“काय सागरी तारू
लोटले परताया मागे
असे का हा आपुला बाणा
त्याहून घेऊ जळी समाधी सुखे,
कशासाठी जपावे
पराभूत प्राणा”
त्याच्यासारख्या जगातल्या कोणत्याही मुलाने असे धाडस केले नसेल, ते त्याने केले. तो तिथेच थांबला नाही तर जग बदलू पाहणाऱ्या प्रेरणादायी ‘उठा तुम्हीही जिंकणारच’ या लेखांचे वाचन तो सतत करत असायचा. त्यामुळे त्याच्यात एका नव्या चैतन्याने जन्म घेतला आणि तो ठरला पहिला अंध जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक.
नाशिक जिल्ह्यातील पावसाचे माहेरघर असलेल्या अतिदुर्गम अशा मोडाळे या गावात 3 जून 1993 ला अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या, मजुरी करणाऱ्या दाम्पत्याच्या पोटी त्याचा जन्म झाला. सुंदर, देखण्या, गुटगुटीत बाळाने या घरात जन्म घेतला होता. आईवडील, नातेवाईक, शेजारी त्याच्या जन्माने खूप आनंदित झाले.
पण काळाने वेगळाच डाव साधला होता. बाळ हळूहळू आवाजाच्या दिशेला डोळेझाक करत असे आणि भलतीकडेच लक्ष देई. आईवडिलांच्या काळजाचा ठोका चुकायला लागला. पण बाळ तर टवटवीत आणि निरोगी होते. सुरुवातीला शंका म्हणून त्यांनी गावातील, तालुक्यातील तसेच जिल्यातील डॉक्टरांचा सल्ला घेतला. पण निदान काहीच होईना.
दिवसामागून दिवस भराभर जात होते. तो ही आनंदाने सगळ्या गोष्टी करत होता. हसणे, खेळणे, रडणे,
धावणे सगळं काही आनंदात चालले होते. पण त्याची दृष्टी हळूहळू कमी होत आहे हे कुणाच्याच लक्षात आले नाही. शेवटी नको ती भयाण अमावस्येची काळरात्र त्याच्या आयुष्यात आलीच. वयाच्या चौथ्या वर्षी त्याला काहीच दिसेना. तो आजूबाजूचे काहीच दिसत नाही म्हणून रडायचा, हंबरडा फोडायचा पण काही उपयोग झाला नाही. आईबापाने एक एक रुपया करून जमवलेला पैसा पोटच्या गोळ्याला दिसावं म्हणून पाण्यासारखा खर्च केला. शेवटी उपाय हरले आणि तो 75% दृष्टी गमावून बसला.
अगदी कोवळ्या वयात नियतीने त्याच्या सोनेरी आयुष्यावर मोठा आघात केला होता.
महातेजस्वी, बुद्धिवान, धर्मगुरु भैयु महाराज यांनी जीवनाच्या कुठल्यातरी संकटाला घाबरून किंवा कंटाळून आत्महत्या केली. सर्व सुखे पायाशी लोळण घालत असतानाही लोकप्रिय अभिनेता सुशांतसिंग राजपूत यानेही कुठल्यातरी तणावाने मृत्यूला जवळ केले. आपले जीवन कुष्ठरोगी समुदायाला अर्पण करून ज्यांनी मानवसेवेचा महान इतिहास रचला त्या बाबा आमटे यांच्या आनंदवनाचा वारसा चालवणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ शीतल आमटे यांनीही आपल्या सुंदर जीवनाची यात्रा अर्ध्यावरच संपवली. अशा वेळी त्या अंध मुलाचा जीवनसंघर्ष आपल्यासमोर आदर्श उभा करतो. तो अवघ्या चार वर्षाचा कोवळा जीव कुठला जीवन संघर्ष करणार होता ? अशी कोणती जादुई किमया त्याच्यात निर्माण झाली ? त्याने आपल्या शारीरिक अपंगत्वाचे आयुष्यात कधीही भांडवल केले नाही.
सामान्य शाळांचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद करून टाकले होते. आईवडील वणवण भटकंती करून त्याच्या जीवनाचा प्रश्न सोडविण्यात मग्न होते. पण या सोपस्कारामुळे घरात सायंकाळची चूल पेटत नसायची. आई कधीकधी पोटाला लुगड्याचा दांड बांधून झोपी जात असे. कधी वाटायचे बाळाच्या नरड्याचा घोट घ्यावा की आपलीच जीवनयात्रा संपवावी !
