! प्रत्येक विज्ञानाने शोधलेला आविष्कार, म्हणूनच दुधारी तलवार असते ती अशी !
आता भविष्यातल्या एकाच क्रांतिकारी शोधाची आम्ही वाट पहात आहोत. टाळता येणे शक्य नसेल, पण आयुष्याच्या अंताची वेळ कोणी वैज्ञानिक शोधाअंती सांगू शकेल काय ? प्रत्येकाला आपापल्या जीवनाचे व्यवस्थित नियोजन करायचे असेल तर तोच एक मार्ग उपलब्ध आहे.
समजा हे शक्य झाले मानवाला, तर त्या सर्वशक्तिमान ईश्वराच्या कामात ही ढवळाढवळ ठरेल काय ? मग आम्ही जगावे तरी कसे ?
वसंत कानेटकरांनी लिहिल्याप्रमाणे –
देवाघरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमानेम ?
कुणी रखडता धुळीत आणिक कुणास लाभे हेम
मी निष्कांचन, निर्धन साधक, वैराग्याचा एक उपासक
हिमालयाचा मी तो यात्रिक,
मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम ?
तात्पर्य काय तर आम्हा सामान्य माणसांचे “प्रश्न” हे शेवटी उरतातच !
— लेखन : उपेंद्र कुलकर्णी. सिंगापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सामान्य माणसांच्या प्रश्नाची कळकळ जाणवते परंतु शेवट कधी? हा शोध लागू नये असे वाटते कारण त्यामुळे वर्तमान आनंदात जगूच शकणार नाही!
खूप छान वाचनीय