सा क व्य व्हॉट्सॲप समूहाच्या दुसऱ्या परदेशस्थ मराठी ऑनलाईन कवी संमेलनात कवयत्री डॉ गौरी जोशी कंसारा यांनी सादर केलेल्या “सांगा मला” या कवितेचे “कुटुंब रंगलय काव्यात” फेम श्री विसुभाऊ बापट यांनी केलेले रसग्रहण…..
“अरे मी कोन ?
मी कोन ?
आला मानसाले ताठा.!”
हा ‘मी’ पणाचा ताठा नाहीसा झाला की अंतःकरण शुद्ध होतं, जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. स्वतःचे अवगुण तर दिसतातच शिवाय दुसऱ्याचे सद्गुणही दिसायला लागतात. जगातील प्रत्येक गोष्ट निसर्ग निर्मितच असते याची जाणीव होते.
भारतीय संस्कृती आपल्याला अहंकार दूर करायला सांगते.
अमेरिकेत रहात असूनही कवयित्री डॉ. गौरी जोशी कंसारा यांच्यात भारतीय संस्कृती भिनलेली आहे, याची जाणीव मराठी रसिकांना होते, ती “सांगा मला” ही त्यांची कविता वाचून !
अंकुरणं, फुलणं, स्फुरणं, हे सारं निसर्ग-दत्त आहे. नवलाई, करुणाई, हिरवेपण, बरवेपण, चैतन्य हे सगळं निसर्गाचंच सृजन आहे. इतकंच काय प्रतिभा सुद्धा निसर्गानेच मला दिली आणि त्यामुळे निर्माण झालेली कविता माझी आहे, असं मी कसं म्हणू ? म्हणूनच डॉ. गौरीजी कळ्या, फुले, वारा,नदी, झरे, दरी-डोंगर, पशूपक्षांना ही विचारीत आहेत, “ही कविता माझी आहे,” असं मी कसं म्हणू ?

– रसग्रहण : विसुभाऊ बापट. मुंबई
आता प्रत्यक्ष कवितेचा आस्वाद घेऊ या…
सांगा मला…
सांगा मला, हे कळ्या-फुलांनो,
जरा तुम्हीही वण-वाऱ्यांनो,
वर्ता खरे नदी-झऱ्यांनो,
सांगा बरे, डोंगर-खोऱ्यांनो,
चिवचिव करा, हे पाखरांनो.
कवितेस माझ्या मी “माझी” म्हणते
परि नाद त्यात तुमचे गुणगुणते
नवलाई, हिरवेपण तुमचे
करुणाई, बरवेपण तुमचे
अंकुरण ही पर्जन्याचे
स्फुरण ही चैतन्याचे
शब्द, स्पर्श मज तुम्ही शिकवले,
रूप, रंग मज तुम्ही दाखवले.
रूप माझे मी शब्दात पहाते
श्वास लिहिते; त्यात वहाते
एक एक श्वास मज सृष्टी देते
ते श्वास उमगण्या दृष्टीही देते.
सारे हे; जे तुमचे आहे,
धमन्यांत माझ्या अखंड वाहे.
जाणीव तुमची, नेणीव तुमची
संवेदन, कर्तेपण तुमचे
प्रेरण, उत्स्फूरण, “दिसणे” पण तुमचे
अपुले माझे “असणे” पण तुमचे
कवितेत “मी” असते का ?
तुम्हांस तरी मी दिसते का ?
मग म्हणू कशी मी कवितेस “माझी“?
कळवा मजला तुमची मर्जी.
– रचना : डॉ. गौरी जोशी-कंसारा.
पुढे कवितेची लिंक दिली आहे. कवयत्री स्वतः कविता सादर करताना…
– संपादन : देवेंद्र भुजबळ ☎️ +919869484800
अतिशय निरागस भावनेतून निर्माण झालेली ही कविता.
गौरीच्या सृजनशील मनाची साक्ष देते.
विसुभाऊंनी रसग्रहण फारच सुरेख केले आहे.
गौरी कंसारा यांची सांग मला ही कविता मला फार आवडली.
निसर्ग प्रेमी संवेदनशील मनातून सहज ऊमटलेले हे उद्गार आहेत.
एकप्रकारे सृजनाने सृजनाला दिलेली ओळख आहे.
विसुभाऊंनी केलेलं कवितेचं रसग्रहणही खूप छान!!
कवितेच्या सृजनाच्या सोहोळ्याची पूर्तता तेंव्हा होते जेंव्हा ती एखादया रसिक हृदयात रुजते.
“सांगा मला ” ह्या माझ्या कवितेचा, आदरणीय श्री. विसुभाऊ बापट यांनी उल्लेख करून तिचं रसग्रहण करणं आणि आदरणीय भुजबळ सरांनी त्या कवितेस portal वर संपादित करणं ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत् भाग्याच्या आहेत. मी आपणा दोघांची, सा.क.व्य. परिवाराची आणि सर्व रसिक वाचकांची ऋणी आहे.