बापालाही वाटायचे की या संघर्षापेक्षा संपवावे सगळ्यांना आणि स्वतःलाही. पण अतोनात गरिबीचा सामना करत त्यांनी मुलाला चांगलं सांभाळण्याचा निर्णय घेतला. माणुसकी धावून आली. कुणीतरी नाशिकच्या अंधशाळेचा पत्ता दिला. पोटचा गोळा, अपंगत्व उराशी सांभाळत बाहेर कसा जगणार ? पण दोघांनी काळजावर दगड ठेवून त्याच्या उज्वल भविष्यासाठी नाशिकला पाठवले.
नाशिकरोडच्या अंधशाळेत तो शिक्षण घेत मोठा होऊ लागला. वाढत्या वयाबरोबर त्याचे अंगभूत गुणही विकसित होत गेले. लहानपणापासूनच खोडकर, उद्योगी असणारा मुलगा भविष्याची गणिते सोडवू लागला. के.जे.मेहता विद्यालयातून त्याने दहावीला डोळसांनाही मागे टाकत 82.60 टक्के गुण मिळवून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
दहावी तर शासकीय अंधशाळेत झाली पण पुढे काय ?हा यक्ष प्रश्न कुटुंबियासमोर उभा ठाकला. गरिबीचा दाह काही केल्या कमी होत नव्हता. अखेर मार्ग मिळाला. पुन्हा समाजकल्याणच्या वसतिगृहात त्याला प्रवेश मिळाला. आता मात्र यश त्याला खुणावू लागले. त्याच्या वाढत्या वयाला बुद्धीची जोरदार साथ मिळाली. तो महाविद्यालयात मैदानी खेळात, बुद्धिबळात, धावण्यात, भाग घेऊन आपली चमक दाखवू लागला. त्याच्या या गुणांची ओळख आणि पाखरण शिक्षकांनी केली आणि त्याच्या आयुष्याने एक वेगळेच वळण घेतले.
अंधांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्याने एक सुवर्णपदक, एक रौप्यपदक, एक कांस्यपदक पटकाविले. तो मैदानातच नाचला नाही तर बुद्धिबळातही त्याने एक सुवर्णपदक आणि एक रौप्यपदक मिळविले. अंध आणि पोहणे तसा अवघड विषय पण त्याने त्यातही आपली चुणूक दाखवली. पोहण्याच्या स्पर्धेत 50 मीटरमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले. त्या अष्टपैलू खेळाडूने लांबउडीत सुवर्णपदक व गोळाफेक मध्ये रौप्यपदक प्राप्त केले.
त्याच्या कर्तुत्वाला आता वेगळीच झळाळी आली होती. अंधांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक तसेच 200 मीटरमध्ये रौप्यपदक आणि 400 मीटरमध्ये एक सुवर्णपदकही मिळविले. राष्ट्रीय पातळीवर त्याने 200, 400, व 800 मिटरमध्येही चमकदार कामगिरी बजावली आणि चौथ्या क्रमांकावर आपले नाव कोरले. खेळाबरोबरच त्याने समाजशास्रात पदवी मिळवली.
वय आणि बुद्धीच्या जोरावर तो काळाला हरवत चालला होता. त्याच्या या कामगिरी च्या बळावर त्याला मुंबई महापालिकेत टेलिफोन ऑपरेटरची नोकरी मिळाली. आता त्याचे आणि कुटुंबाचे दिवस पालटले होते. सुखाचे दोन घास तो खाऊ शकत होता. पण ‘थांबला तो संपला ‘ हा मंत्र त्याने आत्मसात केला होता. मुंबई महानगपालिकेत साडेतीन वर्षे नोकरी करूनही, त्याच नोकरीत समाधान न मानता, स्वतःच्या कर्तृत्वाने बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीकृत बँकेत क्लार्क म्हणून त्याची निवड होऊन त्याची नियुक्ती नाशिक येथे झाली.
अशातच गरुडझेप फाऊंडेशन नाशिक आणि इतर 20 संस्था त्याच्या भविष्यासाठी पुढे आल्या. त्यांच्या बरोबरीने तो गडकोटांची भ्रमंती करायचे धाडस करू लागला. मन थोडे हेलकावे घेऊ लागले.पण म्हणतात ना “काळ्याकुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं,
आपल्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं !”
जून 2019 मध्ये अशोक कुमावत यांची ‘उठा तुम्हीही जिंकणारच’ ही प्रेरणादायी लेखमाला त्याच्या हाती लागली. लेखमालेच्या पहाटेच्या वाचनाने त्याचा दिवस आनंदी आणि उत्साहात जाऊ लागला. “माझ्यापेक्षा जगात खूप दुःखी माणसे आहेत पण स्वकर्तृत्वाने त्यांनी अटकेपार यशाचा झेंडा रोवला” हे ब्रीद आणि प्रेरणा या लेखमालेतून त्याला मिळाली.
आता त्याला आपल्या कर्तृत्वाची पताका फडकवायची स्वप्ने पडू लागली. त्या निधड्या छातीच्या आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या मुलाने डॉ.संदीप भानोसे आणि गरुडझेप प्रतिष्ठान च्या सहाय्याने बघता बघता महाराष्ट्रातील 58 गडकोटांची भ्रमंती हसत हसत पार केली. 8आता त्याच्या पंखात गरुडभरारीचे बळ आले होते.
त्याने एक स्वप्न उराशी बाळगून मार्गक्रमण सुरू केली. नोकरीचा व्याप सांभाळून सुट्टी त्याला कळसुबाई शिखरावर स्वारी करायला खुणावत होती. नगर -नाशिक सीमेवर 1646 मीटर अति उंच, भयाण कातळात उभे असलेले ऐतिहासिक शिखर कळसुबाई. धडधाकट माणसे जिथे हात टेकतात व साध्या डोंगरावर देखील चढत नाही तिथे त्याने एक नाही, दोन नाही तर तब्बल 21 वेळा ते शिखर सर करून नवा इतिहास घडवला आणि पहिला अंध जागतिक विक्रमवीर म्हणून आपले नाव विश्वात कोरले.
त्याच्या या कामगिरीची दखल घेत अनेक संस्थांनी त्याला पुरस्कार प्रदान केले.
ब्रानो इंटरनॅशनल फ्रांस या संस्थेने त्याला जागतिक विक्रमवीर म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव केला. तसेच लंडनच्या वंडर ग्रुप ऑफ इंटरनॅशनल या संस्थेनेही त्याच्या कार्याची दखल घेऊन प्रोफाइल मागवली. शिवगर्जना कलामंचाचा 2017 दिव्यांग रत्न पुरस्कार, गडवाट महाराष्ट्र संस्थेचा यशस्वी दुर्गसंवर्धक, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत उत्कृष्ट खेळाडू आदी अनेक पुरस्कार त्याच्या कर्तुत्वाला शोभून दिसतात. सामाजिक कार्यातही तो आपले योगदान देत आहे. आपली गुणवत्ता वाढविण्यासाठी आता एम.ए. करतोय. ‘गोदावरी वाचवा, प्रदूषण टाळा’ हा नारा देत तो पर्यावरणाचे रक्षण करतोय. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे त्याचे अनेकदा सन्मानही करण्यात आले.
जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा त्याचा मानस आहे. थोड्याच दिवसात तो पर्यावरण रक्षणासाठी काश्मीर ते कन्याकुमारी हा सायकल प्रवास सुरु करत आहे. डोळसांच्याही डोळ्यात प्रेरणेचे झणझणीत अंजन घालणारा तो अवलिया म्हणजेच आई जिजाऊ व वडील वसंताच्या पोटी बहरलेला अलौकिक रत्न, तरुणांचे प्रेरणास्थान मोडाळे येथील “सागर वसंत बोडके” होय.
मार्ग आमुचा रोधु शकती ना धन, ना दारा,
घराची व वितभर कारा,
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात,
जिंकुनी खंड खंड सारा।
अशा या नियतीला पराभूत करणाऱ्या,
डोळसांनाही जगण्याची दिशा दाखविणार्या सागर यास भावी विक्रम करण्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
– लेखन : अशोक कुमावत.
राष्ट्रपती पुरस्कार विजेता. नाशिक.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सागर नेमाझ्या बरोबर अतिशय कठीण लिंगाणा सुळका सर केला होता.
सागर खूप खूप शुभेच्छा
🌹अभिनंदन 🌹
खूपच कमाल
आपण मुद्दा लिहिला धन्यवाद सर
असे लवकर कळतं नाही.
माननीय. श्री. भुजबळ साहेब धन्यवाद
अशोक साबळे
अंबरनाथ
सागरच्यापु जिद्दीला शतश:सलाम! आणि भविष्यात त्याची सगळी स्वप्ने पुरी व्हावीत यासाठी खूपखूप शुभेच्छा!!